यळगूड (जिल्हा कोल्हापूर), २५ सप्टेंबर (वार्ता.) – विशाळगडावरील पुरातन वास्तूंचे जतन व्हावे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सगळीकडे पोचावा, मंदिरांचा जिणोद्धार, किल्ल्यावरील अतिक्रमण काढली जावीत यांसाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती कार्यरत आहे. या कृती समितीस सर्वाेतोपरी साहाय्य करण्याचा ठराव ‘श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषिपूरक सेवा संस्थे’ने केला आहे. हा ठराव नुकताच संस्थेचे व्यवस्थापक श्रीकांत सरनाईक यांच्याकडून हिंदुत्वनिष्ठ श्री. अरविंद माळी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजेंद्र भोजे आणि भारतीय किसान संघाचे श्री. बाबय्या स्वामी यांनी स्वीकारला. या वेळी हनुमान संस्थेचे श्री. एकनाथ शिंदे उपस्थित होते. हा ठराव मिळवण्यासाठी बजरंग दलाचे श्री. विनायक आवळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजेंद्र भोजे यांनी विशेष प्रयत्न केले.
श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषिपूरक सेवा संस्थेने केलेला ठराव !महाराष्ट्रातील प्रसिद्ध विशाळगड किल्ला सर्वांना आकर्षित करून प्रेरणा देणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला सर्वांना नेहमीच स्वराजाची शिकवण देणारा आहे. वर्ष १९९८ पासून हा किल्ला पुरातत्व खात्याच्या कह्यात आहे. पुरातत्व विभाग आणि प्र्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे विशाळगडावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. येथील मंदिराची पडझड झाली आहे. नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीस्थळी जाण्यासाठी साधी पायवाटही नाही. या कामासाठी लढा देत असलेल्या विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषिपूरक सेवा संस्था सर्वतोपरी सहकार्य करण्याचा ठराव करत आहे. |