तृणमूल काँग्रेसने गोव्यात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुदिन्हो यांचे आवाहन
पणजी, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – राजकारणाच्या नावावर खून करणे आणि हिंसा करणे, हीच संस्कृती असलेल्या पक्षाने गोव्यात प्रवेश केलेला आहे. गोमंतकियांनी या राजकीय पक्षापासून सावध रहाणे आवश्यक आहे, असे आवाहन पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी केले. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने नुकताच गोव्यात प्रवेश केला आहे; मात्र मंत्री मावीन गुदिन्हो यांनी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता हे आवाहन केले.
मंत्री मावीन गुदिन्हो पुढे म्हणाले, ‘‘पावसाळ्यात जशी अळंबी उगवते, त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात नवनवीन पक्ष उगवू लागले आहेत. हिंसक संस्कृती असलेल्या पक्षाने गोव्यात प्रवेश केला आहे. गोव्यातील निवडणुकांत यापूर्वी कधीही हिंसेचा प्रकार घडलेला नाही आणि गोव्यातील जनता तसा विचारही करू शकत नाही. गोवा हा शांतताप्रिय प्रदेश आहे; मात्र ‘परराज्यांतून १० सहस्र व्यक्ती गोव्यात आणू पहाणारा हा पक्ष गोव्यात गोमंतकियांना हिंसेचे धडे देणार आहे का ?’, असा प्रश्न गोमंतकियांनी त्यांना विचारला पाहिजे. अशा हिंसक प्रवृत्तीच्या राजकीय पक्षापासून गोमंतकियांनी दूर रहावे.’’