श्री गणेशमूर्तीवर ‘टॅटू’ काढून तिला पाश्‍चात्त्य वेशभूषा करणार्‍या कलाकाराची भक्तांच्या प्रबोधनानंतर क्षमायाचना !

जागृत गणेशभक्तांकडून प्रबोधन !

आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांनी ७ दशके हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! हिंदूंंना धर्मशिक्षण नसल्यानेच भाविक हिंदूही अशा अयोग्य गोष्टी करतात; त्यामुळे ते पापाचे धनी होतात आणि धर्माची हानी होते ! अन्य पंथीय कधी त्यांच्या श्रद्धास्थानांचे असे विद्रूपीकरण करतात का ? – संपादक

नवी मुंबई – कोपरखैराणे येथील ‘टॅटू’ (शरिरावर विविध चित्रे गोंदवण्याचा पाश्‍चात्त्य प्रकार) काढणार्‍या कलाकाराने प्रसिद्धीसाठी श्री गणेशाच्या मूर्तीवर ‘टॅटू’ काढून तिची पाश्‍चात्त्य वेशभूषा केली. यानंतर त्याने त्याचे चित्रीकरण करून त्यास ‘टॅटूवाला बाप्पा’ हे नाव देऊन सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले; मात्र सामाजिक माध्यमांतून त्याला विरोध होताच या कलाकाराने जाहीर क्षमा मागत त्याची चूक मान्य केली आणि चित्रफीत हटवली.

१. ‘द मुस्टाच टॅटू अँड आर्ट स्टुडिओ’ या नावाने ‘टॅटू’ काढण्याचा व्यवसाय चालवणार्‍या महेश चव्हाण यांनी श्री गणेशमूर्तीची पाश्‍चात्त्य वेशभूषा आणि केशभूषा केली अन् त्याचे चित्रीकरण सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले. या चित्रीकरणावर बर्‍याच गणेशभक्तांनी प्रतिक्रिया लिहित महेश चव्हाण यांना विरोध केला आणि समजावले. (हिंदु देवतांच्या विडंबनाविषयी हिंदू जागृत होत असल्याचा हा परिणाम आहे ! अशा धर्मप्रेमींमुळेच हिंदूंमध्ये धर्माविषयी जागरूकता निर्माण होते ! असे जागृत धर्मप्रेमी हीच धर्माची शक्ती आहेत ! – संपादक)

२. यामुळे चव्हाण यांनी ‘मी कोकणातील असून ‘टॅटूवाला बाप्पा’ साकारला; पण याचा उद्देश गणेशभक्तांची मने किंवा भावना दुखावण्याचा नव्हता. ही मूर्ती आम्ही आमच्या स्टुडिओत ठेवणार होतो; पण सर्वांना माझा हा विचार न पटल्याने मी गणरायास साक्षी मानत हे चित्रीकरण तात्काळ हटवत आहे, तसेच आपणा सर्वांची क्षमा मागत आहे’, असे चित्रीकरण करून व्हिडिओ ‘पोस्ट’ केला.

चव्हाण यांचे प्रबोधन करणार्‍या गणेशभक्तांच्या निवडक प्रतिक्रिया !

१. राहुल गांधी – आपला व्यवसाय चांगला व्हावा, प्रसिद्धी मिळावी म्हणून आपल्याच देवतेच्या प्रतिमेसमवेत खेळणे आणि याचा संबंध अशा कलेशी जोडणे चुकीचे आहे; तुम्हाला खरे तर लाजच वाटायला हवी !

२. ओंकार – मित्रा व्यवसाय वेगळा नि श्रद्धा वेगळी ! देवाचे चित्र काढणे वेगळे आणि देवालाच गोंदवणे हे वेगळे, तू क्षमा मागितली हे ठीक आहे; पण पुढे असा गोंधळ होऊ देऊ नको.