कुटुंबियांना ‘गुरुमाऊली आपल्यासाठी सर्वस्व आहे’, अशी शिकवण देणार्‍या कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. नलंदा खाडये !

६.६.२०२१ या दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या मातोश्री श्रीमती नलंदा खाडये यांचे निधन झाले. २९.६.२०२१ या दिवशी त्यांचा मृत्यूत्तर उदकशांती विधी आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्रीमती नलंदा खाडये

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समष्टी रूपाशी एकरूप झालेल्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

१. आईच्या निधनानंतर काही घंट्यांतच ‘विष्णुलीला सत्संगा’साठीची समष्टी सूत्रे पाठवणे : आईच्या निधनानंतर अवघ्या काही घंट्यांतच सद्गुरु स्वातीताईंनी समष्टी सूत्रांचा समन्वय करण्यास प्रारंभ केला. त्या दिवशी पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील सर्व साधकांसाठी समष्टी सूत्रांसाठीचा ‘विष्णुलीला सत्संग’ होता. ‘सत्संगात कोणती सूत्रे घेऊ शकतो ?’, हे त्यांनी मला ‘व्हॉटस्ॲप’वर पाठवले होते. ‘प्रत्यक्षात हा सत्संग कसा घ्यायचा ?’, याची दिशा त्यांनी दिलेलीच होती, तरी ‘साधकांपर्यंत समष्टी सेवेतील एखादे सूत्र पोचले नाही’, असे व्हायला नको’, या तळमळीमुळे त्यांनी सूत्रांची पुन्हा आठवण केली.

२. दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील सर्व साधकांसाठी ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप होता. त्या नामजपालाही सद्गुरु ताई जोडल्या होत्या.

३. दुसर्‍या दिवसापासून सद्गुरु ताईंनी त्यांच्या सर्व सेवांचे नियोजन नियमित चालू केले. या कालावधीत त्या ‘त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे आणि साधनेच्या स्तरावर त्यांना मार्गदर्शन करणे’, हेही करत होत्या.

४. समाजासाठी असणार्‍या कार्यक्रमांमध्येही त्या मार्गदर्शन करत होत्या.

परात्पर गुरुदेवांच्या समष्टी रूपाशी एकरूप झालेल्या सद्गुरु स्वातीताईंच्या चरणी कोटीशः  कृतज्ञता !

परात्पर गुरुमाऊली, कोटीशः कृतज्ञता तुमच्या चरणी ।
साधनेत दिशा देण्यासाठी,
तुम्हीच आम्हा साधकजनांना दिली ।
संत अन् सद्गुरु यांची मांदियाळी ।।’

श्री गुरुचरणी,

– सौ. मनीषा पाठक, पुणे (१२.६.२०२१)

१. श्री. मनोज खाडये (मोठा मुलगा), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.

श्री. मनोज खाडये

१ अ. बालपणी आणि विवाहानंतरही खडतर जीवन जगणे अन् आर्थिक स्थिती अडचणीची असतांना शिलाईकाम करून कुटुंबाच्या उपजीविकेसाठी मोलाचे योगदान देणे : ‘आईचे बालपणापासून विवाहापर्यंतचे जीवन गिरगाव ठाकूरद्वार येथे गेले. विवाहानंतर ती आरे या अगदी छोट्याशा खेडेगावात ३५ वर्षे राहिली. या काळात ‘लहान मुलांचे संगोपन, कोणताही पूर्वानुभव नसतांना गुरांची जोपासना, त्यांचे दूध काढणे आणि गोठा स्वच्छ ठेवणे’, अशा सेवाही तिने अत्यंत आवडीने केल्या. कुटुंबाची आर्थिक स्थिती अडचणीची असतांना तिने शिलाईकाम करून कुटुंबाच्या उपजीविकेसाठी मोलाचे योगदान दिले. सर्व मुलांचे माध्यमिक शिक्षणासाठीचे शालेय पोशाख आई स्वतः शिवायची.

१ आ. गावातील लोकांनी कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करणे, त्या वेळी आईने श्रीरामाचा नामजप सतत करून स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे आणि मुलांकडूनही नामजप करवून घेणे : कौटुंबिक जीवन खडतर असतांना गावातील काही जण जाणीवपूर्वक आमच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करायचे. अशाही स्थितीत शांत राहून त्रागा न करता ३५ वर्षांहून अधिक काळ आईने संघर्षमय जीवन व्यतीत केले. ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप सातत्याने करून तिने स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. ती सर्व मुलांकडूनही नामजप करवून घेत असे.

१ इ. ‘सर्वकाही ईश्वरच आहे’, असा भाव असणे : सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर ‘परात्पर गुरु डॉक्टर सर्व पहातील’, असे आई नेहमी म्हणायची. कोणताही त्रास अथवा वेदना झाल्यास त्या संदर्भात कोणताही शब्द न उच्चारता ‘श्रीकृष्ण’ असाच शब्द तिच्या मुखात यायचा. घरातून बाहेर जातांना श्रीकृष्णाच्या प्रतिमेसमोर उभे राहून देवाला ‘बाहेर जात आहोत, सांभाळ’, अशी प्रार्थना ती करत असे. अशीच प्रार्थना ती अंगणात उभी राहून वास्तुदेवतेलाही करत असे. ‘सर्वकाही ईश्वरच आहे’, हा भाव तिच्या कृतीतून शिकता येत असे.

