Ganesh Chaturthi : श्री गणेशाचा संपूर्ण शास्त्रीय पूजाविधी !

पूजेची सिद्धता (तयारी)

पूजेची सिद्धता करतांना स्तोत्रपठण किंवा नामजप कसा करावा ?

पूजेची सिद्धता करत असतांना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व अधिक असते; म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनातल्या मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करू शकतो. (Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)

पूजास्थळाची शुद्धी आणि उपकरणांमधील देवत्वाची जागृती करणे

अ. पूजास्थळाची शुद्धी

१. पूजेच्या खोलीतील केर काढावा. शक्यतो पूजा करणार्‍या व्यक्तीनेच केर काढावा.

२. केर काढल्यावर खोलीतील भूमीचा पृष्ठभाग मातीचा असल्यास ती भूमी शेणाने सारवावी. भूमीचा पृष्ठभाग मातीचा नसल्यास ती भूमी स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी.

३. आंब्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीत गोमूत्र शिंपडावे. गोमूत्र उपलब्ध नसल्यास पाण्यात उदबत्तीची विभूती घालावी आणि ते पाणी खोलीत शिंपडावे. त्यानंतर खोलीत धूप दाखवावा.

आ. उपकरणांमधील देवत्वाची जागृती : देवपूजेची उपकरणे घासूनपुसून स्वच्छ करून घ्यावीत. त्यानंतर त्यांच्यावर तुळशीचे पान किंवा दूर्वा यांनी जलप्रोक्षण (पाणी शिंपडणे) करावे.

इ. रांगोळी काढणे

१. रांगोळी पुरुषांनी न काढता स्त्रियांनी काढावी.

२. श्री गणेशतत्त्वाशी संबंधित रांगोळी काढावी.

३. देवाच्या नावाची किंवा रूपाची रांगोळी न काढता स्वस्तिक किंवा बिंदू यांनी युक्त असलेली रांगोळी काढावी.

४. रांगोळी काढल्यावर तिच्यावर हळदी-कुंकू वहावे.

ई. शंखनाद करणे

१. शंखनाद करतांना उभे राहून मान वरच्या दिशेने करून आणि थोडी मागे झुकवून मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करावा.

२. श्वास पूर्णतः छातीत भरून घ्यावा.

३. त्यानंतर शंखध्वनी करण्यास प्रारंभ करून ध्वनीची तीव्रता वाढवत न्यावी आणि शेवटपर्यंत तीव्र नाद करावा. शक्यतो शंख एका श्वासात वाजवावा.

उ. देवपूजेला बसण्यासाठी पाट घेणे : देवपूजेला बसण्यासाठी आसन म्हणून लाकडी पाट घ्यावा. तो दोन फळ्या जोडून न बनवता अखंड असावा. त्याला लोखंडाचे खिळे मारलेले नसावेत. तो शक्यतो रंगवलेला नसावा. पाटाखाली रांगोळी काढलेली असावी.


पार्थिव श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेचा प्रत्यक्ष पूजाविधी

१. पूजेच्या प्रारंभी करावयाची प्रार्थना

‘हे श्री सिद्धिविनायका, तुझी पूजा भावपूर्ण होऊ दे. पूजा करत असतांना माझे मन सातत्याने तुझ्या चरणी लीन राहू दे. तू प्रत्यक्ष माझ्या समोर आसनस्थ झाला आहेस आणि मी तुझी पूजा करत आहे, असा माझा भाव सतत असू दे. पूजेतील संभाव्य विघ्ने दूर होऊ देत. पूजेतील चैतन्य मला आणि सर्व उपस्थितांना मिळू दे.’

२. कुंकुमतिलक लावणे

पूजकाने (यजमानाने) प्रथम स्वतःला कुंकुमतिलक लावावा.

३. आचमन करणे

उजव्या हाताने आचमनाची मुद्रा करावी. नंतर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर (मुद्रेच्या स्थितीतच) घ्यावे आणि श्रीविष्णूच्या प्रत्येक नावाच्या शेवटी ‘नमः’ हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे –

१. श्री केशवाय नमः । २. श्री नारायणाय नमः । ३. श्री माधवाय नमः । चौथे नाव उच्चारतांना ‘नमः’ या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे. ४. श्री गोविन्दाय नमः । पूजकाने हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावेत अन् शरणागतभावासह पुढील नावे उच्चारावीत. ५. श्री विष्णवे नमः । ६. श्री मधुसूदनाय नमः । ७. श्री त्रिविक्रमाय नमः । ८. श्री वामनाय नमः । ९. श्री श्रीधराय नमः । १०. श्री हृषिकेशाय नमः । ११. श्री पद्मनाभाय नमः । १२. श्री दामोदराय नमः । १३. श्री सङ्कर्षणाय नमः । १४. श्री वासुदेवाय नमः । १५. श्री प्रद्मुम्नाय नमः । १६. श्री अनिरुद्धाय नमः । १७. श्री पुरुषोत्तमाय नमः । १८. श्री अधोक्षजाय नमः । १९. श्री नारसिंहाय नमः । २०. श्री अच्युताय नमः । २१. श्री जनार्दनाय नमः । २२. श्री उपेन्द्राय नमः । २३. श्री हरये नमः । २४. श्री श्रीकृष्णाय नमः ॥ पुन्हा आचमनाची कृती करून २४ नावे म्हणावीत. नंतर पंचपात्रीतील सर्व पाणी ताम्हणात ओतावे अन् दोन्ही हात पुसून छातीशी नमस्काराच्या मुद्रेत जोडावेत.

