वाराणसी येथील काशी विश्‍वनाथ संकुलाचे (कॉरिडॉरचे) ८० टक्के काम पूर्ण

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील काशी विश्‍वनाथ संकुलाचे (कॉरिडॉरचे) ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. ८०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

श्री काशी विश्‍वनाथ मंदिराचे मुख्य कार्यपालक अधिकारी डॉ. सुनील वर्मा म्हणाले की, या कॉरिडॉरचे स्वरूप आकारास आले आहे. या कॉरिडॉरमधील सुशोभीकरणाचे काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल. यासाठी २ सहस्र २०० कामगार गतीने काम करत आहेत. मकराना मार्बलपासून सिद्ध करण्यात आलेल्या ७ प्रकारच्या शिलांद्वारे या कॉरिडॉरला भव्य रूप दिले जात आहे. पूर्ण कॉरिडॉर ५ लाख २७ सहस्र ७३० चौरस फूट भूमीवर बांधला जात आहे. यासाठी ३१४ घरांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. कोरोनाकाळातही उभारणीचे काम थांबले नव्हते. निर्मितीनंतर या विशाल कॉरिडॉरमध्ये २ लाख भाविक येऊ शकतील. काम पूर्ण झाल्यानंतर भाविक कॉरिडॉरच्या बाहेरील भागात गच्चीत उभे राहून गंगा नदीसह मनकर्णिका आणि ललिता या घाटांचेही दर्शन घेऊ शकणार आहेत.