६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि बालसंस्कारवर्गात सांगितलेले साधनेचे प्रयत्न प्रतिदिन करणारा कु. ईशान अरविंद कौसडीकर (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. ईशान अरविंद कौसडीकर हा एक आहे !

उद्या श्रावण कृष्ण पक्ष त्रयोदशी (५.९.२०२१) या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. ईशान अरविंद कौसडीकर याचा नववा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. ईशान कौसडीकर

कु. ईशान अरविंद कौसडीकर याला नवव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. परिस्थिती स्वीकारणे

‘दळणवळण बंदीच्या २ मासांच्या कालावधीत ईशानने कधीही बाहेर जाण्याचा हट्ट केला नाही. त्याने आहे ती परिस्थिती स्वीकारली.

२. उत्तम स्मरणशक्ती

ईशानने त्याच्या आजीने सांगितलेल्या ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांतील गोष्टी चांगल्या लक्षात ठेवल्या आहेत. जेव्हा तो दूरचित्रवाणीवर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका बघायचा, त्या वेळी ‘पुढे काय होणार ?’, याविषयी आधीच सांगायचा.

३. वेशभूषा स्पर्धेत पारितोषिक मिळणे

ईशान शाळेतील शिक्षकांचा लाडका आहे. शाळेत वेशभूषा स्पर्धेत त्याने भगतसिंह यांची वेशभूषा करून खड्या आवाजात संवाद म्हणून दाखवले आणि त्यात त्याला पारितोषिक मिळाले.

४. ईशान प्रतिदिन करत असलेले साधनेचे प्रयत्न

ईशान सनातन संस्थेच्या वतीने चालू असलेला ‘ऑनलाईन बालसंस्कारवर्ग’ नियमितपणे बघतो. बालसंस्कारवर्गातील गोष्टी त्याला पुष्कळ आवडतात आणि त्यात सांगितलेल्या कृती करण्याचा तो प्रयत्न करतो.

अ. ईशान दिवसभराचे नियोजन लिहून त्यानुसार कृती करतो.

आ. तो वहीत नामजप लिहितो, तसेच बसून नामजप करतो.

इ. तो देवतांची विविध स्तोत्रे म्हणतो.

ई. उदबत्तीने वास्तुशुद्धी करतो.

सौ. प्राची कौसडीकर

५. सेवेत साहाय्य करणे

ईशान मला ग्रंथसेवेत, तसेच घरातील कामांतही, उदा. जेवणाची ताटे घेणे, पाणी घेणे, घर आवरणे आदी कामांत साहाय्य करतो. मी सेवेसाठी अथवा इतर कामांसाठी बाहेर जाते. तेव्हा तो घरी एकटा रहातो आणि बाहेर जाण्यासाठी हट्ट करत नाही.

६. भाव आणि श्रद्धा

६ अ. परात्पर गुरुदेवांप्रती भाव : ईशानला रामनाथी आश्रमात जाण्याची आणि परात्पर गुरुदेवांना भेटण्याची पुष्कळ इच्छा होती. डिसेंबर २०१९ मध्ये रामनाथी आश्रमात जाऊन आल्यावर तो पुष्कळ आनंदी झाला. ‘आता आपण पुन्हा कधी जाणार ?’, असे तो विचारतो.

६ आ. नामजपादी उपायांवर श्रद्धा : एप्रिल २०२० मध्ये एकदा रात्री ईशानला पुष्कळ खोकला येत होता. त्या वेळी मी त्याला औषध दिले; पण तरीही त्याचा खोकला थांबत नव्हता. तेव्हा त्याने गळ्याला विभूती लावली आणि त्यानंतर शांत झोप लागल्याचे सांगितले. एकदा मल्हारचे (ईशानच्या मोठ्या भावाचे) डोके पुष्कळ दुखत होते. त्या वेळी ईशानने त्याचे डोके दाबून दिले आणि त्याला अत्तर अन् कापूर लावायला सांगितला.

७. ईशान ६ वर्षांचा असतांना आलेली अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील त्यांच्या खोलीचे छायाचित्र बघतांना ईशान म्हणाला, ‘‘आई, मी नामजप करतांना असेच चित्र बघतो. त्यात पटल, आसंदी असते आणि परात्पर गुरुदेव आसंदीवर बसलेले असतात. तेथे मी खाली बसून नामजप करतो. आई, मला रामनाथी आश्रमात जाऊन परात्पर गुरु डॉक्टरांना बघायचे आहे.’’

८. ईशानचे स्वभावदोष :

भावनाशीलता आणि आळशीपणा.

९. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘गुरुदेवा, ईशानला सतत तुमच्या कृपाछत्राखाली ठेवून त्याची पुढची साधना करवून घ्या’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना !

‘हे लिखाण गुरुदेवांच्या कृपेने झाले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. प्राची कौसडीकर (आई), कोलशेत (जिल्हा ठाणे). (२७.५.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.