सावंतवाडी शहरात एम्.टी.डी.सी.च्या माध्यमातून झालेल्या कामांची चौकशी होणार

जिल्हाधिकार्‍यांचे भाजपच्या शिष्टमंडळाला आश्‍वासन  

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्ग – सावंतवाडी नगरपरिषदेच्या येथील उद्यानात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एम्.टी.डी.सी.च्या) माध्यमातून झालेल्या कामात भ्रष्टाचार झाला आहे,  हे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी नक्कीच करू, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी १८ ऑगस्टला भाजपच्या शिष्टमंडळाला दिले. (भ्रष्टाचार झाला हे प्रथमदर्शनी सिद्ध होत असतांना त्यावर आतापर्यंत प्रशासनाने कारवाई का केली नाही ? हा प्रश्‍न आहे. – संपादक)

सावंतवाडी शहरात एम्.टी.डी.सी.च्या माध्यमातून झालेल्या कामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली येथील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी १५ ऑगस्ट या दिवशी येथे उपोषण केले होते, तसेच याविषयी ठोस आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा निर्धार केला होता. त्या वेळी प्रशासनाने आश्‍वासन दिल्यानंतर परब यांनी उपोषण मागे घेतले होते. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत १८ ऑगस्टला जिल्हाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी यांची बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी उपरोक्त आश्‍वासन दिल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.

नगराध्यक्ष परब म्हणाले, ‘‘एम्.टी.डी.सी.’च्या माध्यमातून सावंतवाडी शहरातील उद्यानात झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याची चौकशी करण्याची मागणी मी केली होती; मात्र त्याची कोणतीही नोंद न घेतल्यामुळे १५ ऑगस्टला आम्ही उपोषणाला बसलो होतो. त्या वेळी प्रशासनाने दिलेल्या आश्‍वासनानुसार जिल्हाधिकार्‍यांसमवेत बैठक झाली.

या बैठकीत ‘शहरात झालेल्या कामाचा दर्जा तपासा’, अशी मागणी केली. त्या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी ‘या कामात भ्रष्टाचार झाला आहे, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे या कामाची चौकशी केली जाईल’, असे आश्‍वासन दिले. (एम्.टी.डी.सी.च्या कामात  भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप केल्यानंतर त्या अनुषंगाने चौकशी होणे आवश्यक होते. त्यासाठी लोकप्रतिनिधींना उपोषणाचा मार्ग का अवलंबावा लागला ? – संपादक) या वेळी शहराध्यक्ष अजय गोंदावले, मनोज नाईक, बंटी पुरोहित आदी कार्यकर्ते उपस्थित होते.