१ ई. सर्व कुटुंबाला एकत्रित ठेवण्यातील महत्त्वाचा दुवा असलेली आई !

१ ई १. नोकरी किंवा व्यवसाय यांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची विचारपूस करणे : आमच्या लहानपणापासून एकत्र कुटुंबातील इतर सर्व सदस्य नोकरी किंवा व्यवसाय यांमुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत आहेत. आई प्रत्येकाची भ्रमणभाषवर आपुलकीने विचारपूस करायची. व्यावहारिक जीवनात भावंडांमध्ये काही मतभेद असले, तरी त्यांना ते मतभेद बाजूला ठेवून एकत्रित येण्याची प्रेरणा आईमुळेच मिळत होती.

१ ई २. ‘कोणतीही अडचण गुरुमाऊली निश्चितच दूर करतील’, असा धीर कुटुंबियांना देणे आणि त्यानंतर प्रत्येकाला तसा अनुभव येणे : तिच्यामध्ये या वयातही असलेली व्यष्टी आणि समष्टी साधनेची तळमळ तिच्या सहवासात असणार्‍या प्रत्येकाला अंतर्मुख करणारी होती. कुटुंबात कुणाला कोणत्याही प्रकारची अडचण आल्याचे समजल्यास ‘ती अडचण गुरुमाऊली निश्चितच दूर करतील’, असा धीर ती अशा प्रत्येक प्रसंगात देत असे. पुढे प्रत्येकाला तसा अनुभवही यायचा. त्यामुळे ती. आई सर्वांना एकत्र ठेवणारा दुवा तर होतीच, तसेच सर्व कुटुंबासाठी ती एक भक्कम आधार होती.

१ उ. आई स्थूलदेहाने आमच्यात नसली, तरी ‘परात्पर गुरुमाऊली आपल्यासाठी सर्वस्व आहे’, हे तिचे वाक्य आठवले, तरी आधार वाटतो.’

२. श्री. संजय खाडये (लहान मुलगा), पिंपरी, पुणे.

श्री. संजय खाडये

२ अ. ‘आईने आरंभीच्या काळात अनेक चढ-उतार पाहिले; पण संघर्ष करण्याची वृत्ती असल्यामुळे ती कधीही डगमगली नाही.

२ आ. सेवा आणि साधना हा आईचा श्वास होता. त्यामुळे तिच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला तिने साधना सांगितली.

२ इ. ‘येणार्‍या आपत्काळात गुरुदेव केवळ साधना करणार्‍यांचीच काळजी घेतील’, हे मुलाच्या मनावर बिंबवणे आणि त्यामुळे त्याच्या व्यष्टी साधनेला आरंभ होणे : ती आमच्या कुटुंबातील एक अनमोल रत्न होती. तिच्या आठवणींना उजाळा देतांना वाणी आणि लेखणी अल्प पडेल. असे जरी असले, तरी एका गोष्टीचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ‘येणारा आपत्काळ भयावह असणार आहे’, याचे चित्र तिने माझ्यासमोर सातत्याने उभे केले. इतकेच नव्हे, तर ‘गुरुदेव केवळ साधना करणार्‍यांचीच काळजी घेतील’, हेही ती सांगायची. त्यामुळेच माझ्या व्यष्टी साधनेला खर्‍या अर्थाने आरंभ झाला. शेवटी चारही वेदसुद्धा यथार्थ वर्णन करण्यास असमर्थ आहेत, तिथे मी पामर काय बोलू ? तिच्याविषयी केवळ इतकेच म्हणेन, ‘आई तू आहेस; म्हणून सर्वकाही !’ तिच्या मार्गदर्शनानुरूप चांगला साधक होण्यासाठी मी तळमळीने प्रयत्न करीन.’

३. सौ. क्रांती मिसाळ (मोठी मुलगी), कामोठे, पनवेल, रायगड.

सौ. क्रांती मिसाळ

३ अ. कामे करतांना तोंडवळ्यावर ताण किंवा थकवा न दिसणे : ‘आई प्रतिदिन न थकता सर्व कामे आनंदाने करायची. तिच्या त्या आनंदामुळे आम्हालाही आनंद मिळायचा. दिवसभर राबूनही तिच्या तोंडवळ्यावर ताण किंवा थकवा नसायचा. आईच्या या नित्यक्रमात कधीच खंड पडला नाही.

३ आ. रात्री अभ्यास करतांना मुलाला झोप येऊ नये; म्हणून त्याच्या समवेत जागणे : माझा धाकटा भाऊ (श्री. संजय खाडये) दहावीत असतांना रात्री जागून अभ्यास करायचा. त्याला कंटाळा येऊ नये, एकटे वाटू नये आणि झोप येऊ नये; म्हणून आई दिवसभर काम करूनही रात्री त्याच्या समवेत जागायची. तेव्हा ती नुसते न बसता शिवणकाम करायची.

