कुठे संस्कृतकडे आकर्षित होणारे पाश्चात्त्य कलाकार, तर कुठे इंग्रजीची गुलामी करणारे बहुतांश भारतीय कलाकार !
नवी देहली – सध्या विदेशात संस्कृत श्लोक किंवा शब्द अंगावर गोंदवून घेण्याचा नवा प्रकार चालू झाला आहे. यामध्येच अनेक जणांनी ‘अनुगच्छतु प्रवाह’ हा शब्द अंगावर ‘टॅटू’ म्हणून गोंदवून घेण्याची चढाओढ लागल्याचे पहायला मिळत आहे. ‘अनुगच्छतु प्रवाह’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘प्रवाहासमवेत जाणे’, असा आहे. प्रसिद्ध अमेरिकी गायिका आणि संगीतकार केटी पेरी यांनीही त्यांच्या हातावर, तसेच हॉलीवूडमधील अभिनेते रसॅल ब्रँड यांनीही त्यांच्या अंगावर ‘अनुगच्छतु प्रवाह’ या शब्दाचा ‘टॅटू’ गोंदवून घेतला आहे.
विदेशी नागरिकांमधील या संस्कृतची ओढ पाहून आता भारतियांनीदेखील ‘अनुगच्छतु प्रवाह’ या शब्द गोंदवून घेण्यास प्रारंभ केला आहे. या शब्दाचे ‘टी शर्ट’ही बाजारात उपलब्ध झाले आहेत.