गुप्त शासकीय कागदपत्रे सार्वजनिक झाल्याने माहिती झाली उघड !
पणजी, ११ डिसेंबर (वार्ता.) गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉतील) नियमित कनिष्ठ कारकून पदाच्या ८५ टक्के जागांसाठी सत्तरी तालुक्यातील पर्ये आणि वाळपई मतदारसंघांतील उमेदवारांची निवड झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. गोपनीय शासकीय कागदपत्रे सार्वजनिक झाल्याने ही माहिती उघड झाली आहे. याविषयीचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे वाळपई मतदारसंघाचे भाजपचे, तर त्यांचे वडील प्रतापसिंह राणे हे पर्ये मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत.
शासकीय कागदपत्रात दिलेल्या माहितीनुसार गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील नोकरभरतीसाठी उमेदवारांची निवड करणार्या मंडळाने महाविद्यालयातील १०५ नियमित कनिष्ठ जागांसाठी निवडक उमेदवारांची सूची सिद्ध केली आहे. या सूचीतील ८५ टक्के उमेदवार हे पर्ये आणि वाळपई मतदारसंघांतील आहेत. या उमेदवारांची नावे अजूनही अधिकृतपणे घोषित करण्यात आलेली नसली, तरी जागेसाठी निवड केल्याविषयीची पत्रे संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. १०५ मधील ५८ जागा विविध घटकांसाठी आरक्षित आहेत आणि तरीही यामधील ४९ जागांवर वाळपई आणि पर्ये मतदारसंघांतील उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. शासनाने या जागांसाठी २३ मार्च २०२१ आणि ८ ऑक्टोबर २०२१, असे दोन वेळा विज्ञापन देऊन इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले होते. याद्वारे ५ सहस्र ५६० उमेदवारांनी अर्ज केले आणि निवड प्रक्रियेचा एक भाग असलेली लेखी परीक्षाही दिली. या अनुषंगाने एका स्थानिक नेत्याची ध्वनीचकती सामाजिक माध्यमांत प्रसारित झाली आहे आणि यामध्ये मंत्री वाळपई आणि उसगाव येथील नागरिकांना नोकरभरतीचे आश्वासन पूर्ण करणार असल्याचे सांगत आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील नोकरभरतीत गोमंतकियांवर अन्याय झाला असून मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा ! भाजपमधील आमदारांची मागणी
माध्यमांत प्रसारित झालेल्या वृत्ताची नोंद घेऊन तिसवाडी तालुक्यातील भाजपचे आमदार आतानासियो मोन्सेरात, आमदार टोनी फर्नांडिस आणि आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी ११ डिसेंबर या दिवशी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डिन) यांची भेट घेऊन त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेतली. या भेटीनंतर आमदार आतानासियो मोन्सेरात पत्रकारांना म्हणाले, ‘‘गोवा वैद्यकीय महाविद्यालय हे काही खासगी आस्थापन नाही आणि एका व्यक्तीच्या मालकीची नाही. हा गोमंतकियांवर अन्याय आहे. महाविद्यालयातील नोकरभरतीविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करावा.’’
हा मोठा घोटाळा ! ‘आप’
आरोग्य खात्यात नियमांचे उल्लंघन करून नोकरभरती केली जात आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायकिएट्रीक अँड ह्यूमन बिहेवियर’ यांमध्ये ९५ टक्के कर्मचारी हे वाळपई आणि पर्ये मतदारसंघांतीलच आहेत. नोकरीवर नियुक्ती झाल्याचे अधिकृत पत्र देण्यापूर्वीच लोकांना कामावर घेतले जात आहे. गोव्यात पात्र उमेदवारांना स्थान नाही, असा आरोप ‘आप’चे नेते अमित पालेकर यांनी केला आहे.