मुंंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचे अन्वेषण व्हावे, यासाठी न्यायालयात याचिका

डावीकडून: अनिल देशमुख, परमवीर सिंह

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्या गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदी कार्यरत असलेले परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे प्रतिमास १०० कोटी रुपयांची वसुली मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपाचे अन्वेषण करण्यात यावे, या मागणीसाठी अधिवक्ता घन:श्याम उपाध्याय आणि पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.

या याचिकांमध्ये परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला दिला आहे. उपाध्याय यांनी केलेल्या याचिकेमध्ये पोलीस आणि राजकीय नेते यांच्याकडून खंडणी मागितली जात असल्याचा आरोप, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या या प्रकरणांचीही केंद्रीय अन्वेषण यंत्रणांद्वारे स्वतंत्र अन्वेषण करण्याची मागणी केली आहे. पाटील यांनी केलेल्या याचिकेत सचिन वाझे यांनी केलेल्या गुन्ह्यांकडे डोळेझाक केल्याप्रकरणी परमबीर सिंह आणि अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.