दासबोध विक्रीच्या माध्यमातून निधी संकलनासाठी श्रीरामदासस्वामी संस्थानने कुणासही अधिकार दिलेला नाही ! – पू. सु.ग. स्वामी

सातारा, २८ जून (वार्ता.) – श्रीमत् दासबोध ग्रंथाच्या प्रसारासाठी आणि त्या माध्यमातून सज्जनगडाच्या निधी संकलनासाठी श्रीरामदासस्वामी संस्थानने कुणासही अधिकार दिलेला नाही, तसेच अशी कोणतीही लेखी किंवा तोंडी संमती दिलेली नाही, असा खुलासा संस्थानचे अध्यक्ष तथा अधिकारी स्वामी पू. सु.ग. स्वामी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

संभाजीनगर येथील गिरिष सातोनकर यांनी समाजमाध्यमांद्वारे स्वत: प्रकाशित केलेल्या श्रीमत् दासबोध ग्रंथाच्या प्रसारासाठी दासबोध विक्री करून येणारी रक्कम सज्जनगडावरील मंदिराच्या कामासाठी उपयोगात आणण्यात येईल, असा संदेश समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केला होता. या आवाहनाला सूज्ञ समर्थभक्तांनी बळी पडू नये, यासाठी संस्थानच्या वतीने खुलासा करण्यात आला आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, श्रीक्षेत्र सज्जनगड येथील देवस्थानच्या कार्यासाठी निधी संकलन करणे संस्थानला मान्य नाही. गडावरील श्रीसमर्थ समाधी मंदिरासह सर्व मंदिरे संस्थानच्या अधिपत्याखाली आणि व्यवस्थापनाखाली आहेत. अन्य कोणत्याही संस्थेस अथवा व्यक्तीस देवस्थानच्या व्यवस्थापनाच्या वतीने निधी संकलन करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे चालू असलेले निधी संकलन हे अनधिकृत आणि समर्थभक्तांचे दिशाभूल करणारे आहे. समर्थभक्तांच्या भावनांचा आणि समर्थांच्या कार्यातील सहभागाचा संस्थान आदर करते. उपरोक्त घटनेविषयी आवश्यक ती कार्यवाही संस्थान करत आहे.