४. देवतास्मरण

श्रीमन्महागणाधिपतये नमः । इष्टदेवताभ्यो नमः । कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः । स्थानदेवताभ्यो नमः । आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः । सर्वेभ्यो देवेभ्यो नमः । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः । अविघ्नमस्तु । (अर्थ : सर्व संकटांचा नाश होवो.)

सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः ।
लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ॥
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः ।
द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ॥
विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ।
सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते ।।
लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः ।
येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः ।।
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥
विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् ।
सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ॥
अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः ।
सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ॥
सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः ।
देवा दिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ॥

५. ‘देशकाल’ आणि ‘संकल्प’

‘देशकाल’ उच्चारून झाल्यानंतर ‘संकल्प’ उच्चारायचा असतो.

५ अ. देशकाल : पूजकाने स्वतःच्या दोन्ही डोळ्यांना पाणी लावून पुढील ‘देशकाल’ म्हणावा.

श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणपथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवाहन शके अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके शोभकृत् नाम संवत्सरे, दक्षिणायने, वर्षा ऋतौ, भाद्रपद मासे, शुक्ल पक्षे, चतुर्थ्यां तिथौ, भौम वासरे, स्वाती (१३.४८ नंतर विशाखा) दिवस नक्षत्रे, वैधृति योगे विष्टी करणे(१३.४४ नंतर बव करणे), तुला स्थिते वर्तमाने श्रीचंद्रे, कन्या स्थिते वर्तमाने श्रीसूर्ये, मेष स्थिते वर्तमाने श्रीदेवगुरौ, कुंभ स्थिते वर्तमाने श्रीशनैश्चरे, शेषेषु सर्वग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु एवङ् ग्रह-गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ…

५ आ. ‘देशकाला’च्या संदर्भातील सूचना

ज्यांना वरील ‘देशकाल’ म्हणणे शक्य नसेल, त्यांनी पुढील श्लोक म्हणावा आणि नंतर ‘संकल्प’ उच्चारावा.

तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च । योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् ॥

५ इ. संकल्प : उजव्या हातात अक्षता घेऊन ‘संकल्प’ उच्चारावा.

मम आत्मनः परमेश्वराज्ञारूपसकलशास्त्र-श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्तिद्वारा श्रीपरमेश्वर-प्रीत्यर्थं मम श्रीसिद्धिविनायकप्रीतिद्वारा सकल-पापक्षयपूर्वकं सर्वकर्मनिर्विघ्नत्वपुत्रपौत्राभिवृद्धि-महैश्वर्यविद्या विजयसंपदादिकल्पोक्तफलसिद्ध्यर्थम् श्री उमामहेश्वरसहित श्रीसिद्धिविनायक-देवताप्रीत्यर्थं ध्यानावाहनादि षोडशोपचारैः पूजनमहं करिष्ये । तत्रादौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थं श्री महागणपतिपूजनं करिष्ये । शरीरशुद्ध्यर्थं विष्णुस्मरणं करिष्ये । कलशशङ्खघण्टादीपपूजनं च करिष्ये ॥

५ ई. ‘संकल्पा’च्या संदर्भातील सूचना

प्रत्येक वेळी डाव्या हाताने पळीभर पाणी घेऊन ते उजव्या हातावरून खाली सोडतांना ‘करिष्ये’ असे म्हणावे.

५ उ. ‘देशकाल’ आणि ‘संकल्प’ यांचा अर्थ : महापुरुष भगवान श्रीविष्णूच्या आज्ञेने प्रेरित झालेल्या या ब्रह्मदेवाच्या दुसर्‍या परार्धामधील विष्णुपदातील श्रीश्वेतवाराह कल्पामधील वैवस्वत मन्वंतरामधील अठ्ठाविसाव्या युगातील चतुर्युगातील कलियुगाच्या पहिल्या चरणातील जम्बु द्वीपावरील भरतवर्षामध्ये भरत खंडामध्ये दंडकारण्य देशामध्ये गोदावरी नदीच्या दक्षिण तटावर बौद्धावतारात रामक्षेत्रात सध्या चालू असलेल्या शालिवाहन शकातील व्यावहारिक शोभकृत् नावाच्या वर्षातील दक्षिणायनातील वर्षा ऋतूतील, भाद्रपद मासातील, शुक्ल पक्षातील चतुर्थी या तिथीला मंगळवारी, स्वाती नक्षत्रातील, वैधृति योगातील, विष्टी करणातील, चंद्र तूळ राशीत असतांना, सूर्य कन्या राशीत असतांना, गुरु मेष राशीत असतांना आणि शनि कुंभ राशीत असतांना या शुभघडीला ग्रहगुणविशेषांनी युक्त शुभ आणि पुण्यकारक अशी आज तिथी आहे. सर्व शास्त्रे  आणि श्रुती-स्मृती-पुराणे ही मला परमेश्वराच्या आज्ञेसारखी आहेत. यांत सांगितलेले फळ मला मिळावे आणि परमेश्वराने माझ्यावर प्रसन्न व्हावे, यासाठी मी हे पूजन करत आहे.

