चीन आणि पाक यांच्याकडून लडाख सीमेजवळ लढाऊ विमानांकडून बॉम्बफेकीचा सराव

भारताचे ‘सुखोई’ लढाऊ विमान पाडण्याचा विशेष सराव

नवी देहली – चीनने लडाख सीमेवरील त्याच्या तिबेटमधील भागामध्ये लढाऊ विमानांद्वारे युद्धसराव चालू केला आहे. या सरावामध्ये पाकच्या वायूदलाचाही सहभाग आहे. चीनकडून थेट बॉम्बफेक करण्याचाही सराव करण्यात येत आहे. भारताचे सुखोई लढाऊ विमान कसे पाडता येईल, याचा विशेष सराव करण्यात येत आहे. २२ मेपासून चालू झालेला हा युद्धाभ्यास जूनच्या अखेरीस संपणार आहे. या काळात चिनी ड्रोन आणि लढाऊ विमाने यांवरून क्षेपणास्त्रे डागण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतीय सैन्यदलप्रमुखांनी लडाखमध्ये भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला होता.

१. चीन आणि पाकिस्तानी विमाने हवेतून हवेत, हवेतून भूमीवर आणि हवेतून पाण्यात क्षेपणास्त्र डागण्याचे अन् लक्ष्य उडवण्याचा अभ्यास करत आहेत. भारतीय हवाई सीमेच्या पुष्कळच जवळून ही विमाने उडत आहेत.

२. चीन आणि पाक यांच्या या युद्धाभ्यासात भारताचे सुखोई एस्यू-३० विमान पाडण्याचा सराव करण्यात आला आहे. एकट्याने राफेल आणि सुखोई यांचा सामना करण्याची शक्ती दोन्ही देशांकडे नाही. यामुळे दोन्ही देशांनी जे-१० आणि जे-११ लढाऊ विमानांद्वारे सुखोईला घेरून पाडण्याचा सराव करण्यात आला.

३. पाकिस्तान चीनच्या साहाय्याविना भारताशी युद्ध करू शकत नाही. तसेच चीनही पाकविना भारताला अधिक दबावात ठेवू शकत नाही. यामुळेच चीनने युद्धाभ्यासासाठी पाकला समवेत घेतल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. पाकनेही अनेकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी सैन्याला बोलावले होते.