गोव्यात संचारबंदीत ३१ मे पर्यंत वाढ

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

पणजी, २१ मे (वार्ता.) – गोवा शासनाकडून राज्यात १० मे ते २३ मे पर्यंत लागू करण्यात आलेली संचारबंदी आता पुढे ८ दिवस म्हणजे ३१ मे २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. गोव्यात कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूचे प्रमाण आणि गोव्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन संचारबंदी वाढवण्यात आली आहे. संचारबंदीसाठी लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्वीप्रमाणेच असतील. संचारबंदीच्या काळात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने चालू रहातील.

कोविड लसीविषयी जागतिक पातळीवर निविदा मागवणार

गोवा राज्यशासन कोविड लसीविषयी जागतिक पातळीवर निविदा मागवणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. लस नोंदणीविषयी ते म्हणाले, ‘‘इतर राज्यांतील लोकांनी कोविन पोर्टलवर गोव्यात नोंदणी करून गोव्यात लस घेणे आम्ही थांबवू शकत नाही.’’