युक्रेनमधून आलेल्या वैद्यकीय शाखेच्या १६ सहस्र भारतीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश देण्याचा सरकारचा विचार !

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – युद्धामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात येत आहे. या युद्धामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाण होऊ नये, यासाठी भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याविषयी भारत सरकार विचार करत आहे. यासाठी केंद्र सरकार ‘फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसेन्शिएट रेग्युलेशन (एफ्एम्जीएल्) अ‍ॅक्ट’मध्ये पालट करण्याचा विचार करत आहे. याविषयी लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे.

विदेशी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्याव्यतिरिक्त प्रशिक्षण आणि ‘इंटर्न’शिप भारताबाहेरच करावी लागते. युक्रेनमध्ये एम्.बी.बी.एस्. ६ वर्षांचे असते. नंतर २ वर्षे प्रशिक्षणासाठी (इंटर्नशिप) असते. आता युद्धामुळे शिक्षणात बाधा आल्याने सहस्रो मुलांचे भविष्य संकटात सापडेल. या विद्यार्थ्यांना सरकारी महाविद्यालयांत प्रवेश मिळण्याची शक्यता नाही. खासगी आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकतो. युक्रेनमध्ये पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या असल्याने ‘ऑनलाईन’ शिकवणे सध्या तरी शक्य नसल्याचेही सांगण्यात येत आहे.