प.पू. दास महाराज यांनी ध्यान लावण्याविषयी सांगितलेली सूत्रे

प.पू. दास महाराज

१. ध्यानावस्थेचा आरंभ परात्पर गुरु डॉक्टरांपासून होऊन ध्यानात त्यांचे दर्शन होणे, त्यानंतर प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होणे आणि त्यानंतरची गुरुपिठीका अजून दिसली नसणे

आपण एकातून अनेकात जातो आणि अनेकातून परत एकात येतो. माझ्या ध्यानसाधनेचा आरंभ परात्पर गुरु डॉक्टरांनीच केला ना ! मला ध्यानात परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाले आणि त्यानंतर प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन झाले. त्यांच्या वरची गुरुपिठीका अजून मला दिसली नाही. मला प.पू. अनंतानंद साईश अजून दिसले नाहीत. त्यांचे केवळ सावली रूपच दिसते. त्यांचा स्थूल आकार अजून दिसला नाही. माझे ध्यान सहस्रारचक्रात जाईल, त्या वेळी समाधीची अवस्था येईल. तेव्हा भूक, तहान हे नष्ट होतात.

२. ध्यानाचा कालावधी

२ अ. ध्यानाला बसण्यापूर्वी करायची सिद्धता

१. प्रत्येक चक्राची जागृती करायला अर्धा घंटा लागतो. एकदम सगळ्या चक्रांची जागृती करायची नाही. आरंभी मी खालच्या २ चक्रांची जागृती केली.

२. मी संध्याकाळी परत ध्यानाला बसलो. तेव्हा ३ चक्रांची जागृती केली. चक्रांची जागृती करण्यापूर्वी जेवायचे नाही; कारण जेवले, तर इंद्रिये सुस्त होतात.

३. फळे खावीत, गायीचे दूध प्यावे, उपवास करावा. त्यामुळे इंद्रिये तरतरीत होतात. हे ध्यानाला पूरक आहे.

४. जेवण करून ध्यान लागणे कठीण आहे. हलका आहार घ्यावा. जड आहारामुळे ॐकार करायला त्रास होतो.

२ आ. जसा सराव अधिक होईल, तसा ध्यानाचा कालावधी वाढत जाईल : ध्यानाला कालावधी असे काही नाही. ते आपल्या क्षमतेवर अवलंबून आहे. तुम्ही जेवढा सराव अधिक कराल, तेवढा ध्यानाचा कालावधी वाढत जाईल. आपली क्षमता आणि साधना यांवर ध्यानाचा कालावधी अवलंबून आहे.

३. प.पू. दास महाराज यांनी लावलेले ध्यान

माझे वडील असतांना माझे ध्यान लागले होते. मी भीमापूरवाडीला असतांना माझे ५ घंटे ध्यान लागले होते. त्या वेळी मी अन्नपाणी काही घेतले नाही. त्यानंतर बद्रीनाथला असतांना माझे ८ घंटे ध्यान लागले होते. तेव्हा स्वामींनी सांगितले, ‘‘एकदम ८ घंटे ध्यान न लावता ४ घंटे ध्यान लाव.’’ स्वामींनी मला सहस्रारचक्रापर्यंत ध्यान लावण्यास सांगितले नव्हते; कारण तेव्हा ध्यान उतरवण्यायोग्य कुणीच नव्हते. ध्यान उतरवण्याचा सराव असायला पाहिजे. सहस्रारचक्रांत चढवलेली समाधी उतरवतांना फार सावकाश खाली यावे लागते. आपल्या नाभीचक्राजवळ एक भोक आहे. ज्या वेळी आपण ॐकार करत खालून वर येतो, त्या वेळी नाभीचक्राजवळील भोक आपोआप बंद होऊन हवा बंद होते आणि जेव्हा वरून खालच्या चक्रांकडे येऊ लागतो, तसे नाभीजवळील भोक आपोआप उघडते आणि हवा हळूहळू बाहेर पडते.

४. समाधी टिकवण्याचा कालावधी

आता वर चढलेली समाधी किती वेळ ठेवायची ? ‘आपण जर त्याच आनंदात राहिलो, परमेश्वर, आराध्य देवता किंवा गुरु यांचे रूप आपल्या डोळ्यांसमोर स्थिर राहिले, तर आपण त्यातच रमून किती वेळ राहू ?’, हे सांगता येत नाही. ते आपल्या स्थितीवर अवलंबून असते; कारण ध्यान म्हणजे अवर्णनीय स्थिती आहे. त्यात विदेही स्थिती होते. त्या स्थितीत देहाची जाणीव नसते. शारीरिक क्रिया बंद होतात, उदा. भूक लागणे, लघुशंकेला जाणे इत्यादी.

ध्यान लावणे ही आपल्या जीवात्म्याची साधना आहे. शरिराची साधना नाही; म्हणून तो जीवात्मा ईश्वरी आनंदात मग्न झाला की, ते शरीर कितीही दिवस समाधी स्थितीत रहाते. एकदा आमचे पू. भगवानदास महाराज १२ घंटे ध्यान लावून होते. सच्चिदानंदस्वामी ३ दिवस ध्यान लावून बसले होते.

त्यानंतर एकदा मी २ दिवस ध्यानावस्थेत होतो. त्या वेळी मी पद्मासन घालून बसलो होतो. त्या स्थितीतून बाहेर आल्यावर माझे पाय घट्ट झाले होते. इतरांनी मी घातलेले पद्मासन सोडवले. माझ्या पायाला तेल लावून पाय मोकळे करावे लागले होते.’

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.८.२०२०)