आपत्काळाच्या पूर्वसिद्धतेच्या दृष्टीने घराच्या आगाशीत भाज्यांची लागवड करण्यासाठी साधकांनी केलेले प्रयत्न, त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

‘७.६.२०२० या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘आपत्काळाच्या पूर्वसिद्धते’विषयी लेख प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये घराच्या आवारात लावता येणार्‍या भाज्यांची माहिती दिली होती. तो लेख वाचून गुरुकृपेने आम्हाला ‘आपण आजच कृतीला आरंभ करूया’, अशी प्रेरणा झाली आणि आमच्याकडे असलेल्या काही कुंड्या अन् प्लास्टिकचे टब यांमध्ये आम्ही काही बिया पेरल्या. आम्हाला बागकामाविषयी काही अनुभव नव्हता, तरीही ‘हे करणे आपल्याला शक्य होईल का ?’, अशी शंका देवाच्या कृपेमुळे आमच्या मनात आली नाही.

श्री. आणि सौ. कोनेकर यांच्या आगाशीत वाढलेला दोडक्याचा वेल

१. भाजीपाला लावण्याविषयीच्या माहितीचा विविध माध्यमांतून अभ्यास करणे आणि बागकामाविषयी प्रबोधन करणारे नाशिक येथील श्री. संदीप चव्हाण यांचे मार्गदर्शन घेणे 

आम्ही माहितीजालावर (इंटरनेटवर) असलेल्या ‘यू ट्यूब’वर भाजीपाला लावण्याविषयी असलेली माहिती पाहिली, तसेच बागकामाविषयी प्रबोधन करणारे नाशिक येथील श्री. संदीप चव्हाण यांचे मार्गदर्शन घेतले आणि त्यांचे अनेक लेखही वाचले. त्यामुळे हळूहळू ‘काय करावे आणि काय करू नये ?’  हे आमच्या लक्षात आले.

२. आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवण्याचे ठरवणे, गोव्यातील माती मुरुमाची असल्यामुळे सुपीक नसणे आणि त्यामुळे मातीची सुपीकता वाढवण्यासाठी परिश्रम घेणे

गोव्यातील दमट हवामान हे कीटक आणि अळ्या यांच्या वाढीसाठी पोषक आहे. त्यामुळे ‘सेंद्रिय पद्धतीने (नैसर्गिक साधनांचा वापर करून आणि रसायनांचा वापर टाळून) भाजीपाला पिकवणे थोडे कष्टाचे आहे’, हे आमच्या लक्षात आले. तरीही आरोग्याच्या दृष्टीने ‘भाजीपाला पिकवण्यासाठी रसायनांचा वापर करायचा नाही’, असे आम्ही ठरवले. गोव्यातील मातीमध्ये मुरुमाचे प्रमाण अधिक असल्याने तिची सुपीकता अल्प आहे. त्यामुळे ‘या मातीत चांगले उत्पादन मिळवण्यासाठी मातीमध्ये विविध सेंद्रिय घटक (शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र इत्यादी) मिसळून ती पोषक तत्त्वांनी युक्त होण्यासाठी पुष्कळ परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे’, हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे आम्ही आधी मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी परिश्रम घेतले.

३. घरातील ओला कचरा आणि बागेतील पालापाचोळा यांपासून ‘कंपोस्ट’ खत सिद्ध करणे

नंतर आम्ही बागेतून निघणारा सुका पालापाचोळा आणि घरातील ओला कचरा (भाज्या आणि फळे यांच्या साली), यांपासून ‘कंपोस्ट’ खत सिद्ध करण्यास आरंभ केला. या खताचा दुहेरी लाभ झाला. बागेतून निघणारा सुका पालापाचोळा आणि घरातील ओला कचरा, हे सर्व ‘कंपोस्ट’ खत करण्यासाठी वापरल्याने झाडांसाठी अत्यंत पोषक असे खत घरच्या घरी विनामूल्य सिद्ध होऊ लागले. ते पर्यावरणासाठीही पूरक ठरते.