श्रीसिद्धिविनायकाच्या कृपेने सर्व पापांचा क्षय होऊन सर्व कर्मांतील विघ्ने दूर व्हावीत; तसेच पुत्रपौत्रांची भरभराट व्हावी; चांगले वैभव लाभावे; शास्त्रांत सांगितलेल्या विद्या, विजय, संपत्ती इत्यादी फळांची प्राप्ती व्हावी, या उद्देशाने श्री उमामहेश्वरसहित श्रीसिद्धिविनायक-देवता यांना प्रसन्न करण्यासाठी मी ही पूजा करत आहे. त्यामध्ये विघ्ननाशनासाठी महागणपतिपूजन आणि शरीरशुद्धीसाठी विष्णुस्मरण करत आहे. कलश, घंटा आणि दीप यांचीही पूजा करत आहे.

६. श्री महागणपतिपूजन

प्रथम पार्थिव मूर्तीच्या समोर किंवा उपलब्ध स्थानानुसार ताम्हण अथवा केळीचे पान ठेवावे. त्यावर श्रीफळ ठेवतांना त्याची शेंडी आपल्या दिशेने ठेवावी. नंतर चंदनादी उपचारांनी श्री महागणपतीचे पूजन करावे.

६ अ. ध्यान : नमस्काराची मुद्रा करून हात छातीशी घ्यावेत आणि श्री महागणपतीचे रूप डोळे मिटून मनात आठवावे. श्लोक म्हणावा.

वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
श्री महागणपतये नमः । ध्यायामि ॥

६ आ. आवाहन : उजव्या हातात (मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता घेऊन ‘आवाहयामि’ म्हणतांना त्या श्रीफळरूपी महागणपतीच्या चरणी वहाव्यात.

श्रीमहागणपतये नमः ।
महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि ॥

६ इ. आसन : उजव्या हातात अक्षता घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना त्या श्री महागणपतीच्या चरणी वहाव्यात.

– श्री महागणपतये नमः । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ॥

६ ई. चंदनादी उपचार : उजव्या हाताच्या अनामिकेने गंध (चंदन) देवाला लावा. त्यानंतर पुढील नाममंत्र म्हणतांना ‘समर्पयामि’ हा शब्द उच्चारत कंसात दिल्याप्रमाणे उपचार देवाच्या चरणी अर्पण करावेत.

श्री महागणपतये नमः । चन्दनं समर्पयामि ॥ (गंध लावावे.)
ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । हरिद्रां समर्पयामि ॥ (हळद वहावी.)
ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । कुङ्कुमं समर्पयामि ॥ (कुंकू वहावे.)
श्री महागणपतये नमः। ऋद्धिसिद्धिभ्यां नमः ।
सिन्दूरं समर्पयामि ॥ (सिंदूर वहावा.)
श्री महागणपतये नमः ।
अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि ॥ (अक्षता वहाव्यात.)
श्री महागणपतये नमः । पुष्पं समर्पयामि ॥ (फूल वहावे.)
श्री महागणपतये नमः ।
दूर्वाङ्कुरान् समर्पयामि ॥ (दूर्वा वहाव्यात.)
श्री महागणपतये नमः । धूपं समर्पयामि ॥ (उदबत्ती ओवाळावी.)
श्री महागणपतये नमः । दीपं समर्पयामि ॥ (निरांजन ओवाळावे.)

उजव्या हातात २ दूर्वा घेऊन त्यावर पाणी घालावे. नंतर दूर्वांनी ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करून (शिंपडून) दूर्वा हातातच धरून ठेवाव्यात आणि आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळ्यांवर (पाठभेद : डावा हात छातीवर) ठेवून नैवेद्य समर्पण करतांना पुढील मंत्र म्हणावेत.

प्राणाय नमः । अपानाय नमः ।
व्यानाय नमः । उदानाय नमः । समानाय नमः । ब्रह्मणे नमः ॥

टीप : वेदोक्त पूजाविधीमध्ये ‘प्राणाय नमः ।’ या ठिकाणी ‘ॐ प्राणाय स्वाहा ।’ अशा प्रकारे मंत्र म्हणतात.

हातातील एक दूर्वा नैवेद्यावर आणि दुसरी दूर्वा श्री गणपतीच्या चरणी वहावी. हातावर पाणी घेऊन पुढील प्रत्येक मंत्र म्हणत ते पाणी ताम्हणात सोडावे.

श्रीमहागणपतये नमः । नैवेद्यं समर्पयामि ॥ मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।
मुखप्रक्षालनं समर्पयामि ॥ (गंध-फूल वहावे.)
करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि ॥

नमस्काराची मुद्रा करून प्रार्थना करावी.

कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि गणनायक ॥

यानंतर पळीभर पाणी घ्यावे आणि ‘प्रीयताम्’ हा शब्द म्हणतांना ते ताम्हणात सोडावे.

अनेन कृतपूजनेन श्री महागणपतिः प्रीयताम् ।

७. श्रीविष्णुस्मरण

दोन्ही हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीशी हात जोडावेत. नंतर ९ वेळा ‘विष्णवे नमो’ म्हणावे अन् शेवटी ‘विष्णवे नमः ।’ असे म्हणावे.

८. पूजेशी संबंधित उपकरणांचे पूजन

८ अ. कलशपूजन

गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धुकावेरि जलेऽस्मिन्सन्निधिं कुरु ॥
कलशे गङ्गादितीर्थान्यावाहयामि ॥ कलशदेवताभ्यो नमः ।
सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ॥

(कलशामध्ये गंध, अक्षता अन् फूल एकत्रित वहावे.)

८ आ. शंखपूजा

शङ्खदेवताभ्यो नमः । सर्वोपचारार्थे गन्धपुष्पं समर्पयामि ॥

(प्रत्येक घरी शंख असतोच, असे नाही. ज्यांच्या घरी शंख असेल, त्यांनी वरीलप्रमाणे पूजन करावे.)

८ इ. घंटापूजा

आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् ।
कुर्वे घण्टारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ॥
घण्टायै नमः । सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ॥

८ ई. दीपपूजा

भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः ।
आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं शान्तिं प्रयच्छ मे ॥
दीपदेवताभ्यो नमः । सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ॥

(दीपदेवतेला हळदी-कुंकू वहाण्याची पद्धतही आहे.)

८ उ. मंडपपूजन : पुढील मंत्र म्हणतांना ‘समर्पयामि’ या शब्दाच्या वेळी मंडपावर गंध, अक्षता आणि फूल वहावे.

मण्डपदेवताभ्यो नमः । गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ॥

८ ऊ. पूजासाहित्य आणि पूजास्थळ यांची, तसेच स्वतःची (पूजकाची) शुद्धी : कलश आणि शंख यांतील थोडेसे पाणी पळीमध्ये एकत्र घ्यावे. पूजकाने पुढील मंत्र म्हणत तुळशीपत्राच्या साहाय्याने ते पाणी पूजासाहित्य, स्वतःच्या सभोवती (भूमीवर) अन् स्वतःवर (स्वतःच्या डोक्यावर) प्रोक्षण करावे (शिंपडावे).

अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा ।
यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः ॥
वरील मंत्र म्हणणे कठीण वाटल्यास ‘श्री पुण्डरीकाक्षाय नमः ।’

हा नाममंत्र म्हणत वरील कृती करावी. त्यानंतर तुळशीचे पान ताम्हणात सोडावे.

९. सिद्धिविनायकाच्या पार्थिव मूर्तीची पूजा

९ अ. श्री गणेशमूर्तीची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा

अ. श्री गणेशमूर्तीची स्थापना पूर्व दिशेला करावी. तसे करणे शक्य नसल्यास पूजकाचे मुख दक्षिण दिशेकडे होणार नाही, अशा रीतीने श्री गणेशमूर्तीची स्थापना करावी.

आ. ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची आहे, त्या पाटाच्या मध्यभागी १ मूठ अक्षता (धुतलेले अखंड तांदूळ) ठेवाव्यात. त्यावर पिंजरीने स्वस्तिक काढावे.

इ. नंतर त्या तांदळावर पुढीलप्रमाणे मूर्तीची ‘प्राणप्रतिष्ठा’ करावी.

‘प्राणप्रतिष्ठा’ म्हणजे मूर्तीमध्ये देवत्व आणणे. यासाठी पूजकाने स्वतःचा उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावून ‘या मूर्तीत सिद्धिविनायकाचे प्राण (तत्त्व) आकृष्ट होत आहेत’, असा भाव ठेवून पुढील मंत्र म्हणावेत.

अस्यश्रीप्राणप्रतिष्ठामन्त्रस्य ब्रह्मविष्णुमहेश्वराय-ऋषयः ऋग्यजुःसामानिछन्दांसि पराप्राण-शक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिः क्रों कीलकम् । अस्यां मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः ॥

ॐ आंह्रींक्रों अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्रींआं हंसः सोहम् । देवस्य प्राणाइहप्राणाः ॥
ॐ आंह्रींक्रों अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्रींआं हंसः सोहम् । देवस्य जीव इह स्थितः ॥
ॐ आंह्रींक्रों अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्रींआं हंसः सोहम् । देवस्य सर्वेन्द्रियाणि ॥
ॐ आंह्रींक्रों अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्रींआं हंसः सोहम् ।
देवस्य वाङ्मनःचक्षुःश्रोत्रजिह्वाघ्राणप्राणा इहागत्य सुखंसुचिरं तिष्ठन्तु स्वाहा ॥

टीप : प्राणप्रतिष्ठेचे वरील मंत्र वेदोक्त आहेत.

अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाः क्षरन्तु च ।
अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन ॥

नंतर ‘ॐ’ किंवा ‘परमात्मने नमः ।’ असे १५ वेळा म्हणावे.

९ आ. षोडशोपचार पूजा

ध्यान : हात जोडून नमस्काराची मुद्रा करावी.

ॐ गणानात्वागणपतिंहवामहे-कविंकवीनामुपमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजंब्रह्मणांब्रह्मणस्पत-आनःशृण्वन्नूतिभिःसीदसादनम् ॥

टीप : हा मंत्र वेदोक्त आहे.

एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजम् । पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । ध्यायामि ॥

१. पहिला उपचार – आवाहन : उजव्या हातात अक्षता घेऊन ‘आवाहयामि’ म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणी वाहा. (अक्षता वहातांना मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून वहाव्यात.)

आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर ।
अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । आवाहयामि ॥

२. दुसरा उपचार – आसन : उजव्या हातात अक्षता घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना देवांच्या चरणी वाहा.

विचित्ररत्नरचितं दिव्यास्तरणसंयुतम् ।
स्वर्णसिंहासनं चारु गृहाण सुरपूजित ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ॥

३. तिसरा उपचार – पाद्य : उजव्या हाताने पळीभर पाणी घ्या आणि ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी देवाच्या चरणांवर प्रोक्षण करा.

सर्वतीर्थसमुद्भूतं पाद्यं गन्धादिभिर्युतम् । विघ्नराज गृहाणेदं भगवन्भक्तवत्सल ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । पाद्यं समर्पयामि ॥

४. चौथा उपचार – अर्घ्य : डाव्या हाताने पळीभर पाणी घ्या. त्या पाण्यात गंध, फूल आणि अक्षता घाला. उजव्या हातात दूर्वा घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी देवाच्या चरणांवर शिंपडा.

अर्घ्यं च फलसंयुक्तं गन्धपुष्पाक्षतैर्युतम् । गणाध्यक्ष नमस्तेऽस्तु गृहाण करुणानिधे ॥ श्रीसिद्धिविनायकाय नमः । अर्घ्यं समर्पयामि ॥

५. पाचवा उपचार – आचमन : डाव्या हातात पळीभर पाणी आणि उजव्या हातात दूर्वा घ्या. नंतर ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी श्री गणपति यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.

विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवन्दितम् ।
गङ्गोदकेन देवेश शीघ्रमाचमनं कुरु ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । आचमनीयं समर्पयामि ॥

६. सहावा उपचार – स्नान : पळीभर पाणी घ्या. मग उजव्या हातात दूर्वा घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी सिद्धिविनायक यांच्या चरणांवर शिंपडा.

गङ्गासरस्वतीरेवापयोष्णीयमुनाजलैः ।
स्नापितोऽसि मया देव तथा शान्तिं कुरुष्व मे ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । स्नानं समर्पयामि ॥

६ अ. पंचामृतस्नान : दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे स्नान घालावे. उजव्या हातात दूर्वा घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर दूध, तद्नंतर शुद्धोदक प्रोक्षण करावे. अशा प्रकारे उर्वरित उपचारांनी देवाला स्नान घालावे.

श्रीसिद्धिविनायकाय नमः । पयस्नानं समर्पयामि ।
तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ॥

पुढील प्रत्येक स्नानानंतर शुद्धोदकाचा वरील मंत्र म्हणून देवांच्या चरणी पाणी प्रोक्षण करावे.

श्रीसिद्धिविनायकाय नमः । दधिस्नानं समर्पयामि ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । घृतस्नानं समर्पयामि ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । मधुस्नानं समर्पयामि ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । शर्करास्नानं समर्पयामि ॥

६ आ. गंधोदकस्नान

श्रीसिद्धिविनायकाय नमः । गन्धोदकस्नानं समर्पयामि ॥
तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ॥

(देवांच्या चरणी पाण्यात गंध अन् कापूर घालून ते प्रोक्षण करावे. नंतर शुद्धोदक प्रोक्षण करावे.)

६ इ. अभिषेक : पंचपात्रीमध्ये पाणी भरून घ्यावे आणि उजव्या हातात दूर्वा घ्याव्यात. नंतर पळीतील पाणी देवावर प्रोक्षण करतांना ‘श्रीगणपति अथर्वशीर्ष’ किंवा ‘संकटनाशन गणपतिस्तोत्र’ म्हणावे.

७. सातवा उपचार – वस्त्र : कापसाची दोन तांबडी वस्त्रे घ्या अन् ‘समर्पयामि’ म्हणतांना त्यांतील एक वस्त्र मूर्तीच्या गळ्यात अलंकारासारखे घाला, तर दुसरे मूर्तीच्या चरणांवर ठेवा.

रक्तवस्त्रयुगं देव देवतार्हं सुमङ्गलम् ।
सर्वप्रद गृहाणेदं लम्बोदर हरात्मज ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । कार्पासनिर्मितं वस्त्रं समर्पयामि ॥

८. आठवा उपचार – यज्ञोपवीत : सिद्धिविनायक यांना यज्ञोपवीत (जानवे) अर्पण करावे.

