पणजी, २१ ऑगस्ट (वार्ता.) – गोवा शासनाचे ‘गोवा खाण महामंडळ’ पुढील ३ मासांत राज्यात खाणव्यवसाय चालू करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. खाण पट्टीतील एक महत्त्वाचा तालुका असलेल्या धारबांदोडा तालुक्यात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. सर्वाेच्च न्यायालयाने वर्ष २०१८ मध्ये ८८ खाणींचे ‘लिज’ (काही वर्षांसाठी भूमी वापरण्यास देण्याचा करार) रहित केल्याने गोव्यात खाणव्यवसाय ठप्प झाला आहे. खाणी चालू करण्यासंबंधी कायमस्वरूपी तोडगा म्हणून शासनाने गोवा खाण महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘गोवा खाण महामंडळ खाणीच्या ‘लिजां’चा लिलाव करणे आणि लिलाव केलेल्या खनिज मालाची वाहतूक करणे, हे काम चालू करणार आहे. गोवा शासन खाणी चालू करण्यासाठी खाणी चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहे; मात्र हे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयात असल्याने शासनाला यासाठी मर्यादा आल्या.’’
धारबांदोडा येथे शैक्षणिक संस्था स्थापन करणार
धारबांदोडा परिसराचा विकास व्हावा, यासाठी तालुक्यात ‘आयआयटी’, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लॉ’ आणि ‘फॉरेन्सिक इन्स्टिट्यूट’ या तीनपैकी एक शैक्षणिक संस्था धारबांदोडा तालुक्यात स्थापन केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.