मुंबई – राज्यात कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने ऑक्सिजन खाटांसह एकूण ३० टक्के खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ३०० बालरोग तज्ञांच्या नियुक्तीसह लहान मुलांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार यांनी दिली.
त्यांनी सांगितले की,
१. कोरोनाच्या तिसर्या लाटेत राज्यात अनुमाने साडेदहा लाख रुग्ण असण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.
रुग्णांसाठी १ सहस्र १०० नवीन रुग्णवाहिका घेण्यात येणार आहेत.
२. रुग्णाला रुग्णालयात आवश्यक उपचार तात्काळ मिळणे हा आमच्या रणनीतीचा भाग आहे. त्यामुळेच आर्टीपीसीआर् आणि अॅन्टिजेन चाचण्या अधिकाधिक प्रमाणात करून रुग्णांच्या उपचाराला आम्ही प्राधान्य देणार आहोत. यासाठी १२ नवीन प्रयोगशाळा चालू करण्यात येतील.
३. कोरोनाच्या दुसर्या लाटेत ऑक्सिजन पुरवठा अल्प पडल्याचे लक्षात घेऊन स्टोरेज टँक, ड्युरा आणि जम्बो सिलिंडर यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात १५ सहस्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. पाच लिटर आणि १० लिटरच्या कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून अतिदक्षता विभागातील बहुतेक रुग्णांची व्यवस्था होईल. राज्यात सध्या २ सहस्र मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.