नवी मुंबई आणि पनवेल येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद; व्यापार्‍यांचे आंदोलन !

पनवेल – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने १ मास कठोर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे पनवेल, नवी मुंबई परिसरांतील दुकाने ६ एप्रिल या दिवशी बंद करण्यात आली होती. या विरोधात व्यापारी आणि दुकानदार यांनी तीव्र संताप व्यक्त केला, तसेच खारघर वसाहतीत संतप्त दुकानदारांनी पोलिसांची गाडी अडवली, तर कळंबोली येथे प्रभाग कार्यालयासमोर ‘ठिय्या आंदोलन’ करून निर्बंधाच्या विरोधात अप्रसन्नता व्यक्त केली.

‘कठोर निर्बंध लावले, तर आम्ही जगायचे कसे’, असा प्रश्‍न व्यापार्‍यांनी उपस्थित केला. ‘आम्ही तुमचा आदर करतो, आम्ही नियमही पाळू; पण आमच्या पोटावर लाथ मारू नका’, असे व्यापारी आणि दुकानदार यांनी पोलिसांना सांगितले. खारघर येथील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रू माळी यांनी व्यापार्‍यांना विनंती केल्यानंतर व्यापार्‍यांची गर्दी अल्प झाली.

पनवेल परिसरात कडक कारवाईस प्रारंभ

आदेशाची पनवेल परिसरात ६ एप्रिलपासून कडक कार्यवाही करण्यास आरंभ झाला आहे. त्यानुसार खारघर परिसरातील दुकाने पोलिसांनी बंद केली. त्यांनी ठिकठिकाणी जाऊन दुकानदार, व्यावसायिक यांना आवाहन केले. दुकाने बंद न केल्यास कारवाई करू, अशी चेतावणी दिली. एक मास दुकाने आणि व्यवसाय बंद रहाणार आहेत.