हिंदु धर्म सोडून गेलेल्यांना पुन्हा धर्मात आणण्यासाठी मठ आणि मंदिरे यांनी वार्षिक लक्ष्य ठरवावे ! – भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांचे आवाहन

गेल्या १ सहस्र वर्षांत मुसलमान आक्रमक, तसेच ख्रिस्ती पोर्तुगीज यांनी हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले. अशांच्या वंशजांना आता पुन्हा हिंदु धर्मात यावेसे वाटत असेल, तर त्यांच्यासाठी केंद्र सरकारने कायदा बनवून त्यांना हिंदु धर्मांत येण्यासाठी साहाय्य, सुरक्षा दिली पाहिजे. यातून १ सहस्र वर्षांची गुलामगिरी दूर होऊन भारत खर्‍या अर्थाने स्वतंत्र होईल ! – संपादक

भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या (डावीकडे)

बेंगळुरू (कर्नाटक) – ज्या लोकांनी विविध कारणांमुळे सनातन धर्माचा त्याग करून अन्य धर्मांमध्ये प्रवेश केला आहे, त्यांना परत आणण्यासाठी मंदिरे आणि मठ यांनी वर्षभराचे लक्ष्य ठरवले पाहिजे. यासाठी अन्य कोणताही पर्याय नाही आणि विशेष म्हणजे आपल्याकडे कुणी स्वतःहून धर्मात पुनर्प्रवेश करण्यासाठी पुढे येत नाही, असे विधान भाजपचे येथील खासदार तेजस्वी सूर्या यांनी केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. त्यांनी हे विधान उडुपी येथील श्रीकृष्ण मठामध्ये २५ डिसेंबरला केले होते.

तेजस्वी सूर्या यांनीच हा व्हिडिओ ट्वीट करून लिहिले आहे,

१. इस्लाम आणि ख्रिस्ती हे केवळ धर्म नाहीत, तर ती एक राजकीय साम्रज्यवादी विचारसरणी आहे.

२. या दोन्ही धर्मांचे मानणे आहे की, ते सर्वोच्च आहेत. या धर्मांमध्ये आणि हिंदु धर्मामध्ये मूलभूत अंतर आहे. तलवारीच्या बळावर या धर्मांचा प्रसार करण्यात आला. हिंदूंना त्याद्वारे त्यांच्या मातृ-पितृ धर्मातून बाहेर काढण्यात आले.

३. ही विसंगती दूर करण्यासाठी आता केवळ एकच उपाय आहे आणि तो म्हणजे ज्यांनी त्यांचा मातृ-पितृ धर्म सोडला आहे; म्हणजे जे विविध सामाजिक, राजकीय आणि आर्थिक कारणांमुळे हिंदु धर्मातून बाहेर पडले आहेत, त्यांना त्यांच्या मातृ-पितृ धर्म म्हणजे हिंदु धर्मामध्ये परत आणले पाहिजे.

४. अनेक शतकांपासून विदेशी आक्रमणकर्त्यांद्वारे शासन केल्यानंतर भारत आता विश्‍वगुरूच्या रूपामध्ये पुन्हा उभा रहात आहे.

तेजस्वी सूर्या यांच्याकडून धर्मांतराविषयीचे विधान विनाअट मागे !

‘दोन दिवसांपूर्वी उडुपी येथील श्रीकृष्ण मठामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये मी ‘भारतामध्ये हिंदूंचा पुनरुद्धार’ या विषयावर मार्गदर्शन केले होते. माझ्या भाषणातील काही विधानांमुळे खेदजनकरित्या वाद निर्माण झाला आहे. यामुळेच मी विनाअट माझे विधान मागे घेत आहे’, असे ट्वीट तेजस्वी सूर्या यांनी केले आहे.’