संस्कृत भाषेतील एकमेव दैनिक ‘सुधर्मा’चे संपादक के.व्ही. संपत कुमार यांचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दुःख व्यक्त !

‘सुधर्मा’चे संपादक के.व्ही. संपत कुमार

म्हैसुरू (कर्नाटक) – भारतातील संस्कृतमधील एकमेव दैनिक ‘सुधर्मा’चे संपादक के.व्ही. संपत कुमार यांचे ३० जून या दिवशी हृदयविकारामुळे निधन झाले. वर्ष २०२० मध्ये त्यांना आणि त्यांची पत्नी एस्. जयलक्ष्मी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दुःख व्यक्त केले.

१. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून म्हटले की, के.व्ही. संपत कुमार हे एक प्रेरणादायी व्यक्तीत्त्व होते. त्यांनी तरुणांमध्ये संस्कृत भाषेला लोकप्रिय बनवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांचा दृढ संकल्प प्रेरणादायक होता.

२. ‘सुधमा’ दैनिक म्हैसुरू येथून प्रकाशित केले जाते. यात वेद, योग आणि धार्मिक विषयांशी संबंधित लेख प्रकाशित केले जातात. तसेच सांस्कृतिक वृत्तेही प्रकाशित होतात. संस्कृतचे विद्धान पंडित वरदराज अय्यंगार यांनी १५ जुलै १९७० मध्ये या दैनिकाचा प्रारंभ केला होता. के.व्ही. संपत कुमार हे त्यांचे पुत्र होते.