परोपकार आणि धर्मकार्य हेच जीवनाचे ध्येय मानून अविरत सेवारत रहाणारे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अशोक हिरालाल पाटील!

कै. अशोक पाटील

चोपडा (जिल्हा जळगाव) येथील कै. अशोक हिरालाल पाटील (वय ५९ वर्षे) गेल्या १७ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. ‘हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून होणारी आंदोलने, गुरुपौर्णिमा, हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ यांसारख्या मोठ्या उपक्रमांत कै. पाटीलकाका समाजातील लोकांकडून तन, मन आणि धन अर्पण करून घेत असत.
५.४.२०२१ या दिवशी सकाळी ११ वाजता त्यांचे धुळे येथे निधन झाले. ३.८.२०२१  या दिवशी आपण कै. अशोक पाटील यांच्या कुटुंबियांना जाणवलेली कै. पाटील यांची गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.                                  (भाग ३)

‘कै. अशोक पाटील यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांनी लिहिलेला हा लेख सुंदर आहे. या लेखामुळे कै. अशोक पाटील यांची गुणवैशिष्ट्ये सर्वांना लक्षात येतील. ईश्वराची कृपा आणि कै. अशोक पाटील यांनी तळमळीने केलेल्या साधनेमुळे ते मृत्यूनंतरही प्रगतीच्या वाटेने पुढे जात आहेत !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

श्री. भालचंद्र राजपूत, चोपडा (साधक (हे कै. अशोक पाटील यांच्या दूध डेअरीत काम करतात.))

श्री. भालचंद्र राजपूत

१. ‘काका (कै. अशोक पाटील) कुठल्याही सेवेचे दायित्व तात्काळ स्वीकारायचे आणि ती सेवा परिपूर्ण करायचे.

२. ते साधकांना स्वतःच्या चुका विचारायचे आणि साधकांनाही त्यांच्या चुका सांगायचे.

३. एखाद्या प्रसंगात न अडकता ते त्याकडे साक्षीभावाने पाहून आनंदी रहायचे.

४. काका घरी आणि दुकानांत अग्निहोत्र करत असल्याने ‘त्यांच्या घरी अन् दुकानात चैतन्याचे वलय निर्माण झाले आहे’, असे जाणवणे आणि ‘तुमच्या दुकानात मन निर्विचार होऊन शांत वाटते’, असे ग्राहकांनी सांगितल्यावर काकांनी त्याचे श्रेय श्रीकृष्णाला देणे

प्रतिदिन सूर्योदय आणि सूर्यास्त यां वेळी काका घरी असल्यास घरी किंवा दुकानात असल्यास दुकानात अग्निहोत्र करायचे. त्यामुळे ‘त्यांच्या घरात आणि दुकानात चैतन्याचे वलय निर्माण झाले आहे’, असे मला वाटते. दुकानात येणारे धर्मप्रेमी आणि ग्राहक नेहमी त्यांना सांगायचे, ‘‘आम्ही इतरही सर्व दुकानांत जातो; परंतु तुमच्या दुकानात आल्यावर मन निर्विचार होऊन शांत वाटते.’’ तेव्हा काका श्रीकृष्णाच्या चित्राकडे हात दाखवून ‘श्रीकृष्णच करतो’, असे सांगून कर्तेपणा देवाला अर्पण करायचे.

५. काकांनी स्वतः व्यष्टी साधना गांभीर्याने करणे आणि इतरांमध्येही व्यष्टी साधनेचे गांभीर्य निर्माण करणे

काका आज्ञापालन म्हणून सकाळीच नामजपादी उपाय करून दिवसाचा आरंभ करत असत. काका दिवसभर कितीही व्यस्त असले किंवा रात्री कितीही उशिरा घरी आले, तरी नामजप आणि व्यष्टी साधना परिपूर्ण करूनच झोपत असत. ते कोरोना महामारीच्या कालावधीत साधकांकडून सर्व नियमांचे परिपूर्ण पालन करवून घेत असत. ते साधकांमध्ये व्यष्टी साधना करण्याचे गांभीर्य निर्माण करत असत.

६. काकांच्या दुकानात काम करणार्‍या तरुणांनी ‘काकांनी सांगितलेल्या योग्य उपासनेने आमचा संसार व्यवस्थित चालू आहे’, असे सांगून काकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे

काकांच्या दुकानात अनेक नवीन तरुण कामाला लागले. काही दिवस नोकरी करून ते दुसरीकडे नोकरीला गेले; परंतु काकांना भेटल्यावर ते त्यांना नमस्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत. ते म्हणत, ‘‘काकांनी सांगितलेल्या योग्य उपासनेने आमचा संसार व्यवस्थित चालू आहे.’’ काकांच्या दुकानात नोकरीला लागल्यानंतर एका तरुणाचे मद्याचे व्यसन सुटले आणि आता त्याचा संसार व्यवस्थित चालू आहे.

७. काका रुग्णाईत असतांना त्यांना आलेली अनुभूती

काकांना श्वास घ्यायला त्रास होणे आणि त्यांनी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ छातीवर ठेवल्यावर त्यांना आराम मिळणे : काकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर मी काकांना रुग्णालयात घेऊन गेलो होतो. काकांनी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ समवेत घेतला होता. त्यांना श्वास घ्यायला पुष्कळ त्रास होत होता. तो ग्रंथ छातीवर ठेवल्यावर त्यांना आराम मिळत असे.

८. काकांच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती

८ अ. काकांच्या निधनापूर्वी ३ दिवस मला त्यांच्या शरिराला चंदनाचा सुगंध येत होता.

८ आ. काकांनी शेवटपर्यंत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ धरून ठेवणे आणि त्या वेळी ‘त्यांनी गुरुदेवांचे चरण घट्ट धरले आहेत’, असे वाटून साधकाची भावजागृती होणे : ‘काकांनी देह सोडेपर्यंत ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ धरून ठेवला होता. ते पाहून जणू ‘काकांनी गुरुदेवांचे चरण घट्ट धरले आहेत’, असे वाटून माझा कंठ दाटून आला. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती होऊन मला कृतज्ञता वाटली. तेव्हा ‘एक साधक फूल गुरुदेवांच्या चरणी अर्पण झाले’, असे मला वाटले.

९. काकांचे घरातील गायीवर पुष्कळ प्रेम असणे, काका रुग्णालयात असल्यामुळे ते घरात न दिसल्याने गाय निराश दिसणे, काकांच्या निधनानंतर तिला रडू येणे आणि तिने २ दिवस चाराही नीट न खाणे

काकांनी गाय पाळली होती. काकांच्या दुचाकीचा आवाज ऐकून ती लगेच हंबरायची. काका तिच्या अंगावरून हात फिरवेपर्यंत ती हंबरत रहायची. काका गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयात असल्यामुळे तिला ते दिसले नाहीत. त्यामुळे ती निराश दिसत होती. काकांच्या निधनानंतर घरातील सदस्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून तिला रडू येत होते. तिने २ दिवस चाराही नीट खाल्ला नाही.

‘काकांच्या निधनाने चोपडा शहरातील हिंदुत्वाची हानी  झाली आहे’, अशी प्रतिक्रिया स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केली. – श्री. भालचंद्र राजपूत

 

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक