कापराच्या विज्ञापनातून प्रभु श्रीरामचंद्रांचे विडंबन : भाविकांमध्ये तीव्र अप्रसन्नता !

बांदा येथील पत्रकार तथा श्री विठ्ठल मंदिरातील सेवक श्री. आशुतोष भांगले यांनी प्रसारित केला निषेधाचा ‘व्हिडिओ’ !

  • विडंबनाच्या विरोधात आवाज उठवणारे पत्रकार श्री. आशुतोष भांगले यांचे अभिनंदन ! – संपादक 
  • हिंदू त्यांच्या श्रद्धास्थानांच्या विडंबनाविषयी आणि कठोरपणे विरोध करत नसल्याने कुणीही उठतो आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करतो. अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करण्याचा विचारही या उत्पादकांच्या मनात येत नाही; कारण त्यांना नंतर येणार्‍या हिंसक प्रतिक्रियेची आणि स्वतःची जिवाची काळजी असते ! – संपादक 
  • हिंदूंनो, हिंदु धर्म, देवता यांच्या विडंबनेच्या विरोधात आवाज उठवणे हे धर्माचरणच ! – संपादक 
पत्रकार श्री. आशुतोष भांगले

बांदा – कापूर बनवणार्‍या एका आस्थापनाने विविध प्रसारमाध्यमांतून (दूरदर्शन, वेबसाईट, यू ट्यूब) स्वत:च्या कापूर उत्पादनाच्या विज्ञापनासाठी प्रभु श्रीरामचंद्रांची वेशभूषा केलेल्या कलाकाराचा वापर केला आहे. (अशा उत्पादकांवर न्यायालयीन खटले प्रविष्ट करायला हवेत !- संपादक) वेश श्रीरामाचा आणि वर्तन सामान्य युवकासारखे दाखवून विनोद निर्माण करून श्री रामभक्तांच्या भावनांची थट्टा केली आहे. हे विज्ञापन दीर्घकाळ चालू असूनही धर्माचे रक्षक म्हणवणार्‍या नेत्यांनीही याविषयी मौन पाळल्याने आश्चर्य व्यक्त होत असल्याचे सांगत बांदा येथील पत्रकार तथा श्रीविठ्ठल मंदिरातील सेवक श्री. आशुतोष भांगले यांनी या विज्ञापनावर आक्षेप नोंदवला आहे.

या विज्ञापनात श्रीरामाची वेशभूषा केलेला पायात बूट घातलेला युवक कुणालातरी आशीर्वाद देतो, टाळी देतो, ‘सेल्फी’ काढतो. त्याला कापूर आणण्यासाठी आईचा दूरभाष येतो; म्हणून डोक्याला हात लावतो. सायकलने दुकानात जाऊन दुकानदाराला ‘दोस्ता एक कापूर दे !’ म्हणून सांगतो. दुकानदार त्याला श्रीराम समजून वंदन करतो आणि ‘देवाला केवळ याच आस्थापनाचा कापूर वापरा’, असे सांगून कापूर देतो. त्यानंतर त्याच्यासमवेत ‘सेल्फी’ही (भ्रमणभाषवर एखाद्या व्यक्तीसमवेत छायाचित्र काढणे.) काढतो, असे दाखवले आहे.

या विज्ञापनाच्या निषेधार्थ श्री. भांगले यांनी एक ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला असून यामध्ये विज्ञापनाविषयी तीव्र अप्रसन्नता व्यक्त करत म्हटले आहे, ‘ज्या देशात श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. असंख्य रामभक्त आहेत. धर्माचे रक्षण ‘अजेंड्यात’ असलेले बलाढ्य पक्ष आहेत. त्या देशात उघडपणे श्रद्धास्थानांचा अपमान होत आहे. जोपर्यंत संबंधित आस्थापन विज्ञापन बंद करून श्री रामभक्तांची सार्वजनिकरित्या क्षमा मागत नाही; तोपर्यंत मी या आस्थापनाचा कापूर वापरणार नाही.’

भांगले यांचा हा ‘व्हिडिओ’ सध्या सर्वत्र गाजत आहे. ‘ज्या उत्पादनाच्या विज्ञापनात श्रीरामाचा उपहास आहे, ते उत्पादन मी श्री बांदेश्वराला, श्री विठ्ठलाला कसे अर्पण करू शकतो ? भले कितीही मोठे आस्थापन असो, तिला आमच्या श्रद्धास्थानाची थट्टा करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे हे विज्ञापन तात्काळ बंद करावे आणि समस्त भाविकांची सार्वजनिक क्षमा मागावी. तोपर्यंत जगाचे ठाऊक नाही; पण मी स्वत: या आस्थापनाचा कापूर वापरणार नाही’, अशी भूमिका भांगले यांनी घेतली आहे.