पुणे, ३ सप्टेंबर – येणार्या गणेशोत्सवामध्ये विसर्जन घाटांवर श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी पूर्णपणे बंदी असेल, मूर्तींचे विसर्जन हे जागेवरच होईल. कोणत्याही विसर्जन मिरवणुकीला अनुमती नाही. दगडूशेठ, तसेच ५ मानाच्या गणपतींचे विसर्जनही त्याच ठिकाणी होणार आहे. घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी किंवा पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या फिरत्या हौदांमध्ये करावे. त्यामुळे नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विसर्जन घाटावर येऊ नये, असे आवाहन पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पुणेकरांना केले आहे. (श्री गणेशमूर्तीचे धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन केल्यास त्यातील श्री गणेशतत्त्वाचा लाभ सर्वांना होतो. कृत्रिम हौद सिद्ध करण्यासाठी व्यय करण्यापेक्षा गणेशभक्तांना शास्त्रानुसार विसर्जन करण्यासाठी सर्व नियम पाळून सोय उपलब्ध करून देणे अपेक्षित ! – संपादक)