१. नामजप सत्संगात सांगितल्याप्रमाणे नामजप करतांना आलेल्या अनुभूती
१ अ. श्वासाला जोडून नामजप केल्यावर विचारांचे प्रमाण उणावणे आणि नामजप एकाग्रतेने होऊ लागणे : ‘पूर्वी नामजप करतांना माझ्या मनात पुष्कळ विचार यायचे. त्यामुळे माझा नामजप संख्यात्मक झाला, तरी गुणात्मक होत नव्हता. एका नामजप सत्संगात श्वासाला जोडून नामजप करायला सांगितला होता. मी त्याप्रमाणे केल्यावर माझे लक्ष श्वासावर केंद्रित होऊन विचारांचे प्रमाण उणावले आणि नामजप एकाग्रतेने होऊ लागला. मला देवतेला नामजपासह मानसफूल वहाता आले.’ – सौ. सरला नाईक, पर्वरी, पणजी.
१ आ. काम करतांना नामजप करणे आणि ‘सर्व कामे एकटी कशी करणार ?’, असा विचार मनात आल्यावर देवाने शक्ती दिल्याने सर्व कामे पूर्ण होणे : ‘मी प्रतिदिन नामजप करते. नामजप करतांना मनाला प्रसन्न वाटते आणि ‘देव माझ्या समोर आहे’, असे मला वाटते. पूर्वी मला काम करतांना नामजप करता येत नव्हता. नंतर मी हळूहळू काम करतांना नामजप चालू केला. ‘मी एकटी सर्व कामे कशी करणार ?’, असा विचार मनात आल्यावर देव मला शक्ती देतो आणि सर्व कामे पूर्ण होतात. अशक्य ते शक्य करण्याची शक्ती नामजपात आहे. भावसत्संगातून ‘वेगवेगळ्या भक्तांची भक्ती कशी होती ?’, ते मला समजले. या काळात मला अनेक देवतांचे मानस दर्शनही झाले.’ – सौ. पूनम प्रभुदेसाई, पणजी
१ इ. परात्पर गुरुदेवांचा ग्रंथ हातात घेऊन नामजप करतांना आलेल्या अनुभूती : ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ घेऊन नामजप करतांना मला गुरुदेवांच्या आज्ञाचक्रावर पिवळी ज्योत दिसली आणि त्यांच्या मुखमंडलाभोवती पिवळे वलय अन् तेजोमय प्रकाश दिसला. नामजप करतांना मी खोक्यांचे उपाय केल्याने मला डोक्यात जाणवणार्या त्रासदायक संवेदना न्यून झाल्या.’ – सौ. दिक्षा नागवेकर, पणजी
१ ई. सत्संग ऐकल्याने सर्व कामे करण्यात उत्साह वाटून देवावरील श्रद्धा वाढणे : ‘माझ्या आईच्या आकस्मिक निधनामुळे माझा देवावरचा विश्वास उडाला होता. मला तिची सतत आठवण येऊन दुःख होत असे. यातून बाहेर पडण्यासाठी माझ्या मामीने मला साहाय्य केले. ती मला नियमित ऑनलाईन सत्संगाची ‘लिंक’ पाठवायची. मी हळूहळू सत्संग ऐकायला आरंभ केला. मी नामजप करू लागले. मला सर्व कामे करतांना उत्साह वाटू लागला आणि माझी देवावरील श्रद्धाही वाढली.’ – सौ. ज्योती राऊतदेसाई, काणकोण
१ उ. सत्संगामुळे नामजप करण्याची आठवण होऊन व्यावहारिक अडचणी न्यून होणे : ‘सत्संग नियमित ऐकल्यामुळे आम्हाला ‘कुलदेवता आणि दत्तगुरु’ यांचा नामजप करण्याची आपोआप आठवण होते. सत्संगात सांगितल्याप्रमाणे त्या त्या सणांनुसार नामजप अन् शास्त्रानुसार आचरण केल्याने आम्हाला आनंद अनुभवता आला. आमच्या व्यावहारिक अडचणीही न्यून झाल्या.’ – सौ. विलासिनी देसाई, सौ. रिया देसाई, सौ. दीपाली पागी, श्री. शांबा प्रभुदेसाई आणि श्रीमती सुगंधा वेळीप, गोवा
१ ऊ. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्याने आणि सनातनची सात्त्विक उत्पादने वापरल्याने यजमानांमध्ये सकारात्मक पालट होणे : ‘मी २२ वर्षांची असतांना कलावतीआईंच्या मंदिरात जायचे. त्यानंतर मला नामजप करण्याची ओढ लागली. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने माझे लग्न झाले. नंतर मला मूल झाले आणि मी संसारात रमून गेले. कालांतराने घरात भांडणतंटे होऊ लागले. माझे यजमान मला शिव्या द्यायचे. ते घरात पैसेही देत नसत. माझी मामेबहीण सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करते. ती मला सनातननिर्मित सात्त्विक उदबत्ती द्यायची. तिने मला सांगितले, ‘‘तू नामस्मरण कर आणि सर्व गोष्टी परात्पर गुरु डॉक्टरांवर सोडून दे.’’ नंतर एका साधिकेने मला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला सांगितला. मी हा नामजप करू लागले आणि यजमानांमध्ये मला पुष्कळ सकारात्मक पालट होतांना दिसले. १ – २ मासांतच त्यांनी सर्व वेतन माझ्याकडे आणून देण्यास प्रारंभ केला. ही सर्व परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांची कृपा आहे. ‘देवाला मनापासून हाक मारली, तर तो धावून येतो’, याची मला अनुभूती आली.’ – सौ. रिया पेडणेकर
२. कोरोना महामारीच्या संदर्भातील अनुभूती
२ अ. मुलाला कोरोना झाल्यामुळे घरात तणावाचे वातावरण असतांना देवाने सुरक्षित ठेवणे आणि सत्संगाचा वेगळाच आनंद अनुभवायला मिळणे : ‘दळणवळण बंदीपूर्वी आमच्या घरात सत्संग चालू होता. आम्हाला सत्संगाचा वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला. माझ्या मुलाला कोरोना झाल्यामुळे घरात तणावाचे वातावरण होते; पण घरी असलेल्या सत्संगामुळे देवाने आम्हाला सुरक्षित ठेवले.’ – सौ. अपूर्वा देवीदास आणि सौ. सुनंदा देवीदास, किटल, फातर्पा, गोवा.
२ आ. कोरोना झाल्यावर सनातनच्या ग्रंथांचे वाचन केल्याने आनंदाची अनुभूती येऊन संकटावर मात करण्याची शक्ती मिळणे : ‘मला कोरोना झाल्यावर मी २१ दिवस अलगीकरणात होतो. तेव्हा मी नामजपादी उपाय केले. मी ‘विकार-निर्मूलनासाठी नामजप, विकार-निर्मूलनासाठी खोक्यांचे उपाय, स्वयंसूचनांद्वारे स्वभावदोष निर्मूलन’ आदी सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे वाचन केले. या ग्रंथांच्या वाचनाने मला आनंदाची अनुभूती येऊन संकटावर मात करण्याची शक्ती मिळाली.
२ आ १. नवरात्रीच्या काळात कोरोना झाल्यावर ‘दुर्गादेवी उशीजवळ बसून काहीतरी सांगत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे : नवरात्रीच्या काळातच मला कोरोना झाल्यामुळे ‘आता देवीला हार घालता येणार नाही’, या विचारांत मी झोपलो होतो. त्या रात्री ‘दुर्गादेवी माझ्या उशीजवळ बसून मला काहीतरी सांगत आहे’, असे मला जाणवले. मी तिला नमस्कार केला. सकाळी मी ही गोष्ट पत्नीला सांगितली. त्या वेळी आम्हा उभयतांचा भाव जागृत झाला आणि देवीला भावपूर्ण प्रार्थना अन् कृतज्ञता व्यक्त झाली. प्रतिदिन अशी अनुभूती घेतांना ‘मी कधी बरा झालो’, हे मला कळलेच नाही. ही सर्व देवीमातेचीच कृपा आहे.’ – श्री. कमलाकर नाईक, बाळ्ळी, गोवा.
२ इ. घरात तणावाचे वातावरण असतांना देवीच्या कृपेने यजमानांची सेवा, शाळेची कामे अन् घरकाम करता येणे : ‘माझ्या यजमानांना कोरोना झाल्यामुळे घरी तणावाचे वातावरण होते. अशा स्थितीत नामजप, नवरात्रीतील नऊ दिवस भावसत्संग यांद्वारे मिळणार्या देवीच्या कृपाप्रसादाने यजमानांची सेवा, शाळेची कामे अन् घरकाम या सर्व गोष्टी करतांना सेवा करत असल्याचीच अनुभूती आली. या सर्व संकटांतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला दुर्गादेवीने शक्ती दिली.’ – सौ. शकुंतला कमलाकर नाईक, बाळ्ळी, गोवा.
२ ई. ‘ऑनलाईन’ सत्संगामुळे कोरोनाविषयीचे भीतीचे सावट दूर होऊन सर्वांना आनंद आणि समाधान अनुभवायला मिळणे : ‘दळणवळण बंदीच्या काळात सर्वत्र कोरोनाची भीती होती. ‘ऑनलाईन’ सत्संगामुळे आमच्यावरील भीतीचे सावट दूर झाले. घरी सर्वांना आनंद आणि समाधान अनुभवायला मिळाले. आम्हाला भाववृद्धीसाठी प्रयत्न करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले. आमच्यात सत्संगातील विषय शिकण्याची उत्सुकता निर्माण झाली.’ – श्री. सुधाकर भंडारी, वालकिणी सांगे, गोवा.
३. ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकल्यामुळे झालेले लाभ
३ अ. सत्संग ऐकणे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचणे यांमुळे पुष्कळ पालट होऊन आनंद अन् उत्साह वाढणे : ‘मला पुष्कळ शारीरिक आणि मानसिक त्रास होतात. मी पुष्कळ वेळ झोपूनच असते. ‘ऑनलाईन’ सत्संग चालू झाल्यावर मी तो नियमित ऐकू लागले. मी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला आरंभ केला. सत्संग आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांमुळे माझ्यात पुष्कळ पालट झाला. मला आनंद मिळू लागला अन् माझा उत्साह वाढला. मी माझ्या नातेवाइकांना नामजपाचे महत्त्व सांगितले. आता तेही नामजप करतात.’ – सौ. संध्या सदानंद देसाई (निवृत्त परिचारिका), किटल, फातर्पा, गोवा.
३ आ. सत्संग ऐकल्याने हिंदु धर्मात सांगितलेले शास्त्र आणि धर्माची सद्यःस्थिती यांविषयी माहिती मिळणे : ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकल्याने ‘हिंदु धर्मात सांगितलेले शास्त्र आणि धर्माची सद्यःस्थिती’ याविषयीची मला माहिती मिळाली. समाजातील सर्व घटकांना ही माहिती मिळण्यासाठी ‘साधकांचे साहाय्य घ्यायला हवे’, असे माझे विचार बळावले.’ – श्री. विकास पागी
३ इ. ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ याविषयीचा सत्संग ऐकल्याने आत्मपरीक्षण करण्याची सवय लागणे अन् सकारात्मकता वाढून मन आनंदी आणि उत्साही होणे : ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’, यांविषयीचा सत्संग फारच चांगला आहे. मी यापूर्वी कधी स्वतःत असलेल्या स्वभावदोषांचे इतके बारकाईने निरीक्षण केले नव्हते; पण आता मला आत्मपरीक्षण करण्याची सवय लागली आहे. माझ्याकडून झालेली चूक आता माझ्या लक्षात येऊ लागली आणि ‘ती चूक पुन्हा होऊ नये’, यासाठी प्रयत्नही होऊ लागले. ‘आयुष्यातील बराचसा गुंता वारंवार होणार्या चुकांमुळे आपण वाढवतो. आता तो गुंता न्यून करण्यासाठी प्रयत्न होत आहेत’, असे मला जाणवले. माझ्यातील स्वभावदोषांचे प्रमाण हळूहळू न्यून होत असल्याने मनाचे खरे बळ समजायला लागून ‘मी जीवनात पुष्कळ काही करू शकते’, ही भावना माझ्या मनात निर्माण होत आहे. आता सकारात्मकता वाढत असून मन आनंदी आणि उत्साही झाले आहे.’ – सौ. पूनम संतोष पाटील
३ ई. सत्संगामुळे नामजप चालू होऊन चिडचिड न्यून होणे : ‘मी सत्संग ऐकण्यास चालू केले. मार्च मासात दळणवळण बंदी लागू झाल्यापासून मला ‘साधना म्हणजे काय ?’, याचे आकलन होऊ लागले. साधकांनी भ्रमणभाष केल्यावर माझ्या मनात ‘साधक बोलत नसून भगवंतच बोलत आहे’, असा विचार येत होता. मी एकही सत्संग चुकवला नाही. या सत्संगांमुळेच मला ‘नामजप, साधना, सत्संग आणि प्रार्थना’, यांविषयी माहिती मिळाली. कोरोनामुळे बाहेर जायचे बंद झाल्यामुळे ‘नागपंचमी, गणेशोत्सव, घटस्थापना, दसरा आणि दिवाळी हे सण कसे साजरे करायचे ?’, हे मला समजत नव्हते. मी प्रत्येक सणाला पाटावर चित्र काढून मानसपूजा केली.
पूर्वी मी माझा मुलगा आणि यजमान यांच्याशी पुष्कळ रागाने बोलायचे. माझी पुष्कळ चिडचिड व्हायची; पण नामजप करू लागल्यापासून याचे प्रमाण पुष्कळ उणावले.’ – सौ. ललिता चव्हाण, वास्को
३ उ. सत्संगामुळे ‘कृती भावपूर्ण कशा करायच्या ?’, हे शिकायला मिळणे : ‘ऑनलाईन’ सत्संगांमुळे ‘कृती भावपूर्णरित्या कशा करायच्या ?’, हे मला शिकायला मिळाले. एकदा मी मानसरित्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात गेले. तेव्हा मला प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शन घडले आणि ‘जीवनातील अमूल्य धन मिळाले’, असे मला वाटले.’ – सौ. सुमित्रा अराबेकर, पणजी
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |