नागपूर – ज्या वेळी अतीवृष्टी होऊन पुष्कळ हानी होते, तेव्हा आणीबाणीच्या आधारावरच साहाय्य करता येते. तेव्हा व्यक्तीगत पंचनाम्याची आवश्यकता भासत नाही. पंचनामे होत रहातील; पण शेतकर्यांना तातडीने साहाय्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
ते पुढे म्हणाले की, अतीवृष्टी झालेल्या ठिकाणी मंत्री आणि प्रमुख लोक गेले, तर प्रशासन जागे होते, लोकांना दिलासा मिळतो. कुणीतरी आपले ऐकत आहे, हे लोकांना समजते. अतीवृष्टी झालेल्या ठिकाणी मीही २ ऑक्टोबरपासून ३ दिवसांच्या दौर्यावर जाणार आहे. वाशिम येथून माझा दौरा चालू होणार आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन अधिकाधिक साहाय्य मिळवण्याचा प्रयत्न करू.
सरकारच्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत !
‘राज्यात आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, त्या वेळी सरकारने केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याच घोषणेची अद्याप पूर्तता झालेली नाही.’, असे फडणवीस यांनी सांगितले.