ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे मुंबईत कामावरून घरी परतणार्‍या नागरिकांचा खोळंबा

मुंबई – मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे ९ जून या दिवशी मुंबईमध्ये सायंकाळी कामावरून घरी परतणार्‍या नागरिकांना अनेक घंटे तिष्ठत रहावे लागले. घरी परतणार्‍या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दुपारी ३ वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत रेल्वेस्थानकावर ताटकळत उभे रहावे लागले, तर रस्ते वाहतुकीने घरी जाणारे नागरिक वाहतूककोंडीमुळे ५-६ घंटे रस्त्यांवर अडकून पडले. मुंबईच्या रस्त्यावर ठिकठिकाणी २-३ किलोमीटर इतक्या लांब वाहनांच्या रांगा पहायला मिळाल्या.

एका वृत्तवाहिनीवर थेट (लाईव्ह) दाखवलेल्या वृत्तानुसार सांताक्रूझ-चेंबूर लिंक या दुपदरी मार्गावर झालेल्या वाहतूककोंडीमध्ये एका बाजूला ९६ वाहनांची मोठी रांग होती. तेवढीच रांग रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला होती. वडाळा येथील रस्त्यावरील वाहनांची रांग ३-४ किलोमीटर इतकी लांब होती. घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर साचलेल्या पाण्यामुळे ३ किलोमीटरपर्यंत इतक्या लांब वाहतुकीची रांग पहायला मिळाली.