९४ व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…

साहित्य संमेलनात राजकारण्यांनी लुडबूड करू नये, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते !

‘काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम् ।’

अर्थ : ‘बुद्धिमान माणसांचा वेळ काव्य, शास्त्र, साहित्य, संगीत, कला, विनोद यांचा आनंद घेण्यात व्यतीत होतो’, असे सुभाषित आहे.

महाराष्ट्रात सध्या मात्र ‘साहित्यिकांचे वाद-विवाद चालू झाले म्हणजे मराठी साहित्य संमेलन जवळ आले’, असे लक्षात येते. ‘साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांनी फार लुडबूड करू नये’, अशी एक सर्वसामान्यांची अपेक्षा असते; पण खर्च पेलवत नाही; मग प्रभावशाली नेता असला की, पैशाची चिंता नसते. त्यामुळे आयोजकांना त्यांना टाळता येत नाही. नाशिक येथे ३ डिसेंबरपासून चालू होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून पानिपतकार विश्वास पाटील यांचे नाव घोषित झाले. पानिपतकार विश्वास पाटील यांच्या साहित्यिक योगदानाविषयी कुणालाही आक्षेप नाही; पण सरकारी नोकरीच्या अखेरच्या कालावधीत त्यांनी ज्या त्वरेने किमान ३०० ते ४०० धारिका हातावेगळ्या केल्या, त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.

समाजमाध्यमांच्या प्रभावामुळे पुस्तके खरेदी करून वाचणे अल्प झाले !

जगभरामध्ये कुठल्याही भाषेमध्ये साहित्यिकांचे असे संमेलन होत नाही. आज काळ पालटला आहे. पूर्वीसारखी आजची पिढी ‘सरला-विमला-कमला’च्या कथा-कादंबर्‍या वाचण्यात रमेल, अशी अपेक्षा साहित्यिकांनी करू नये. आज जगण्याचे भान बदललेले आहे. प्रश्न बदलले आहेत. पुष्कळ मोठ्या वेगाने विज्ञान-तंत्रज्ञान क्रांती करत लोकांना आधुनिक सुख-सुविधा घेऊन आले आहे; परंतु तरीही मानवी जीवन सुखी दिसत नाही. माणसाला आज मनोरंजनाची अनेक वेगवेगळी आणि आधुनिक साधने उपलब्ध झाली आहेत. ट्विटर, फेसबूक, यू–ट्यूब, व्हॉट्सॲप, ब्लॉग्ज्, इंस्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांमुळे लोकांना पुस्तके वाचायला लावणे, खरेदी करायला लावणे ही आजच्या काळातील मोठी अवघड गोष्ट झाली आहे.

साहित्यिकांचे नव्हे, तर संतांच्या अभंगाचे घराघरातून वर्षानुवर्षे पारायण होते !

ज्या साहित्यिकांच्या विचारांमध्ये आणि लेखणीमध्ये धार असते, असे साहित्य काळाला पुरून उरतेच अन् लोकांच्या मनाचा ठाव घेते. यामध्ये रणजीत देसाई, बाबासाहेब पुरंदरे, स्वतः विश्वास पाटील अशा एक ना अनेक लेखकांचे विविध साहित्यप्रकारांतील उदंड साहित्य मराठी साहित्यात अंतर्भूत आहे. मराठी साहित्याचे दालन कथा, कविता, कादंबर्‍या, नाटक, आत्मचरित्र आदी सर्वच साहित्यप्रकारांनी समृद्ध आहे; परंतु आजच्या नवीन साहित्यिकांच्या लेखणीमध्ये खरोखरच ती धार आहे का ? सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनसंघर्षात उभे रहायला संघर्ष करायला प्रेरणा देणारे असे साहित्य किंवा एखादे तरी पुस्तक आले का ? कि जे ‘महाराष्ट्रातील घराघरामध्ये गेले आणि त्याचे वाचन झाले.’ अद्याप तो मान कुणाला मिळालेला नाही; पण आज ज्ञानेश्वरी, तुकारामांचे अभंग, समर्थ रामदासस्वामींचे मनाचे श्लोक यांचे मात्र गावागावातून, घराघरातून पारायण होत आहे. इतक्या वर्षांमध्ये त्या तोडीचा असा कुणी साहित्यिक निपजला नाही !

सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर साहित्य संमेलनाने भूमिका घेतली पाहिजे !

सध्या साहित्यिकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा विषय झाला आहे. रोजची वाढणारी महागाई, बेरोजगारी, राजकीय हाणामार्‍या, मोठमोठी आंदोलने वगैरे प्रश्नांवर साहित्यिकांनी भूमिका घेणे अपेक्षित आहे. आपल्या आजूबाजूला अन्याय, अत्याचार, दमन करणार्‍या आणि समाजजीवनावर मोठा परिणाम करणार्‍या घटना घडत आहेत. प्रादेशिक भाषा, बोलीभाषा यांचा गळा दाबणारे धोरण आखले जात आहे. मराठी शाळा बंद केल्या जात आहेत. या आणि अशासारख्या सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर साहित्य संमेलनानेही काही भूमिका घेणे अपेक्षित आहे. मराठी माणसाला वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ करणे, हे साहित्य संमेलनाचे कार्य आहे !

– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे पूर्व.