‘निर्धार फाऊंडेशन’ने केलेल्या कार्याविषयी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
या कार्यकर्त्यांचा आदर्श सर्वच सामाजिक कार्य करणार्या संघटनांनी घ्यावा.
सांगली, ७ ऑगस्ट (वार्ता.) – महापूर ओसरल्यानंतर उद्धवलेल्या अस्वच्छतेमुळे साथीचे रोग पसरण्याची भीती असते. हे लक्षात घेऊन सांगली शहरात गेली ३ वर्षे अव्याहतपणे काम करणार्या राकेश दड्डणावर आणि ‘निर्धार फाऊंडेशन’ यांनी स्वच्छतेला प्राधान्यक्रम देऊन अभूतपूर्व काम चालू केले आहे. सांगली शहरातील अमरधाम स्मशानभूमी, बौद्ध विहार, मगरमच्छ वसाहत, कर्नाळ रस्ता, महापालिकेच्या शाळा यांसह धामणी, बामणी गावांतील शाळा, मंदिरे, रस्ते, पूल यांचा कायापालट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे सर्व काम विनामोबदला आणि निरपेक्षपणे चालू आहे.
या उपक्रमात दीप कांबळे, सिद्राम कांबळे, ऋषिकेश तूपलोंढे, सहदेव मासाळ, प्रथमेश खिलारे, सतिश कट्टीमणी, सचिन ठाणेकर, सुनील कांबळे, राहुल पवार, रितेश कांबळे, करण कांबळे, महेश घोरपडे यांसह ४० हून अधिक युवक कार्यरत आहेत.
१. अमरधाम स्मशानभूमीची स्वच्छता करणे, हे आव्हानात्मक होते. स्वच्छतेसाठी ३५ कार्यकर्ते ४ दिवस कार्यरत होते. दोन दिवस खोरे, पाटी, जेसीबी यांच्या साहाय्याने चिखल काढण्यात आला. त्यानंतरचे दोन दिवस अग्निशमन दलाची गाडी वापरून ४५ सहस्र लिटर पाणी वापरून ही स्मशानभूमी स्वच्छ करण्यात आली.
२. बामणी गावातील चिखलमय झालेला मुख्य रस्ता आणि पूल स्वच्छ करण्यात आला. यानंतर गावातील मारुति मंदिर, वाल्मिकी मंदिर, जिल्हा परिषद मुलांची शाळा स्वच्छ करण्यात आली.
३. या कामाचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांसह अनेकांनी कौतुक केले आहे.
अमरधाम स्मशानभूमीत काम केल्याचे विशेष समाधान आहे ! – ‘निर्धार फाऊंडेशन’चे राकेश दड्डणावरमहापूर ओसरल्यापासून आम्ही सर्वजण सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत विविध पूरबाधित भागांमध्ये जाऊन स्वच्छता करत आहोत. यात अमरधाम स्मशानभूमीत काम केल्याचे विशेष समाधान आहे. या कामात युवा पिढीची मोलाची साथ मिळत आहे. ही स्वच्छता करतांना कित्येकांना हातापायाला जखमा झालेल्या आहेत. हे सर्व काम आम्ही कुणाकडूनही कसलेच आर्थिक साहाय्य न घेता निरपेक्षपणे केलेले आहे. ही स्वच्छता मोहीम अजून ४ दिवस चालू राहील. तिथून पुढे प्रतिदिन २ घंटे चालेल. |