आगामी शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

पणजी, ६ सप्टेंबर (वार्ता.) – गोवा शासन आगामी शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करणार आहे. कोरोना महामारीमुळे यंदा हे धोरण लागू करता आले नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ६० व्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘शैक्षणिक वर्ग ‘कोडींग आणि रोबोटीक्स’च्या माध्यमातून घेणारे गोवा हे पहिले राज्य आहे. शालेय शिक्षकांना ‘कोडींग आणि रोबोटीक्स’च्या माध्यमातून शिकवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी ६० ‘मास्टर ट्रेनर’ना सिद्ध करण्यात आले आहे. इयत्ता ६ वी ते इयत्ता १० वीपर्यंतच्या सर्व शिक्षकांना ‘कोडींग आणि रोबोटीक्स’संबंधी प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी ११ सहस्र शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अनेक विद्यार्थी शुल्क परवडत नसल्याने तांत्रिक शिक्षणापासून वंचित रहात आहेत; मात्र शासनाच्या योजनेमुळे या शुल्कात घट झाली आहे. शिक्षकी पेशामध्ये नावीन्य असलेच पाहिजे.’’ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी वर्ष २०२०-२१ वर्षासाठी १० शिक्षकांना ‘राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान केला.