अन्वेषणातून इतके विषय बाहेर येतील की, राजकारणावरील जनतेचा विश्‍वास उडेल ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

मुंबई – मंत्रीमंडळातील एक मंत्री १५ वर्षे एका महिलेशी संबंध ठेवल्याचे उघडपणे सांगतो, ठेवतो, दुसरा मंत्री २२ वर्षांच्या युवतीसमवेत संबंध ठेवतो, गृहमंत्री १०० कोटी रुपयांची वसुली मागतात हे विषय आतापर्यंत बाहेर पडले आहेत. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाविषयी अनिल देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी झाल्यावर १५ दिवसांत इतके विषय बाहेर येतील की, राजकारणावरील जनतेचा विश्‍वास उडेल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

सरकारवर कितीही आरोप झाले, तरी हे सत्ता सोडणार नाहीत; त्यासाठी जनतेला मोठे आंदोलन करावे लागेल ! – पाटील

या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘अद्याप सचिन वाझे यांच्या अन्वेषणातून बरेच काही बाहेर येईल. राज्यात एका बाजूला कोरोनामुळे वाईट स्थिती असतांना, सरकारचे हे प्रकार समाजकारण आणि राजकारण यांच्यावरील जनतेचा विश्‍वास उडवणारे आहे. या सरकारवर कितीही आरोप झाले, तरी हे सत्ता सोडणार नाहीत. त्यासाठी जनतेला मोठे आंदोलन करावे लागेल.’’