गोमाता आणि गोवंश यांच्या रक्षणासाठी शेकडो गोप्रेमींची वसई-विरार महानगरपालिकेवर धडक !

  • जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंद !

  • पशूवधगृहांवर कारवाई करण्याचे प्रशासनाचे आश्वासन !

  • पशूवधगृहांवर कारवाई न झाल्यास प्रशासनाविरुद्ध प्रचंड मोर्चा काढण्याची चेतावणी !

मोर्चा काढल्यानंतर पशूवधगृहांवर कारवाई करण्याचे आश्वासन देणार्‍या प्रशासनाने आतापर्यंत ही कारवाई का केली नाही ? याची चौकशी करून सरकारने कर्तव्यचुकार अधिकार्‍यांना सेवामुक्त करून आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक 

मोर्च्यात सहभागी झालेले संत, गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ

मुंबई – वसई, विरार आणि पालघर या परिसरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गोहत्येच्या विरोधात १२ नोव्हेंबरला गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी शेकडोंच्या संख्येने वसई-विरार महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला.

१. विरार येथील फुलपाडा येथून मोर्च्याला प्रारंभ झाला. या मोर्च्यात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे २५० हून अधिक गोप्रेमी सहभागी झाले होते. या मोर्च्याला पोलिसांनी अनुमती नाकारली होती. जमावबंदीचा आदेश असतांनाही मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी मोर्च्याच्या आयोजकांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. (पोलिसांनी अशी तत्परता कधी गोहत्या करणार्‍यांच्या विरोधात दाखवली आहे का ? – संपादक)

२. मोर्च्यानंतर सायंकाळपर्यंत परिसरातील ३-४ पशूवधगृहांवर कारवाई करण्याचे आश्वासन महानगरपालिकेकडून देण्यात आले, तसेच अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने १ मासाचा अवधी मागितला. प्रशासनाने दिलेल्या कालावधीत ही कारवाई केली नाही, तर प्रशासनाविरुद्ध प्रचंड मोर्चा काढू, अशी चेतावणी या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी दिली.

३. या मोर्च्यात वसई येथील सनातन आश्रमाचे पू. धर्मानंदजी महाराज आणि वसईफाटा येथील हनुमान तुलसीधाम गोशाळेचे पू. सदानंद महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. यासह बजरंग दलाच्या कोकण प्रांताचे संयोजक श्री. संदीप भगत, हिंदू गोवंश रक्षा समितीचे श्री. दीप्तेश पाटील, मानद पशु कल्याण अधिकारी श्री. राजेश पाल, अधिवक्ता खुश खंडेलवाल सहभागी झाले होते.

४. महाराष्ट्रात गोवंशहत्या प्रतिबंधित कायदा असतांना मागील काही वर्षांपासून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात अवैधरित्या गोवंशहत्या आणि मांसाची विक्री होत आहे. याविरुद्ध मागील ५ वर्षांत ६० हून अधिक तक्रारी प्रविष्ट होऊनही पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

मोर्च्यानंतर महापालिकेने ३ अवैध मांस विक्रेत्यांचे परवाने रहित केले. याविषयी लवकरच वृत्त प्रसिद्ध करत आहोत.