पूर्णपणे झोकून देऊन गुरुसेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर नितांत श्रद्धा असणारे अमरावती येथील श्री. श्रीकांत पिसोळकर (वय ६१ वर्षे) !

‘हिंदु जनजागृती समितीचे विदर्भामधील समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर हे माझी मोठी बहीण सौ. माया पिसोळकर हिचे यजमान आहेत. आमच्या कुटुंबामध्ये ते सर्वप्रथम, म्हणजे वर्ष १९९७ मध्ये सनातन संस्थेच्या संपर्कात आले आणि नंतर त्यांनी हळूहळू आम्हा सर्व कुटुंबियांना साधनेत आणले. साधना करू लागल्यापासून अनेक कठीण प्रसंग येऊनही त्यांनी स्वतःला गुरुसेवेत पूर्णपणे झोकून दिले आहे. त्यांची काही ठळक गुणवैशिष्ट्ये गुरुचरणी समर्पित करत आहे. त्यांना सर्व साधक ‘श्री. पिसोळकरकाका’ या नावानेच ओळखतात. त्यामुळे या लेखात मी त्यांचा उल्लेख तसाच करत आहे.

श्री. श्रीकांत पिसोळकर

१. साधना सांगतांना आग्रही भूमिका नसणे

श्री. पिसोळकरकाकांनी आम्हाला प्रथम साधना सांगितली आणि आजही ते आम्हाला वेळोवेळी योग्य दृष्टीकोन देतात. त्यांचा कधीही ‘त्यांनी दिलेला दृष्टीकोन स्वीकारायलाच हवा किंवा आचरणात आणायलाच हवा’, असा अट्टहास नसायचा. ते ‘योग्य आणि अयोग्य काय ?’, ते सांगतात आणि नंतर त्यापासून अलिप्त रहातात. त्यांनी मला साधनेच्या आरंभीच सांगितले होते, ‘‘तू पूर्णवेळ साधना करू लागल्यावर काही कालावधीनंतर आपल्याला आपले मन मायेकडे ओढते. त्या वेळी मायेतील विचारांकडे दुर्लक्ष करून आपण स्वतःला सेवेत गुंतवून ठेवायचे. त्यामुळे ते विचार निघून जातात.’’ त्यांचा हा समुपदेश मला आजही मार्गदर्शक आहे.

सौ. माया पिसोळकर

२. सर्वस्वाचा त्याग करणे

पिसोळकरकाकांनी साधनेला आरंभ केल्यावर भविष्याचा कुठलाही विचार न करता नोकरी सोडली. ते सेवेसाठी कित्येक मास कुटुंबापासून दूर रहायचे. गुरुसेवेपुढे ते दुसरा कसलाच विचार करत नसत. कौटुंबिक कार्यक्रमासाठी कुठे जायचे असेल आणि त्या वेळी सेवा आली, तर ते सेवेलाच प्राधान्य देतात. काही दिवस गोवा येथे आल्यावर ते आधी आश्रमात भ्रमणभाष करून ‘आश्रमात काही सेवा आहे का ?’, असे विचारतात.

३. उत्कृष्ट संघटनकौशल्य

श्री. पिसोळकरकाकांनी आतापर्यंत अनेक युवकांना धर्मकार्याशी जोडले आहे. ते युवकांमध्ये धर्मप्रेम रुजवतात आणि त्यांना साधनेलाही उद्युक्त करतात. सर्व युवक त्यांना ‘काका’ म्हणून संबोधतात आणि त्यांचे आदराने सर्व ऐकतात अन् त्याप्रमाणे अनुकरण करतात.

४. परात्पर गुरु डॉक्टरांनी पिसोळकरकाकांच्या प्रामाणिकपणाविषयी केलेले कौतुक !

आरंभीच्या काळात परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक जिल्ह्यात साधकांना भेटण्यासाठी जायचे. तेव्हा ते संस्थेचा आणि साधकांच्या सेवेचा आढावा तपासत. त्या वेळी विदर्भाचा आढावा घेण्याचे दायित्व पिसोळकरकाकांकडे होते. एकदा पिसोळकरकाकांनी परात्पर गुरुदेवांना आढावा दाखवला. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर त्यांना म्हणाले, ‘‘मला तुमचा आढावा पहाण्याची आवश्यकता नाही.’’ हा प्रसंग म्हणजे पिसोळकरकाकांना त्यांच्या प्रामाणिकपणाची गुरूंनी दिलेली पोचपावतीच होती.

अधिवक्ता योगेश जलतारे

५. गुरूंवर नितांत श्रद्धा

अ. श्री. पिसोळकरकाकांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. त्यांच्या मनात सतत ‘गुरुदेवांच्या कृपेनेच स्वत:चे जीवन आणि साधना चालू आहे’, याची जाणीव असते. मुलांचे शिक्षण असो किंवा त्यांचा विवाह असो, सर्व काही गुरूंवर सोपवून ते निश्चिंत असतात. त्यामुळे त्यांना तशा अनुभूतीही येतात.

आ. पिसोळकरकाकांनी त्यांच्या श्रद्धेच्या बळावर ‘त्यांचे अकोला येथील घर योग्य किमतीला विकले जाणे, गोवा येथे अल्प दरात दुसरे चांगले घर मिळणे, मुलांचे विवाह साधकांच्या घरातच होणे, योग्य वेळी आवश्यक तेवढ्या धनाची सोय होणे’, अशा कितीतरी अनुभूती घेतल्या आहेत.

इ. ते कुठल्याही शासकीय कामासाठी जातांना गुरूंना प्रार्थना करून जातात आणि तेथे नामजप करत उभे रहातात. त्यानंतर ते ज्या व्यक्तीशी बोलतात, ती व्यक्ती त्यांना पूर्ण साहाय्य करते. त्यांची सर्व कामे विनासायास पार पडतात, हे मी कितीतरी वेळा अनुभवले आहे. यामागे केवळ त्यांची गुरूंवरील श्रद्धा हे एकमेव कारण आहे.

६. कृतज्ञताभाव

काही मासांपासून पिसोळकरकाकांच्या बोलण्यात कृतज्ञताभाव अधिक आढळतो. ते ‘प्रत्येक गोष्ट गुरूंच्या कृपेने होत आहे’, असे वारंवार सांगतात. तो आनंद त्यांच्या तोंडवळ्यावरही दिसतो.

श्री. पिसोळकरकाकांमध्ये असे अनेक गुण आहेत. ‘त्यांचे संचित, प्रारब्ध लवकरात लवकर संपून त्यांच्यातील गुणांच्या आधारे त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती करवून घ्यावी’, अशी गुरुचरणी प्रार्थना करतो.’

– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.७.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक