पनवेल – नागरिकांवर अवाजवी मालमत्ता कर लादण्याविषयी आम्ही कधीच समर्थन केले नाही आणि करणारही नाही; मात्र विरोधक या विषयाचा बागुलबुवा करून लोकांची दिशाभूल करत आहेत. वास्तविक मालमत्ता कर आकारणी हा विषय प्रशासनाच्या अखत्यारीतील असतांना विरोधक नाहक सत्ताधार्यांची अपर्कीती करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ५ एप्रिल या दिवशी मार्केट यार्ड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले की, मालमत्ता कराच्या संदर्भात महापालिकेच्या सभागृहात ‘ऑनलाईन’ विशेष महासभा आयोजित करण्यात आली होती. सभा ‘ऑनलाईन’ असतांनाही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नियमांची पायमल्ली करून सभागृहात प्रवेश केला आणि सभा होऊ न देता केवळ गोंधळ घातला. त्यामुळे विरोधी पक्षाच्या अशा अत्यंत निंदनीय वागणुकीचा सत्ताधारी भाजप आणि रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीने निषेध करत आहोत. कर्नाळा बँकेचा घोटाळा लोकांसमोर आल्यानंतर तो लपवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून वारंवार केला गेला. हे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होतांना दिसत असल्यामुळे घोटाळा लपवण्यासाठी महाविकास आघाडी मालमत्ता कराचा विषय जनतेवर लादून भडकाभडकवी करत आहे.