गोपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ऑनलाईन’ ‘देशी गोपालन प्रशिक्षण कार्यक्रमा’चे आयोजन !

देशी गाय

राहुरी (नगर) – देशी गायीची रोगप्रतिकारक्षमता उत्तम असते. तसेच दुधाची गुणवत्ताही चांगली असल्याने अनेक गोपालक देशी गायी पाळत आहेत. देशी गायीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची वाढती मागणी लक्षात घेऊन गोपालकांनी एकत्र येऊन दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती केल्यास आर्थिक लाभ होईल, असे निरीक्षण महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे संशोधक डॉ. शरद गडाख यांनी नोंदवले. महात्मा फुले कृषी विद्यापिठाअंतर्गत देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र पुणे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र अन् राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ३ दिवसीय ‘ऑनलाईन’ देशी गोपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते.

देशी गायीच्या दुधाचा हृदयविकार आणि संधिवात असणार्‍या रुग्णांना लाभ होत असल्याने देशी गायीची लोकप्रियता वाढली असल्याचे मत डॉ. सुनील खंडागळे यांनी या वेळी व्यक्त केले. (गोपालनासाठी प्रयत्न होणे, हे निश्‍चितच स्तुत्य आहे ! अनेक संशोधनांतून गायींचे महत्त्व समोर येते; मात्र तरीही गोहत्या थांबत नाहीत. त्यामुळे गोपालनासाठी प्रोत्साहन देण्यासह गोहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाहीही व्हायला हवी ! – संपादक)

या प्रशिक्षणात देशी गायींचे पोषण आणि आहार, वर्षभरासाठी हिरवा चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन, तणावमुक्त देशी गोपालन, देशी गायींच्या आहारात औषधी वनस्पतींचा वापर, समतोल आहार, घरगुती खाद्यनिर्मिती आणि गोपालनामध्ये होमिओपॅथी औषधांचा वापर आदी विषयांवर गोपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.