पू. (श्रीमती) सुलभा जोशी यांची कन्या सौ. अपर्णा जोशी यांना त्यांच्या आईच्या माध्यमातून मिळालेल्या सत्संगामुळे गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटणे

धूलिवंदनाच्या दिवशी (२९.३.२०२१ या दिवशी) पुणे येथील पू. (श्रीमती) सुलभा जोशी यांना संतपदी विराजमान होऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने त्यांची कन्या सौ. अपर्णा जोशी यांना त्यांच्या पू. आईची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. (श्रीमती) सुलभा जगन्नाथ जोशी

१. आई (श्रीमती सुलभा जोशी) संतपदी विराजमान झाल्याचा भावसोहळा पहाण्याचे भाग्य लाभणे

‘सोनियाचा दिवस आजि अमृतें पाहिला ।’ १०.३.२०२० या पावन दिवशी माझी आई श्रीमती सुलभा जोशी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करून संतपदी विराजमान झाली. हा भावसोहळा ‘याची देही, याची डोळा ।’ आम्ही कुटुंबियांनी सर्व साधकांसह अनुभवला. यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

२. भ्रमणभाषवर मंत्रजप ऐकणे

पू. आईला भ्रमणभाषवर मंत्रजप, नामस्मरण, स्तोत्रपठण ऐकणे सुकर झाले आणि तिला ही गोष्ट फारच भावली. ती प्रतिदिन ठराविक वेळी भ्रमणभाषवर नामस्मरण आणि मंत्रजप ऐकते.

३. वयाच्या ७१ व्या वर्षीही तळमळीने गुरुसेवा करणारी पू. आई !

पू. आईची या वयातील गुरुसेवेची तळमळ शब्दातीत आणि वंदनीय आहे. पू. आई समष्टीसाठी नामजप करते. ती घरात राहून सात्त्विक उत्पादनांच्या वितरणाची सेवाही गुरुसेवाभावाने करते. या सेवा करतांना ‘गुरुदेव सतत आमच्या समवेत आहेत’, असे आम्हाला जाणवते.

४. प्रतिदिन धार्मिक ग्रंथांच्या वाचनातून भगवंताला अनुभवण्याचा प्रयत्न करणे

दिसामाजी काही तरी ते लिहावे ।
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ॥

– समर्थ रामदासस्वामी

प्रतिदिन नित्यनेमाने काहीतरी ‘वाचन करावे’, असे ठरवून प्रथम गुरुदेव विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांचे भागवत गीतेवरील गीतासार, श्रीमद्भागवत, पांडवप्रताप या महान ग्रंथांचे मी मोठ्याने वाचन केले आणि पू. आईने ते ऐकले. त्या वेळी मला पू. आईची श्रवणभक्ती, कीर्तनभक्ती आणि आत्मनिवेदनभक्ती जाणता आली.

५. वाचनाची अफाट क्षमता

पू. आईची वाचनाची क्षमता अफाट आहे. ती प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ बारकाईने वाचते. त्यातील ठळक सूत्रे ती मला पुन्हा वाचायला सांगते. सध्या ती अठरा पुराणे एकेक करून स्वतंत्रपणे वाचत आहे.

६. सतत भगवंताच्या अनुसंधानात असणे

मुळातच ‘शांत स्वभाव, समाधानी वृत्ती, निरपेक्ष वृत्ती आणि अंतर्मनातून चालू असलेली साधना’ यांमुळे पू. आई सतत भगवंताच्या अनुसंधानात असल्याचे जाणवते.

७. ‘गुरुमाऊलीने पू. आईच्या रूपात गुरुतत्त्व उपलब्ध करून दिले आहे’, असे जाणवणे

पू. आई सकाळी उठल्यानंतर हळूवारपणे खोलीच्या बाहेर येते. तेव्हा तिच्या तोंडवळ्यावरचा भाव एखाद्या लहान बालकाप्रमाणे असतो. मला तिच्याकडे पाहून तेज जाणवते. तिची त्वचा अतिशय कोमल झाली आहे. तिच्याशी बोलतांना ‘गुरूंशीच संवाद करत आहे’, असे मला वाटते. गुरुमाऊलींनी तिच्या रूपात आम्हा सर्वांसाठी ‘गुरुतत्त्व’ उपलब्ध करून दिले आहे. तिच्या अस्तित्वाने घर आश्रम बनला आहे. ‘हे गुरुमाऊली, माय, माऊली आणि जन्मभूमी यांची अपार कृपा अनुभवतांना मला वाटते,

‘ऋण हे कसे फिटावे, राहीन मी ऋणात ।
जननी, जन्मभूमीस, पाहू सदा सुखात ॥’

गुरुमाऊलींनी हे सुचवले. या अजाण जिवाला सत्संग दिला. यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. अपर्णा जोशी (पू. (श्रीमती) सुलभा जोशी यांची कन्या), चिंचवड, पुणे. (२४.३.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक