गोल्डबर्ग यांचा गुन्हा !

  • हिंदुविरोधी घटकांना ताळ्यावर आणण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन अपरिहार्य !
  • जगभरातील हिंदुविरोधी प्रसारमाध्यमांवर हिंदूंनी वचक निर्माण करणे आवश्यक !

सुप्रसिद्ध अमेरिकी कलाकार व्हूपी गोल्डबर्ग या ‘एबीसी’ वृत्तसंकेतस्थळावर ‘द व्ह्यू’ (the view) या चर्चासत्रात सूत्रसंचालक म्हणून कार्यरत आहेत. अलीकडेच वृत्तवाहिनीवर ज्यूंच्या झालेल्या वंशसंहाराविषयी चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात गोल्डबर्ग यांनी ‘नाझींनी ६० लाख ज्यूंची केलेली हत्या, हा काही वंशसंहार नव्हता’, असे वादग्रस्त वक्तव्य केले. बस्स ! एवढे कारण त्यांना २ आठवडे निलंबित करण्यासाठी पुरेसे होते. या वृत्तवाहिनीच्या प्रमुख कीम गॉडवीन यांनी तात्काळ पुढे येऊन, ‘निलंबनाच्या काळात गोल्डबर्ग यांना त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे काय परिणाम झाला ? याविषयी अभ्यास करण्यास सांगितले आहे. ‘एबीसी’ वृत्तवाहिनी आमचे ज्यू मित्र आणि ज्यू समाज यांच्यासमवेत आहे’, असे वक्तव्य केले. गोल्डबर्ग यांनी सामाजिक माध्यमांवर विरोध झाल्यावर तात्काळ क्षमायाचना केली; मात्र त्याचा परिणाम वृत्तवाहिनीवर झाला नाही. लक्षात घ्या, व्हूपी गोल्डबर्ग या अमेरिकेतील वलयांकित व्यक्ती आहेत. त्या अभिनेत्री, विनोदी कलाकार, लेखिका आणि छोट्या पडद्यावरील नामांकित कलाकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांना मानाचे ‘ॲमी’, ‘ग्रॅमी’, ‘ॲकेडमी’ आणि ‘टॉनी’ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एवढा मान आणि प्रतिष्ठा त्यांचे निलंबन रोखू शकले नाही. आणखी एक सूत्र म्हणजे गोल्डबर्ग या कृष्णवर्णीय आहेत. सध्या केवळ अमेरिकेतच नव्हे, तर जगभर कृष्णवर्णियांच्या संदर्भात सहानुभूतीची लाट आहे; मात्र निलंबन करतांना त्यांच्या ‘कृष्णवर्णीय’ असण्याकडेही डोळेझाक करण्यात आली. एबीसी न्यूज ही वॉल्ट डिस्नीच्या मालकीची वृत्तवाहिनी. ‘वॉल्ट डिस्नी’ हे अमेरिकेतील प्रख्यात आस्थापन. मनात आणले असते, तर थातूरमातूर कारण सांगून गोल्डबर्ग यांची बाजू घेत सारवासारव करणे या आस्थापनाला सहज शक्य होते; मात्र तसे काहीच झाले नाही. अमेरिकेत अभिव्यक्तीस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य या गोष्टींना अधिक महत्त्व आहे. ‘आम्ही काय खावे’, ‘काय प्यावे’, ‘कोणते कपडे घालावेत’, याविषयी कुणी कुणाला विचारण्याची सोय नसते; मात्र ज्या वेळी गोष्ट ज्यूंची असते, त्या वेळी अमेरिका आणि तेथील वृत्तवाहिन्या असले सर्वच प्रकारचे ‘स्वातंत्र्य’ खुंटीला टांगून ठेवते. या प्रकरणातही गोल्डबर्ग यांच्या वक्तव्याला पुष्कळ विरोध झाला किंवा ज्यूंनी मोर्चा काढला, आंदोलने केली, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना निवेदन सादर केले, असे काहीच झाले नाही. त्यात गोल्डबर्ग या क्षमा मागूनही मोकळ्या झाल्या; मात्र ज्यूंचा दराराच असा की, एबीसी वृत्तवाहिनीला गोल्डबर्ग यांच्यावर कारवाई करावीच लागली. गोल्डबर्ग यांच्या ज्यूविरोधी गुन्ह्यातून हिंदूंना हेच शिकायचे आहे.

ज्यूंच्या किंवा इस्रायलच्या विरोधात राळ उठल्यावर अमेरिकेतील ही ‘ज्यू लॉबी’ कार्यरत होते

‘ज्यू लॉबी’चा परिणाम !