४. झाडांना मातीतील घटक मिळण्यासाठी तिच्यातील सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढणे आवश्यक असणे आणि त्यासाठी लागणारे ‘जीवामृत’ बनवण्यासाठी आवश्यक असलेले देशी गायीचे ताजे शेण अन् गोमूत्र देवाच्या कृपेने सहजतेने आणि विनामूल्य मिळणे

श्री. मयूरेश कोनेकर

मातीतील सूक्ष्म जीवाणू झाडांना आवश्यक असलेले सर्व घटक पुरवण्याचे कार्य करतात. मातीमध्ये कितीही खत घातले, तरी झाडांना मातीतील घटक मिळण्यासाठी तिच्यातील सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढणे आवश्यक असते. त्यासाठी देशी गायीचे ताजे शेण आणि गोमूत्र यांपासून सिद्ध केलेल्या ‘जीवामृता’चा सेंद्रिय शेतीमध्ये उपयोग करतात. आम्ही माहितीजालावरून ते समजून घेतले. नंतर आमच्या घरी दूध द्यायला येणार्‍या काकांना देशी गायीचे शेण आणि गोमूत्र आणून देण्याविषयी विचारले. त्यांनी आम्हाला ते विनामूल्य आणून देण्यास आरंभले. अशा प्रकारे झाडांसाठी जे आवश्यक आहे, ते देव उपलब्ध करून देत होता. ‘मी तुमच्या समवेत आहे’, याची अनुभूतीही देत होता. या प्रक्रियेमध्ये आम्हाला देशी गायींचे महत्त्वही शिकायला मिळाले.

(‘जीवामृत’ बनवण्याची कृती : एका प्लास्टिकच्या बालदीत १० लिटर पाणी, अर्धा किलो देशी गायीचे ताजे शेण, अर्धा लिटर गोमूत्र, कोणत्याही डाळीचे १०० ग्रॅम पीठ, १०० ग्रॅम नैसर्गिक गूळ आणि १ मूठ माती, हे सर्व एकत्र करून चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. ते सुती कापडाने किंवा गोणपाटाने झाकावे. हे मिश्रण ३ दिवस प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ काठीने २ मिनिटे ढवळावे. अशा प्रकारे ‘जीवामृत’ सिद्ध होते. त्यानंतर १ लिटर जीवामृत आणि १० लिटर पाणी, या प्रमाणात एकत्र मिसळून ते झाडांना द्यावे.)

५. अग्निहोत्राच्या विभूतीचा वापर केल्यावर त्याचे पुष्कळ चांगले परिणाम दिसून येणे

माझे वडील श्री. प्रकाश करंदीकर गेल्या काही वर्षांपासून नियमित अग्निहोत्र करतात. आम्ही या अग्निहोत्राची विभूती (राख) मातीमध्ये मिसळली आणि तिचा कीटकनाशक म्हणूनही उपयोग केला. त्याचे चांगले परिणाम आमच्या लक्षात आले.

‘ग्रो बॅग्ज’मध्ये (झाड वाढण्यासाठी उपयुक्त असलेल्या पिशवीचा प्रकार) लावण्यात आलेली विविध भाज्यांची झाडे

६. ऋतूमानाप्रमाणे भाज्या लावणे आणि पूर्वानुभव नसतांनाही भाज्यांचे चांगले उत्पादन मिळणे

या वर्षभरात आम्ही भेंडी, काकडी, वांगी, मिरच्या, टोमॅटो, मुळा, पालक, मेथी, कोथिंबीर, लाल माठ, चवळी, फ्लॉवर, आले, हळद, कांदा, पुदिना, गवार, लाल भोपळा, दुधी भोपळा, दोडके या भाज्या त्या त्या ऋतूंनुसार लावल्या आणि त्यात आम्हाला गुरुकृपेने पुष्कळ यशही मिळाले. माहितीजालावरील लोक गेली १० – १२ वर्षे बागकाम करत आहेत. त्यांच्या चित्रफिती पाहून आम्ही कृती करत होतो. त्यांच्याकडे येणारे उत्पादन आणि आमचे उत्पादन जवळजवळ सारखेच होते. आमच्याकडे केवळ काही मासांचाच अनुभव आहे, तरीही आम्हाला त्यांच्या एवढेच भाज्यांचे उत्पादन मिळाले. तेव्हा ‘देवाला काहीच अशक्य नाही’, हे अनुभवता येऊन आमचे मन कृतज्ञतेने भरून आले.

७. भाज्यांच्या समवेत औषधी वनस्पतींची लागवड करणे

भाज्यांच्या समवेत आपत्काळात उपयुक्त असणार्‍या काही औषधी वनस्पतींची आम्ही लागवड केली आहे, उदा. कृष्ण तुळस, राम तुळस, गवती चहा, कोरफड, नागवेल, दूर्वा, बेल, पानफुटी, ब्राह्मी, कृष्णवसा, मंडूकपर्णी, सर्पगंधा, शतावरी, ओवा, पिंपळी, गूळवेल, हळद, कडूनिंब इत्यादी.

