हरिद्वार, १८ एप्रिल (वार्ता.) – कोरोना महामारीचे कारण पुढे करत कुंभमेळ्यामध्ये सरकारने अनेक अडचणी आणल्या. प्रारंभी कुंभमेळा होऊच नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. साधू-महंत यांनी संघटन करून याचा विरोध केल्यावर कुंभमेळ्याला अनुमती मिळाली. अनेक अडचणींनंतर कुंभमेळा भरला; मात्र भक्तांना कुंभमेळ्यात येण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. निवडणुकीच्या वेळी कोरोना कुठे जातो ? तो (कोरोना) कुंभमेळ्यातच येतो का ? असा सडेतोड प्रश्न नोएडा येथील सिद्धपीठ शिव साई शनिधाम आश्रमाचे श्री परमेश्वरदास महाराज यांनी येथे उपस्थित केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाच्या अंतर्गत समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी श्री परमेश्वरदास महाराज यांची भेट घेतली असता ते बोलत होते. या वेळी महंत जगदीश्वरदास महाराज यांचीही भेट घेण्यात आली. श्री. सुनील घनवट यांनी श्री परमेश्वरदास महाराज आणि महंत जगदीश्वरदास महाराज यांना ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रण दिले.