सैन्यप्रमुख जनरल नरवणे यांच्या विधानावर पाकच्या परराष्ट्र विभागाने भारताविरोधात कांगावा करणे
‘जनरल नरवणे यांनी ‘आर्मी डे’च्या पूर्वसंध्येला माध्यमांशी वार्षिक वार्तालाप केला. या वेळी त्यांनी भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन यांच्या संदर्भात अनेक सूत्रांवर मते मांडली. त्यात त्यांनी पाकिस्तानच्या संदर्भात म्हटले की, भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर जी शस्त्रसंधी झालेली आहे, ती मागच्या फेब्रुवारीमध्ये झाली होती. केवळ दोन वेळा पाकिस्तानने ही संधी मोडली होती. आतंकवाद न्यून होण्याची लक्षणे दिसत नाहीत. सध्या ३०० ते ४०० आतंकवादी हे भारतात घुसखोरी करण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरांमध्ये प्रतिक्षेत बसले आहेत. या विधानांमुळे पाकचे परराष्ट्र खाते घाबरले. ते म्हणाले, ‘जनरल नरवणे अशा प्रकारची विधाने का करत आहेत ? त्यांचा उद्देश काय ? भारताला एखादे सर्जिकल स्ट्राईक किंवा अन्य अभियान करायची इच्छा नाही ना ? की ज्यामुळे ते परत एकदा पाकिस्तानवर आक्रमण करू शकतात ?’ आम्हाला भारताशी चांगले संबंध ठेवायचे आहेत; पण भारताने असे वागणे चालू केल्यास आम्हाला आवडणार नाही.’
येणार्या काळात भारताचे पाकिस्तानसमवेत संबंध सुधारणे अशक्य !
पाकिस्तानला भारताशी चांगले संबंध ठेवायचे आहेत का ?, तर त्याचे उत्तर आहे, ‘अजिबात नाही !’ ज्याप्रकारे ते काश्मीर खोर्यामध्ये आतंकवाद वाढवण्याचा आणि त्याला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावरून असे अजिबात वाटत नाही. ख्रिस्ती नववर्ष चालू झाल्यापासूनच्या गेल्या काही दिवसांमध्ये ८ चकमकी झाल्या. त्यात ७ हून अधिक आतंकवाद्यांना मारण्यात आले. याचा अर्थ पाकिस्तानचा आतंकवाद पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न चालूच आहे. एवढेच नव्हे, तर तालिबान पाकिस्तानचे साहाय्य घेऊनही काही करील, अशीही भीती आपल्या मनामध्ये आहे. पाकिस्तानची स्थिती वाईट आहे; पण अनेक वेळा तो देशातील परिस्थितीवरील लोकांचे लक्ष हटवण्यासाठी भारताविरुद्ध काहीतरी कारवाई करत असतो. त्यामुळे येणार्या काळात भारताचे पाकिस्तानशी संबंध सुधारणे अशक्य आहे. तसेच पाकिस्तान पुनःपुन्हा भारतात आतंकवाद वाढवण्याचा प्रयत्न करील, हे नेमके जनरल नरवणे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.