८. घरच्या बागेतील भाज्यांविषयी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

अ. घरच्या बागेतील भाज्या बाजारातील भाज्यांपेक्षा पुष्कळ चविष्ट लागतात.

आ. या ताज्या भाज्या पटकन, म्हणजे अगदी १० मिनिटांत शिजतात.

इ. सामान्यतः बाजारातील भेंडी शिजवतांना तिला तार सुटून ती थोडी बुळबुळीत होते. ‘भेंडीला तार सुटू नये’, यासाठी त्यात काहीतरी आंबट पदार्थ घालावा लागतो. घरच्या बागेतील कोवळ्या ताज्या भेंडीची भाजी केली, ती बुळबुळीत होत नाही.

ई. बाजारातून आणलेला दुधी भोपळा किसतांना त्याच्यावर राप येऊन तो काळसर व्हायला लागतो; परंतु घरच्या बागेत सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या दुधी भोपळ्याचा कीस हिरवागार रहातो.

उ. बाजारातून आणलेल्या मुळ्याची भाजी शिजवतांना त्याचा विशिष्ट उग्र वास घरभर पसरतो; परंतु घरच्या बागेतील ताज्या मुळ्याची भाजी करतांना असा वास येत नाही.

. घरच्या बागेत आलेले पहिले टोमॅटो आणि वांगी आम्ही आश्रमात पाठवली होती. ती भाजी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना दाखवल्यावर त्यांनी ‘त्यांतून सात्त्विक स्पंदने येत आहेत’, असे सांगितले.

सौ. राघवी कोनेकर

९. झाडांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

अ. ‘प्रदूषण न्यून करण्यास झाडे साहाय्य करतात’, असे आम्ही विज्ञानाच्या पुस्तकात वाचले होते; परंतु ‘झाडांच्या सान्निध्यात मनाला सकारात्मक वाटते, मन प्रसन्न होते आणि नवा उत्साह मिळतो’, याचा अनुभवही या वर्षभरात आम्हाला घेता आला.

आ. ऊन, वारा किंवा पाऊस अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये झाडे ठामपणे उभी असतात, तसेच ‘आपणही कुठल्याही स्थितीत स्थिरच रहायला हवे’, हे शिकता आले.

इ. झाडे कुणाकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता सतत इतरांना देत असतात, तसेच आपलाही हात सतत देणारा आणि इतरांना साहाय्य करणारा असावा.

ई. एकदा काकडीच्या वेलीला ३ – ४ काकड्या लागल्या होत्या. तेव्हा आम्हाला अतिशय आनंद झाला; परंतु २ दिवसांनंतर त्यांतील एक काकडी खारीने खाल्ली. तेव्हा मला पुष्कळ वाईट वाटले. नंतर या प्रसंगाचे चिंतन केल्यावर ‘ज्या वेलीने ही काकडी निर्माण केली, तिचे काकडी कुणीही खाल्ली, तरी गार्‍हाणे नव्हते’, असे माझ्या लक्षात आले. याचाच अर्थ ‘निसर्गाने निर्माण केलेल्या बागेतील सर्व माझे आहे’, असे मी म्हणू शकत नाही. ‘त्यात कीटक, पशू आणि पक्षी यांचाही थोडा वाटा असतो’, हे स्वीकारल्यावर आम्हाला वाईट वाटले नाही.

१०. ‘तत्परतेने गुर्वाज्ञापालन केल्याने देवाचा संकल्प कार्यरत होतो’, असे लक्षात येणे

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘भाज्यांची लागवड करा !’, अशी सूचना आल्यावर लगेचच भाज्यांची लागवड करण्याचा विचार देवाने आमच्या मनात घातला आणि आमच्याकडून तशी कृतीही करवून घेतली. ‘तत्परतेने गुर्वाज्ञापालन केल्याने देवाचा संकल्प कार्यरत होतो’, हेही या प्रसंगातून आम्हाला शिकायला मिळाले.

११. कृतज्ञता आणि प्रार्थना

कोणताही पूर्वानुभव नसतांना अल्प कालावधीत आम्हाला बर्‍याच प्रकारच्या भाज्यांची यशस्वी लागवड करता आली आणि २ कुटुंबांना पुरेल, इतकी भाजी मिळू लागली. ‘देवाने आम्हाला माध्यम बनवून ही नवीन सेवा शिकवली आणि गुरुकृपेचीही अनुभूती दिली’, यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘पुढील आपत्काळात साधकांना घरी केलेल्या अशा लागवडीतून अन्न उपलब्ध होवो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’

– श्री. मयूरेश कोनेकर आणि सौ. राघवी कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१.५.२०२१)