जांभळाला जीआय मानांकनासाठी कोकण कृषी विद्यापिठाने घेतला पुढाकार !

दापोली – कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण फळपिकांना जीआय मानांकन मिळण्यासाठी कोकण कृषी विद्यापिठाने पुढाकार घेतला आहे. त्यावर आता नवे संशोधनही चालू झाले असून पालघर बहाडोलीचे जांभूळ आणि बदलापूरचे जांभूळ हे जीआय मानांकनासाठी प्रतवारीमध्ये सर्वोत्तम ठरले आहे. यापूर्वी अलिबागचा पांढरा कांदा, देवगड आणि रत्नागिरीचा हापूस, श्रीवर्धनची सुपारी ही फळपिके जीआय मानांकनासाठी प्रस्तावित झाली आहेत.

कोकण कृषी विद्यापिठाचे विस्तार संचालक डॉ. संजय भावे आणि फळपिकाच्या संशोधनात अग्रभागी असलेले सहयोगी प्राध्यापक डॉ. जितेंद्र कदम यांनी याविषयी माहिती देतांना कोकणातील ठराविक भागांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी फळपिके नैसर्गिकरित्या पहायला मिळत आहेत. यामध्ये देवगड आणि रत्नागिरीचा हापूस याची चव, गोड, आकार, रंग सर्वच उत्तम आहेत. त्यामुळे मानांकनाच्या स्पर्धेत हा सर्वोत्तम ठरला आहे. त्यापाठोपाठ अलिबागच्या पांढर्‍या कांद्याची चव वैशिष्ट्यपूर्ण असून गोडवा अधिक आहे. तसेच औषधी गुणधर्मही आहे. आता तिसर्‍या मानांकनासाठी जाणारे फळ जांभूळ आहे. पालघर तालुक्यातील बहाडोलीचे जांभूळ हे आकाराने मोठे, चवीला उत्तम आणि औषधी गुणधर्म असलेले जांभूळ आहे. अशाच पद्धतीचे जांभूळ ठाणे जिल्ह्यातील बदलापूर भागातही आहे. या दोन्ही जांभळांची प्रतवारी तपासली जात आहे. यावर संशोधनही होत आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर जीआय मानांकनासाठी त्याचा प्रवास चालू होईल, असेही या दोन्ही संशोधकांनी स्पष्ट केले.