‘निर्विचार’ नामजप सर्व टप्प्याच्या साधकांसाठी का आहे ?

१४ मे २०२१ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘निर्विचार’ या नामजपाच्या संदर्भातील चौकट प्रकाशित करण्यात आली होती. गुरुकृपायोगामध्ये ‘साधनेच्या प्रारंभी कुलदेवता आणि  दत्त यांचा नामजप करावा’, असे सांगितले आहे. तसेच गुरुकृपायोगाचे एक तत्त्व आहे की ‘पातळीनुसार साधना’. असे असतांना ‘निर्विचार’ हा ‘गुरुकृपायोगातील सर्वांत शेवटचा नामजप’ ‘प्रारंभीच्या साधकापासून संतांपर्यंत कुणीही करू शकतो’, असे का दिले आहे ?’, असा प्रश्‍न  काही जणांच्या मनात येऊ शकतो. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले

अध्यात्मात प्रगती करण्यासाठी साधनेतील विविध टप्पे पूर्ण करावे लागतात. उदा. स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नामजप, सत्संग, सत्सेवा, भावजागृती, त्याग आणि प्रीती. ‘नामजप’ हा टप्पा पूर्ण करून ‘अखंड नामजप चालू रहाणे’ या स्थितीला येण्यास साधकाला १० ते १५ वर्षे लागू शकतात. यामध्ये ४ – ५ वर्षांत केवळ ४-५ टक्के प्रगती होऊ शकते. त्यानंतर तो साधनेच्या ‘सत्संग’ या टप्प्याला येतो. या गतीने साधनेत पुढे जायचे झाल्यास एका जन्मात साधना पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. यासाठी जर का साधनेत ज्या टप्प्याला साधक असेल, त्याच्या पुढच्या टप्प्याचे थोडे थोडे प्रयत्न करत राहिल्यास साधकाचे प्रगती होण्याचे प्रमाण वाढते, उदा. नामजप करतांनाच ‘सत्संग’ या टप्प्याचेही प्रयत्न केले, तर आध्यात्मिक प्रगतीची गती वाढतेे. याच तत्त्वाच्या आधारे गुरुकृपायोगामध्ये प्राथमिक टप्प्याच्या साधकाला स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नाम, सत्संग, सत्सेवा, भावजागृती, त्याग आणि प्रीती या आठ टप्प्यांचे एकत्रित प्रयत्न करायला सांगितले जातात. त्यामुळे या योगात अन्य साधनामार्गांपेक्षा प्रगती जलद होते.

हाच भाग ‘निर्विचार’ या नामजपाच्या संदर्भात लागू होतो. हा जप होण्यासाठी साधकाची आध्यात्मिक पातळी कमीतकमी ६० टक्के असणे, म्हणजे त्याच्या मनोलयाचा आरंभ होणे आवश्यक आहे. त्यानंतर तो साधक निर्विचार स्थितीला जाऊ शकतो; परंतु त्याने प्रारंभीपासूनच ‘निर्विचार’ हा नामजप चालू केला, तर त्याच्या मनावर या नामजपाचा थोडाफार संस्कार लवकर होऊन आठ टप्प्यांची साधना करून पुढे मनोलयाच्या टप्प्याला जाण्यासाठी लागणार्‍या कालावधीच्या तुलनेत अल्प वेळेत तो या टप्प्याला पोचू शकतो.

६० टक्क्यांपेक्षा कमी आध्यात्मिक पातळीच्या साधकाने कोणता नामजप करावा ?

‘निर्विचार’ हा नामजप ‘निर्गुण’ स्थितीला नेणारा आहे. त्यामुळे कुलदेवतेचा नामजप करणार्‍या साधकांना किंवा ६० टक्क्यांपेक्षा कमी आध्यात्मिक पातळीच्या साधकांना हा नामजप करणे कठीण होऊ शकते. यासाठी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या जपाच्या बरोबर हा नामजप करण्याचा प्रयत्न करावा. हा नामजप करणे जमू लागल्यास तो निरंतर करावा. कारण शेवटी साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाऊन पूर्णवेळ हाच नामजप करावयाचा असतो.

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

केवळ ‘निर्विचार’ जप करणे जमत नसल्यास ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करावा !

‘काही साधकांना केवळ ‘निर्विचार’ हा जप करणे कठीण जाऊ शकते. अशा वेळी त्यांनी ‘ॐ निर्विचार’ हा नामजप करून बघावा.

‘ॐ’ मध्ये सामर्थ्य आणि शक्ती आहे. त्यामुळे ‘निर्विचार’ या नामजपाच्या प्रारंभी ‘ॐ’ जोडल्यास त्याच्या उच्चाराने ‘निर्विचार’ या नामजपाचा परिणाम जलद होण्यास साहाय्य होतेे.

ज्यांचा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप सुलभतेने होत असेल त्यांनी तोच नामजप चालू ठेवावा. ’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले