मुंबई – आतापर्यंत मंत्र्यांपासून पोलिसांपर्यंत इतके गंभीर आरोप झाले आहेत; मात्र मुख्यमंत्र्यांनी एकदाही प्रतिक्रिया दिलेली नाही. हा महाराष्ट्राच्या प्रतिमेवरील डाग आहे. यावर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागेल. मुख्यमंत्र्यांचे मौन अस्वस्थ करणारे आहे, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या त्यागपत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना केले.
फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘जी नैतिकता न्यायालयाच्या निर्णयानंतर आठवली, ती यापूर्वी आठवायला हवी होती; मात्र नैतिकता कधीही जरी आठवली, तरी तिचे स्वागतच करायला हवे. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून गृहमंत्रीपदावरील व्यक्तीचे अन्वेषण होतांना गृहमंत्री पदावर राहू शकत नाहीत. त्यामुळे अनिल देशमुख यांना पदाचे त्यागपत्र देण्यावाचून पर्यायच नव्हता. विधीमंडळात मी पुराव्यानिशी आरोप केले होते; मात्र त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. मी केलेले आरोप न्यायालयाने स्वीकारलेले आहेत, याचा मला आनंद आहे. अनिल देशमुख यांची पाठराखण चुकीची होती, हे न्यायालयाच्या आदेशानंतर सिद्ध झाले आहे.’’