अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण
चिपळूण – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी पाटगाव, पागारवाडी (संगमेश्वर) येथील सौरभ सुनील पागार याला न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर सौरभला या गुन्ह्यात गर्भपाताच्या गोळ्या आणून देणारा त्याचा मित्र बेलाराम उपाख्य विकी दलाराम देवाशी (राजस्थान) याची गुन्हा सिद्ध न झाल्याने मुक्तता करण्यात आली. याविषयी पीडितेच्या नातेवाइकांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ४.१.२०१९ ते ५.४.२०१९ या कालावधीत हा गुन्हा देवरुख पोलीस ठाणे हद्दीत घडला. या तक्रारीनुसार, सौरभ आणि पीडितेमध्ये मैत्रीचे संबंध होते. यातूनच त्याने तिला लग्नाचे आमीष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. ती गर्भवती राहिली. सौरभला हे समजताच त्याने मित्र बेलारामच्या मदतीने पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. ही गोष्ट पीडितेच्या नातेवाइकांना समजताच त्यांनी याविषयी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
देवरुख पोलीस ठाण्यात सौरभवर भा.दं.वि. कलम ३७६(२), (जे), (एन्) , ३१२, २०१, ३४ आणि पोक्सो कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील यांनी केले. तसेच सौरभचा मित्र बेलारामवर गुन्ह्यात साहाय्य केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम २०१, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करून न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट केले होते. दोन वर्षे हा खटला न्यायालयात चालू होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्ता मेघना नलावडे यांनी काम पाहिले असून त्यांनी १५ साक्षीदार तपासले. या खटल्याचा निकाल देतांना न्यायाधीश व्ही.ए. राऊत यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद आणि दाखल केस कायदा विचारात घेऊन सौरभला १० वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंड अन् तो न भरल्यास १ वर्षे सक्तमजुरी, तसेच पोक्सो कलम ३ व ४ नुसार ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंड तो न भरल्यास १ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा त्याला एकत्रितरित्या भोगाव्या लागणार आहेत. श्री. सुनील आयरे, देवरुख पोलीस ठाणे यांनी पहिरवी म्हणून काम पाहिले.