गुरुकृपायोगानुसार जलद आध्यात्मिक उन्नती केलेल्या संतांविषयींच्या लेखमालेत २२ जुलै २०२१ या दिवशी आपण सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी आणि त्यांचे यजमान कै. वामनराव जलतारे यांच्याविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज २४ जुलै २०२१ या दिवशी त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया.
१. समाधानी वृत्ती
‘माझे पू. आई आणि कै. दादा (दिवंगत वडील) यांना खाण्याचे पदार्थ, कपडे, अलंकार या गोष्टींची आसक्ती नव्हती. ते दोघेही असेल त्या परिस्थितीत समाधानी असायचे. त्यांचे कशाविषयी कधीही गार्हाणे नसायचे. त्यांनी आमच्यावर तसेच संस्कार केले. त्यांच्याच आशीर्वादामुळे आमच्याकडे आता सर्व असूनही आम्हाला या सर्व गोष्टींपासून विरक्त रहाता येते. अनेक वेळा आर्थिक अडचण येऊनही दादांनी पू. आईंचे सोन्याचे अलंकार गहाण ठेवले नाहीत. एकदा परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर त्यांना पू. आईंच्या सोन्याच्या बांगड्या मोडाव्या लागल्या. (बांगड्या सोनाराला देऊन त्याचे पैसे घ्यावे लागले.) नंतर १ – २ वर्षांत दादांनी त्यांच्यासाठी नवीन सोन्याच्या बांगड्या केल्या.
२. स्वाभिमानी
पू. आई आणि दादा दोघेही आयुष्यभर अभिमानाने जगले. त्यांनी कधी कुणापुढे हात पसरले नाहीत, तसेच कुणी बोलावल्याविना ते इतरांकडे जातही नसत. पू. आईही बोलावल्यावरच माहेरी जात असत.
३. मायेतून अलिप्त असणे
पू. आई आणि दादा दोघेही चित्रपट, नाटक, पर्यटन किंवा बाहेरगावी जाणे, या गोष्टींपासून लांब होते. त्यांनी या गोष्टींचा आस्वाद घेतलाही असेल; पण ते कधी त्यात अडकले नाहीत. असे असले, तरी आम्हाला जे आवडते, ते त्यांनी आम्हाला करू दिले. त्यांनी आमचे आवश्यक ते सर्व लाड पुरवले.
४. विचारण्याची वृत्ती
आजही पू. आई लहान बाळाप्रमाणे आम्हाला काही गोष्टी विचारतात. ‘विचारून करणे’, हा त्यांचा स्थायीभाव आहे.
५. अल्प अहं
दादांचे वाचन अफाट होते आणि त्यांना विविध गोष्टींचे ज्ञान होते. पू. आईही लहानपणापासूनच धार्मिक वातावरणात वाढल्याने त्यांनाही अध्यात्माचे ज्ञान आहे. असे असतांनाही ते दोघेही स्वतःहून कधीच कुणाला काही सांगत नसत. ‘त्यांनी कधी पांडित्यपूर्ण विवेचन केले’, असे आमच्या पहाण्यात आले नाही.
६. इतरांना साधनेत साहाय्य करणे
अ. समोरची व्यक्ती जिज्ञासू असेल आणि तिला साधनेची आवड असेल, तर पू. आई तिला आवश्यक ते प्रयत्न आवर्जून सांगतात.
आ. एखाद्या साधकाची समष्टीत गंभीर चूक झाली असेल आणि त्यामुळे त्याची हानी होत असेल, तर पू. आई त्या साधकाला चूक सांगतात अन् प्रसंगी त्याला रागावतातही; परंतु त्यातही त्यांचे प्रेमच असते.
७. परेच्छेने वागणे
दादा आणि पू. आई यांनी आयुष्यभर ‘शौच-अशौच पाळणे, स्नान करून स्वयंपाक करणे, प्रतिदिन देवासमोर दिवा लावणे, नित्य कुळाचार पाळणे, उपवास करणे’ आदी गोष्टींचे पालन केले. त्यानंतर वार्धक्यामुळे त्यांना या सर्व गोष्टी प्रतिदिन करणे शक्य नव्हते. आमची पिढी उदारमतवादी असल्याने ‘आमच्याकडून सर्वच गोष्टींचे पालन होते’, असे नाही. असे असतांनाही दादा आणि पू. आई याविषयी कधीही दुराग्रही राहिले नाहीत. ते आम्हाला ‘योग्य-अयोग्य काय ?’, हे सांगून नंतर परेच्छेने वागायचे. पू. आईंचा घरातील कुठल्याही प्रसंगात त्रागा होत नाही. त्या ‘एखादी गोष्ट समोरच्याने केलीच पाहिजे’, असा हट्ट करत नाहीत. त्यांना ‘तुम्हाला थकवा आहे, तर स्नान न करता महाप्रसाद घ्या’, असे सांगितल्यास त्यांचा संघर्ष होत नाही. पूर्वी त्या नियमितपणे उपवास करायच्या. त्यांना ‘आता तुम्ही उपवास करायला नको’, असे सांगितल्यावर त्यांनी उपवास करणे लगेचच सोडून दिले.
८. योग्य साधना समजल्यावर त्यानुसार त्वरित कृती करणे
पूर्वी आमच्या घरी देवघरात पुष्कळ देव होते. घरात पूर्वजांची छायाचित्रेही होती. आमच्या घरात अशा अनेक गोष्टी कर्मकांडाप्रमाणे चालत होत्या. सनातन संस्थेत आल्यावर आम्हाला योग्य साधना कळली. दादा आणि पू. आई कर्मकांडानुसारच साधना करत होते, तरीही त्यांना साधनेच्या संदर्भात ज्या गोष्ट समजल्या, त्या त्यांनी त्वरित आचरणात आणल्या. त्यांनी देवघरातील देवांची संख्या न्यून केली, तसेच पूर्वजांची छायाचित्रे काढून ठेवली.
९. निरंतर साधनेचे प्रयत्न करून ईश्वराच्या अनुसंधानात रहाणे
पूर्वीपासून दादांचा दिनक्रम ठरलेला असायचा. आई सांसारिक कर्तव्यांतून मुक्त झाल्यानंतर त्यांनीही स्वतःचा दिनक्रम ठरवून त्याप्रमाणे आचरण केले. संत झाल्यानंतरही त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. त्यांचे स्नान झाल्यावर त्या विविध स्तोत्रे म्हणतात, मानसपूजा करतात आणि समष्टी प्रार्थना अन् नामजप करूनच पुढची कर्मे करतात. त्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील प्रत्येक ओळ वाचतात आणि विशेष म्हणजे त्यांच्या सर्व स्मरणातही रहाते. त्या पुण्याला माझ्याकडे रहायला असतांनाही कधी सांसारिक व्यापात अडकल्या नाहीत. त्यांचा ‘नामजप शांतपणे करत रहाणे’, हा दिनक्रम होता आणि आजही आहे. त्या ‘कापूर अन् अत्तर लावणे, त्रासदायक आवरण काढणे, रात्री झोपतांना अंथरुणाभोवती सूक्ष्मातून नामजपाचे मंडल घालणे’ इत्यादी न विसरता करतात.’
– श्री. राजेश जलतारे (मोठा मुलगा), पुणे (१९.७.२०२१)