राजतं ब्रह्मसूत्रं च काञ्चनस्योत्तरीयकम् ।
विनायक नमस्तेऽस्तु गृहाण सुरवन्दित ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । यज्ञोपवीतं समर्पयामि ॥

यज्ञोपवीत हे श्री गणेशाच्या गळ्यात घालावे आणि नंतर ते मूर्तीच्या उजव्या हाताखाली घ्यावे.

९. नववा उपचार – चंदन : श्री गणपतीला अनामिकेने गंध लावावे.

श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरम् ।
विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ॥
श्री रिद्धिसिद्धिभ्यां नमः ।
हरिद्रां कुङ्कुमं समर्पयामि ॥ (हळद-कुंकू वहावे.)
श्रीसिद्धिविनायकाय नमः । सिन्दूरं समर्पयामि ॥

(सिद्धिविनायक यांना शेंदूर वहावा.)

१०. दहावा उपचार – फुले-पत्री : उपलब्ध असलेली विविध प्रकारची फुले आणि पत्री अर्पण करावीत.

माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो ।
मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ॥
सेवन्तिकाबकुलम्पकपाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः ।
बिल्वप्रवालतुलसीदलमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । ऋतुकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि ॥

अंगपूजा : पुढील नावांनी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी किंवा देवाच्या त्या त्या अवयवांवर उजव्या हाताने (मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता वहाव्यात.

श्री गणेशाय नमः । पादौ पूजयामि ॥ (चरणांवर)
श्री विघ्नराजाय नमः । जानुनी पूजयामि ॥ (गुडघ्यांवर)
श्री आखुवाहनाय नमः । ऊरू पूजयामि ॥(मांड्यांवर)
श्री हेरम्बाय नमः । कटिं पूजयामि ॥ (कमरेवर)
श्री कामारिसूनवे नमः । नाभिं पूजयामि ॥ (बेंबीवर)
श्री लम्बोदराय नमः । उदरं पूजयामि ॥ (पोटावर)
श्री गौरीसुताय नमः । हृदयं पूजयामि ॥ (छातीवर)
श्री स्थूलकण्ठाय नमः । कण्ठं पूजयामि ॥ (गळ्यावर)
श्री स्कन्दाग्रजाय नमः । स्कन्धौ पूजयामि ॥ (खांद्यांवर)
श्री पाशहस्ताय नमः । हस्तौ पूजयामि ॥ (हातावर)
श्री गजवक्त्राय नमः । वक्त्रं पूजयामि ॥ (मुखावर)
श्री विघ्नहर्त्रे नमः । नेत्रे पूजयामि ॥ (डोळ्यांवर)
श्री सर्वेश्वराय नमः । शिरः पूजयामि ॥ (मस्तकावर)
श्री गणाधिपाय नमः । सर्वाङ्गं पूजयामि ॥ (सर्वांगावर)

पत्रीपूजा : पुढील नावांनी देठ देवाकडे करून ‘समर्पयामि’ असे म्हणतांना देवाच्या चरणी पत्री वहावी. (सर्व ठिकाणी प्रत्येक प्रकारची पत्री उपलब्ध असेलच, असे नाही. त्यामुळे जी पत्री उपलब्ध झाली नसेल, त्या पत्रीच्या ठिकाणी देवाला २ दूर्वा किंवा अक्षता वहाव्यात.)

श्री सुमुखाय नमः । मालतीपत्रं समर्पयामि ॥ (चमेलीचे पान)
श्री गणाधिपाय नमः । भृङ्गराजपत्रं समर्पयामि ॥ (माका)
श्री उमापुत्राय नमः । बिल्वपत्रं समर्पयामि ॥ (बेल)
श्री गजाननाय नमः । श्वेतदूर्वापत्रं समर्पयामि ॥ (पांढर्‍या दूर्वा) श्री लम्बोदराय नमः । बदरीपत्रं समर्पयामि ॥ (बोर)
श्री हरसूनवे नमः । धत्तूरपत्रं समर्पयामि ॥ (धोतरा)
श्री गजकर्णाय नमः । तुलसीपत्रं समर्पयामि ॥ (तुळस)
श्री गुहाग्रजाय नमः । अपामार्गपत्रं समर्पयामि ॥ (आघाडा)
श्री वक्रतुण्डाय नमः । शमीपत्रं समर्पयामि ॥ (शमी)
श्री एकदन्ताय नमः । केतकीपत्रं समर्पयामि ॥ (केवडा)
श्री विकटाय नमः । करवीरपत्रं समर्पयामि ॥ (कण्हेर)
श्री विनायकाय नमः । अश्मन्तकपत्रं समर्पयामि ॥ (आपटा)
श्री कपिलाय नमः । अर्कपत्रं समर्पयामि ॥ (रुई)
श्री भिन्नदन्ताय नमः । अर्जुनपत्रं समर्पयामि ॥ (अर्जुनसादडा)
श्री पत्नीयुताय नमः । विष्णुक्रान्तापत्रं समर्पयामि ॥ (गोकर्ण)
श्री बटवे नमः । दाडिमीपत्रं समर्पयामि ॥ (डाळिंब)
श्री सुरेशाय नमः । देवदारूपत्रं समर्पयामि ॥ (देवदार)
श्री भालचन्द्राय नमः । मरूबकपत्रं समर्पयामि ॥ (मरवा)
श्री हेरम्बाय नमः । सिन्दुवारपत्रं समर्पयामि ॥ (निगडी / लिंगड)
श्री शूर्पकर्णाय नमः । जातीपत्रं समर्पयामि ॥ (जाई)
श्री सर्वेश्वराय नमः । अगस्तिपत्रं समर्पयामि ॥ (अगस्ति)

यानंतर श्री सिद्धिविनायकाची १०८ नावे उच्चारून दूर्वा वहातात.

११. अकरावा उपचार – धूप : उदबत्ती किंवा धूप दाखवावा.

वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्ध उत्तमः ।
आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । धूपं समर्पयामि ॥

१२. बारावा उपचार – दीप

आज्यं च वर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया ।
दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ॥
भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने ।
त्राहि मां निरयाद् घोेराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । दीपं समर्पयामि ॥ (निरांजन ओवाळावे.)

१३. तेरावा उपचार – नैवेद्य : उजव्या हातात २ दूर्वा (दूर्वा नसल्यास तुळशीपत्र किंवा बेलाचे पान चालेल.) घेऊन त्यांच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडून दूर्वा हातातच धराव्यात. दुर्वांसह पाण्याने नैवेद्याभोवती मंडल करावे. नंतर आपला डावा हात छातीवर ठेवावा तसेच आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी देवतेला त्या नैवेद्याचा गंध (नैवेद्य समर्पित करतांना) देतांना पुढील मंत्र म्हणावा.

नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे ह्यचलां कुरु ।
ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ॥
शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च ।
आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । पुरतस्थापितमधुरनैवेद्यं निवेदयामि ॥
प्राणाय नमः । अपानाय नमः । व्यानाय नमः । उदानाय नमः । समानाय नमः । ब्रह्मणे नमः ॥ नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि ।
उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।

मुखप्रक्षालनं समर्पयामि ॥ फुलाला गंध लावून देवाला वहावे.

श्रीसिद्धिविनायकाय नमः । करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि ॥

अ. आरती : नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करावी.तत्पूर्वी (शंख असल्यास) तीन वेळा शंखनाद करावा. आरती करतांना ‘श्री गणेश प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहे’, या भावाने आरती करावी. आरतीला उपस्थित असलेल्यांनी आरतीचा अर्थ लक्षात घेऊन ती म्हणावी. आरती म्हणतांना ताल धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवाव्यात. घंटा मंजुळ नादात वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे.

आ. कापूर-आरती : आरती झाल्यावर ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी.

१४. चौदावा उपचार – नमस्कार : पुढील श्लोक म्हणून देवाला पूर्ण शरणागतभावाने साष्टांग नमस्कार घालावा.

नमः सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे ।
साष्टाङ्गोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः ॥
नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे ॥
सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटीयुगधारिणे नमः ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । नमस्कारान् समर्पयामि ॥

१५. पंधरावा उपचार – प्रदक्षिणा

यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ॥
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम् ।
तस्मात्कारुण्यभावेन रक्ष माम् परमेश्वर ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । प्रदक्षिणां समर्पयामि ॥

अ. दूर्वायुग्मसमर्पण (पाठभेद : काही ठिकाणी नैवेद्यानंतर दूर्वायुग्म वहातात.)

दूर्वांचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करून पुढील प्रत्येक नावाने दोन दूर्वा एकत्र करून देवाच्या चरणी वहाव्यात, उदा. श्री गणाधिपाय नमः । दूर्वायुग्मं समर्पयामि ॥ याप्रमाणे प्रत्येक नाममंत्र उच्चारल्यावर ‘दूर्वायुग्मं समर्पयामि ।’ असे म्हणावे.

श्री गणाधिपाय नमः । श्री उमापुत्राय नमः । श्री अघनाशनाय नमः । श्री एकदन्ताय नमः । श्री इभवक्त्राय नमः । श्री मूषकवाहनाय नमः ।
श्री विनायकाय नमः । श्री ईशपुत्राय नमः । श्री सर्वसिद्धिप्रदायकाय नमः । श्री कुमारगुरवे नमः ॥

नंतर पुढील श्लोक म्हणून देवाच्या चरणी एकविसावी दूर्वा वहावी.

गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन ।
एकदन्तेभवक्त्रेति तथा मूषकवाहन ॥
विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्नतः ॥ श्री सिद्धिविनायकाय नमः । दूर्वामेकां समर्पयामि ॥

१६. सोळावा उपचार – मंत्रपुष्पांजली आणि प्रार्थना

श्रीसिद्धिविनायकाय नमः । मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि । (देवाला मंत्रपुष्पांजली अर्पण करावी.) नंतर पुढील प्रार्थना करावी.