३ इ. आयुर्वेदाच्या औषधांचा अभ्यास असणे आणि गावातील सर्वांवर प्रेमाने उपचार करणे : आमची आई म्हणजे घरातील वैद्यच होती. आईला आयुर्वेदाच्या सर्व औषधांचा दांडगा अभ्यास होता. ‘एखादा आजार झाला किंवा काही लागले, तर कोणते औषध, रस किंवा चाटण द्यावे ?’, हे आईला तंतोतंत ठाऊक असायचे. आम्हाला कधीच आधुनिक वैद्यांकडे जावे लागले नाही. आईने दिलेल्या औषधाने आम्हाला बरे वाटायचे. आम्ही खेडेगावात रहात असल्याने आमच्या गावात आधुनिक वैद्य नव्हते. तेव्हा गावातील बरेच जण आईला औषध विचारायचे. आई प्रेमभावाने सर्वांना साहाय्य करायची. ‘विचारायला आलेला प्रत्येक व्यक्ती ही माझीच आहे, माझी कुटुंबीय आहे’, या भावाने ती प्रत्येकाला उपचार सांगायची.

३ ई. वडिलांच्या निधनानंतर स्थिर राहून परिस्थितीला सामोरे जाणे : पतीच्या निधनानंतर त्या परिस्थितीतून जात असतांना समाजातील स्त्रियांच्या तोंडवळ्यावर कष्ट, त्रास, दुःख आणि अस्वस्थता दिसते, तसेच त्या स्वतःचे दुःख कुणाला तरी सांगतात; पण वडिलांच्या निधनानंतर आईला दुःख झाले नाही, तसेच तिच्या तोंडवळ्यावर ते कधी दिसले नाही. ‘ही परिस्थितीही देवाने शिकण्यासाठीच घडवली आहे’, या भावाने ती स्थिर राहून आणि आनंदाने परिस्थितीला सामोरे गेली. तिला पहातांना ‘सर्वकाही व्यवस्थित आणि सुरळीत आहे’, असे जाणवायचे.’

४. सौ. रश्मी पावसकर (मधली मुलगी), कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग.

सौ. रश्मी पावसकर

४ अ. एकत्र कुटुंबासाठी कष्ट करणे : ‘आम्ही ५ भावंडे आणि काकांची ५ मुले, अशी आम्ही १० भावंडे एकत्र होतो. आम्हा सर्वांचे शिक्षण, खाणे-पिणे हे सर्व आईला बघावे लागत असे. त्यामुळे आईला ‘पहाटे उठून गायी आणि म्हशी यांचे दूध काढणे, गोठ्याची स्वच्छता करणे, चुलीवर जेवण बनवणे’ इत्यादी गोष्टी कराव्या लागत, तसेच ‘बाबांना दुकानात साहाय्य करणे आणि संध्याकाळच्या वेळेत कपडे शिवणे’, ही कामेही ती करत असे.

४ आ. आर्थिक अडचणीत छोटे व्यवसाय करून घराचे दायित्व निभावणे : आजोबांच्या निधनानंतर आम्हाला आर्थिक अडचण निर्माण झाली. आई कपडे शिवून त्यातून आर्थिक व्यवहार करू लागली. गावातील जत्रेत आम्ही दुकान लावायचो. मनोजदादा आणि संजूदादा जत्रेत दुकान चालवायचे. आई घरी चुरमुर्‍याचे आणि शेंगदाण्याचे लाडू बनवायची. चुरमुर्‍याच्या लाडवांना मागणी असायची. चुरमुर्‍याचे लाडू गरम असतांना वळायला लागत असल्याने ते बनवायला पुष्कळ कठीण असत. लाडू वळतांना आईचे हात पुष्कळ चुरचुरायचे आणि लाल व्हायचे. आम्हीही तिला साहाय्य करायचो. आई दिवस-रात्र लाडू बनवायची. आई सावरीच्या कापसापासून गाद्या आणि उशा उत्तम प्रकारे बनवायची. गादी विकायला जे फेरीवाले यायचे, त्यांच्याकडून आईने ‘गादी कशी बनवायची ?’, हे शिकून घेतले होते. आई आणि माझी काकी, अशा दोघी मिळून हाताने चांगल्या गोधड्या शिवायच्या.

आमच्या शिक्षणासाठी आई-बाबांनी पुष्कळ कष्ट केले; पण शिक्षणासाठी कधीही काही न्यून पडू दिले नाही. आमच्या वडिलांच्या निधनानंतर आई खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी राहिली. ती आम्हाला सांगायची, ‘‘कितीही कठीण प्रसंग आला, तरी घाबरू नका. गुरुदेव आपली काळजी घेणार. नामजप आणि सेवा करा.’

अशी माता गुरुमाऊलींच्या कृपेने आम्हाला लाभली. धन्य धन्य ती माऊली ! श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक