पावसाळा संपून १ मासही उलटला नसतांना पाणीपुरवठा अनियमित होणे, हे प्रशासनाची पाणीपुरवठा यंत्रणाच अयोग्य असल्याच दर्शवते ! संपतकाळात नागरिकांना अशा समस्येला सामोरे जावे लागत असेल, तर आपत्काळात नागरिकांचे काय हाल होतील ? याचा विचारच नको ! – संपादक
म्हापसा, १० नोव्हेंबर (वार्ता.) वागातोर, कायसूव आणि शापोरा येथील नागरिकांनी अनियमित पाणीपुरवठ्यामुळे १० नोव्हेंबर या दिवशी वागातोर येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी या वेळी शासनाचा निषेध केला. ‘जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत ‘रस्ता बंद’ आंदोलन चालूच रहाणार असल्याची चेतावणी नागरिकांनी दिली. या आंदोलनात सुमारे २०० नागरिकांनी सहभाग घेतला होता.
हणजूण, कायसूव आणि वागातोर येथील नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीवरून गत आठवड्यात म्हापसा येथील पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा नेला होता. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास ‘रस्ता बंद’ करण्याची चेतावणी या वेळी देण्यात आली होती. या आंदोलनानंतर नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू करण्यात आला; मात्र दोन दिवसांनी टँकर नादुरुस्त झाल्याचे कारण पुढे करून सार्वजनिक बांधकाम खात्याने टँकरने होणारा पाणीपुरवठा बंद केला. यामुळे नागरिकांचा उद्रेक झाला. या वेळी आंदोलनकर्ते म्हणाले, ‘‘पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला. खात्याच्या अभियंत्यांना भेटल्यानंतर २ दिवस पाणीपुरवठा सुरळीत केला जातो; मात्र नंतर पुन्हा पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. वागातोर हे जगप्रसिद्ध ठिकाण असूनही या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. या भागात असलेल्या पाणीपुरवठा वाहिन्या ४० वर्षे जुन्या आहेत आणि या वाहिन्या नवीन घालण्याची आवश्यकता आहे. येथील जलवाहिन्यांच्या जाळ्याविषयी खात्याचे अभियंतेच अनभिज्ञ आहेत. खात्याचे अभियंते नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील अभियंत्यांचे अन्यत्र स्थानांतर करावे.’’ या वेळी आंदोलनाचे नेतृत्व पंचसदस्य सुरेंद्र गोवेकर, पंचसदस्य शीतल दाभोळकर, श्री सिद्धेश्वर देवस्थानचे सचिव तथा अधिवक्ता विष्णु नाईक आणि समाजसेवक मायकल मेंडोसा यांनी केले.