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ॥
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ॥
अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ॥

अर्थ : मला तुझे आवाहन आणि अर्चन, तसेच तुझी पूजा कशी करावी, हेही ज्ञात नाही. पूजा करतांना काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर. हे देवा, मी मंत्रहीन, क्रियाहीन आणि भक्तीहीन आहे. जी काही मी तुझी पूजा केली आहे, ती तू परिपूर्ण करवून घे. दिवस-रात्र माझ्याकडून कळत नकळत सहस्रो अपराध घडत असतात. ‘मी तुझा दास आहे’, असे समजून मला क्षमा कर.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।
करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ॥

अर्थ : हे देवा, पूजा करतांना माझ्याकडून काया-वाचा-मन-बुद्धी आदींद्वारे काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करावी आणि पूजा परिपूर्ण करून घ्यावी.

अनेन देशकालाद्यनुसारतः कृतपूजनेन श्रीसिद्धिविनायकदेवता प्रीयतां ॥ (हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.)
प्रीतो भवतु । तत्सद्ब्रह्माऽर्पणमस्तु ॥

जयघोष : देवतांच्या नावांचा जयघोष करावा.

१०. पूजेच्या शेवटी व्यक्त करावयाची कृतज्ञता

‘हे श्री सिद्धिविनायका, तुझ्या कृपेने माझ्याकडून भावपूर्ण पूजा झाली. तुझ्या कृपेने पूजा करत असतांना माझे मन सातत्याने तुझ्या चरणी लीन राहिले. पूजेतील चैतन्याचा मला लाभ झाला. यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’

या वेळी डोळे मिटून ‘मूर्तीतील चैतन्य आपल्या हृदयात येत आहे’, असा भाव ठेवावा.

११. तीर्थप्राशन आणि प्रसादग्रहण

उजव्या हातावर तीर्थ घेऊन पुढील मंत्र म्हणून तीर्थ प्राशन करावे.

अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम् ।
देवपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् ॥

श्री सिद्धिविनायकाचे चरण धुतलेले पवित्र तीर्थ प्राशन करून प्रसादही भावपूर्णरित्या ग्रहण करावा.

१२. मोदक वायनदान मंत्र

एका केळीच्या पानावर किंवा ताटामध्ये १० किंवा २१ मोदक ठेवावेत. त्यावर केळीचे पान किंवा ताट उपडे ठेवावे. त्यावर गंध-फूल वहावे. नंतर पुढील मंत्र म्हणून ब्राह्मणाला मोदकाचे वायनदान द्यावे.

विनायक नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय ।
अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
दशानां मोदकानां च दक्षिणाफलसंयुतम् ।
विप्राय तव तुष्ट्यर्थं वायनं प्रददाम्यहम् ॥

यानंतर आचमन करून ‘विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः ।’ असे म्हणावे.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणेश पूजाविधी’) (समाप्त)

सिद्धिविनायकाच्या पार्थिव मूर्तीची उत्तरपूजा

कुलाचाराप्रमाणे मूर्तीचे विसर्जन योग्य दिवशी करावे. त्या वेळी गंध, फुले, धूप, दीप आणि नैवेद्यासाठी दही, भात, मोदक असे पदार्थ पूजेत असावेत.

प्रारंभी स्वतःला कुंकुमतिलक लावावा. नंतर आचमन करावे आणि हातांत अक्षता घेऊन पुढील संकल्प करावा.

सिद्धिविनायकदेवता प्रीत्यर्थम् उत्तराराधनं करिष्ये ।
तदङ्गत्वेन ध्यानगन्धादिपञ्चोपचारपूजनमहं करिष्ये ।
सिद्धिविनायकाय नमः । ध्यायामि ।

१. गंध (चंदन) लावणे

श्रीसिद्धिविनायकाय नमः । विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ॥
श्री रिद्धिसिद्धिभ्यां नमः । हरिद्रां कुङ्कुमं समर्पयामि ॥

२. पत्री आणि फुले वहाणे

श्रीसिद्धिविनायकाय नमः । नानाविधपत्राणि समर्पयामि ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । ऋतुकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि ॥

३. धूप (उदबत्ती) दाखवणे

श्रीसिद्धिविनायकाय नमः । धूपं समर्पयामि ॥

४. दीप ओवाळणे

श्रीसिद्धिविनायकाय नमः ।
दीपं समर्पयामि ॥

५. नैवेद्य दाखवणे

श्रीसिद्धिविनायकाय नमः ।
नैवेद्यं समर्पयामि ॥
अनेन कृतपूजनेन श्रीसिद्धिविनायकः प्रीयताम् ।

(‘प्रीयताम्’ म्हणतांना उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.)

नंतर पुढील मंत्र म्हणावा.

प्रीतो भवतु । तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ।

उजव्या हातात अक्षता घेऊन पुढील मंत्र म्हणावा.

यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।
इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ॥

नंतर त्या अभिमंत्रित अक्षता श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच श्री सिद्धिविनायक यांच्यावर वहाव्यात. नंतर मूर्ती स्थानापासून थोडी हालवावी आणि कुलाचारांनुसार वहात्या पाण्यात तिचे विसर्जन करावे.

॥ ॐ गँ गणपतये नमः ॥

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणेश पूजाविधी’)