अमेरिकी समाजावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि व्यक्तीस्वातंत्र्य यांचा फार मोठा पगडा असतांना गोल्डबर्ग यांच्या प्रसंगात कुणीही त्यांची बाजू घेतल्याचे ऐकिवात नाही. असे का झाले ? ‘ज्यूंचा वंशविच्छेद हा धार्मिक नव्हता, तो वांशिक होता, एवढी साधी गोष्टही गोल्डबर्ग यांना कशी ठाऊक नाही ?’, असाच सूर अमेरिकी समाजातील अनेकांनी आळवला. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा सूर आळवणार्‍यांनी या प्रसंगात अशी कोलांटी उडी कशी घेतली ? त्याचे उत्तर असे की, अमेरिकेच्या आर्थिक नाड्या या ज्यूंच्या हातात आहेत. तेथील अनेक उद्योजक, महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्ती या ज्यू आहेत. ते इस्रायलप्रेमी आहेत. ज्यूंच्या किंवा इस्रायलच्या विरोधात राळ उठल्यावर अमेरिकेतील ही ‘ज्यू लॉबी’ कार्यरत होते आणि अमेरिका सरकार आणि प्रशासन यांच्यावर दबाव आणण्यास आरंभ करते. ज्यूंनी गेली अनेक वर्षे अमेरिकेतील सामाजिक आणि राजकीय स्तरांवर वचक निर्माण केला आहे. गोल्डबर्ग यांचे झालेले निलंबन हा त्याचाच परिणाम आहे.

भारतात असे कधी होणार ?

भारतात हिंदुविरोधी वक्तव्ये करणे, हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता यांच्यावर अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली टीका करणे, हे नित्याचेच झाले आहे; मात्र स्वरा भास्कर, नसिरूद्दीन शाह, जावेद अख्तर यांच्यावर कारवाई झाली किंवा वृत्तवाहिन्यांमध्ये कार्यरत असलेले हिंदुविरोधी राजदीप सरदेसाई, सागरिका घोष, बरखा दत्त यांनी हिंदुविरोधी विधाने केली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली, असे कधी होऊ शकते का ? ‘असे का होत नाही ?’, याचा विचार हिंदूंनी करायला हवा. जे ज्यूंना जमते, ते हिंदूंना का शक्य होत नाही ? अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा फटका ज्यूंना बसत नाही का ? तो ज्यूंना आणि इस्रायल यांनाही बसतो; मात्र त्याचा परिणाम तो स्वतःवर होऊ न देता विरोधकांवर सातत्याने दबाव कसा निर्माण करता येईल, यासाठी तो प्रयत्न करतो. अमेरिकेतील अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये ज्यू पत्रकार कार्यरत आहेत. हेच कशाला ‘ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांमध्ये ज्यू लॉबी कार्यरत असल्यामुळे तेथे इस्रायलविरोधी बातम्या प्रसारित केल्या जात नाहीत’, अशी टीका केली जाते. यातून स्वतःची प्रतिमा जगभरात उजळण्यासाठी आणि उंचावण्यासाठी इस्रायल कोणत्या थरापर्यंत प्रयत्न करतो, हे आपल्या लक्षात येईल. ‘अमेरिकेतील किंवा अन्य देशांतील प्रसारमाध्यमांमध्ये ‘हिंदुप्रेमी मानसिकतेच्या पत्रकारांची लॉबी कार्यरत’, असे कधी आपण ऐकतो का ?

केवळ भारतातील नव्हे, तर अमेरिकेतील सी.एन्.एन्., न्यूयॉर्क टाइम्स, वॉल स्ट्रीट जर्नल, तर ब्रिटनमधील बीबीसी ही मोठी प्रसारमाध्यमे हिंदुविरोधी आणि भारतविरोधी आहेत. हिंदूबहुल भारतातील हिंदुविरोधी प्रसारमाध्यमांवर वचक निर्माण करू न शकणारे हिंदू विदेशातील हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांची तोंडे कशी बंद करणार ? हिंदूंनी हे आव्हान स्वीकारावे ! यासाठी हिंदूंचे परिणामकारक हिंदूसंघटन हवे. ‘जग झुकते, झुकवणारा हवा’, अशी म्हण आहे. ज्यू आणि इस्रायल जगाला असेच झुकवत असतात. हिंदूंनीही बौद्धिक, आर्थिक आणि सामरिक क्षमता निर्माण करून जगाला झुकवावे. त्या दिवसाची समस्त हिंदू वाट पहात आहेत !