सामाजिक अंतराचे नियम धाब्यावर
कोल्हापूर, ३० मार्च – गेल्या आठवड्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत आहे. यावर प्रशासनाकडून सातत्याने गर्दी टाळण्यासाठी आवाहन आणि उपाययोजना केल्या जात आहेत. असे असतांना ३० मार्च या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र गोकुळच्या निवडणुकीसाठी आवेदन भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. आवेदन प्रविष्ट करण्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक राहिल्याने गोकुळ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनाबाहेर आणि इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आवेदन प्रविष्ट करण्यासाठी येतांना उमेदवार शक्तीप्रदर्शन करत येत असल्याने गर्दी वाढत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन केवळ आवाहनच करणार कि कठोर कारवाईचा बडगाही उगारणार, असा प्रश्न आता सामान्य नागरिकांमधून केला जात आहे.