गोवा राज्यात कामासाठी जा-ये करणार्‍या सिंधुदुर्गवासियांना ई-पासमधून सवलत

बांदा – सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा राज्यात कामासाठी नियमित जाणार्‍यांची ई-पाससाठी सध्या अडवणूक करू नये. पुढील २ ते ३ दिवस त्यांना सवलत देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या कामाच्या ठिकाणचे ओळखपत्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात येणारे ओळखपत्र यांद्वारे त्यांना प्रवेश देण्यात येईल, अशा सूचना सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा-सटमटवाडी येथील तपासणी नाक्यावरील अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

वैभववाडी बाजारपेठ ४ दिवस बंद रहाणार

वैभववाडी – वैभववाडी शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वैभववाडी बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी येथील व्यापारी मंडळाने २७ ते ३० एप्रिल या कालावधीत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ई-पास नसलेल्यांना पोलीस तपासणी नाक्यावर अडवले

बांदा – गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करतांना ‘ई-पास’ नसलेल्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर बांदा-सटमटवाडी येथील पोलीस तपासणी नाक्यावर रोखण्यात आले. २५ एप्रिलला दुपारपर्यंत केवळ ३९ जणांनाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे प्रवाशांची ऑनलाईन ई-पास काढण्यासाठी धावपळ होत होती.

सिंधुदुर्गात कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू

१. गेल्या २४ घंट्यांतील नवीन रुग्ण २३९

२. उपचार चालू असलेले रुग्ण ३ सहस्र ९४

३. बरे झालेले एकूण रुग्ण ८ सहस्र ५९

४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ११ सहस्र ४२६

५. मृत्यू झालेले एकूण रुग्ण २६७