२८ मार्च २०२१ (फाल्गुन पौर्णिमा) या दिवशी पू. जयराम जोशी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने…
पू. जयराम जोशीआजोबा यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
२८.३.२०२१ (होळी पौर्णिमा) या दिवशी सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशीआजोबा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचे चिरंजीव श्री. योगेश जोशी यांनी पू. जोशीआजोबांच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून निराशेवर मात करण्यास सांगणे
‘पू. आबा मला साधनेत पुष्कळ साहाय्य करतात आणि आधार देतात. मला कधी निराशा आली, तर ते मला लगेच सांगतात, ‘‘आपण निराश व्हायचे नाही. गुरुदेवांना शरण जायचे आणि पुढे जायचे. गुरुदेव सर्वकाही ठीक करून घेणार आहेत.’’ पू. आबा मला, कुटुंबियांना, तसेच आश्रमातील साधकांना सांगतात, ‘‘गुरुदेव सतत आपल्या समवेत आहेत.’’
२. ‘पू. आबा आमच्या चुका इतक्या प्रेमाने सांगतात की, त्या आमच्या अंतर्मनात जातात.
३. सूक्ष्मातून साधकांच्या अडचणी ओळखणे
पू. आबा कधी कधी आम्हाला एखाद्या साधकाची चौकशी करण्यासाठी भ्रमणभाष करण्यास सांगतात. त्या साधकाला भ्रमणभाष केल्यावर ‘त्याला खरोखरंच काहीतरी अडचण होती’, असे बर्याच वेळा लक्षात येते.
४. कर्तेपण देवाला अर्पण करणारे पू. आबा !
पू. आबा आणि पू. शैलजा परांजपेआजी हे दोघे एकमेकांचे ‘आध्यात्मिक भाऊ-बहीण’ आहेत. ते एकमेकांशी भ्रमणभाषवर बोलतात. त्यांचे संभाषण एकमेकांना आध्यात्मिक आधार दिल्यासारखे असते. ते दोघेही ‘सर्वकाही गुरुदेवांमुळे होत आहे’, असे एकमेकांना सांगतात. त्या वेळी ‘सर्व कर्तेपण देवाला कसे अर्पण करायचे ?’, हे शिकायला मिळते.
५. पू. जोशीआजोबांनी केलेले अनमोल मार्गदर्शन
अ. पू. आबांचे नेहमी सांगणे असते की, ‘कुणाकडूनही अपेक्षा करू नका. देव आपल्याला न मागता सर्वकाही देत असतो. देवाकडे काही मागायचे असल्यास ‘साधना करण्यासाठी बळ दे’, असे मागावे.’
आ. माझा अहं कुठे वाढत असेल, तर पू. आबा मला वेळोवेळी त्याची जाणीव करून देतात. ते सांगतात, ‘‘आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवावेत, म्हणजे देवाच्या जवळ जाणे सोपे जाते.’’
इ. ‘आपल्या बोलण्यात ‘मी केले, माझ्यामुळे ही सेवा झाली, मला ही सेवा किती छान जमली !’, असे शब्द चुकूनही येता कामा नयेत; कारण ते देवाला आवडत नाही. त्याऐवजी ‘देवाने केले, देवाने माझ्याकडून करवून घेतले’, असे बोलण्याचा सतत प्रयत्न केल्याने आपली शरणागती वाढण्यास साहाय्य होते.
ई. पू. आबांनी त्यांच्या लहानपणापासून इतरांसाठी खूप काही केले आहे. ते कोणतीही कृती मनाप्रमाणे नाही, तर मनापासून करतात. पू. आबा सांगतात, ‘‘मनापासून कृती केल्याने ती अंतर्मनातून होते, म्हणजे ‘देवाला आवडेल’, अशी होते, तर मनाप्रमाणे केलेल्या कृतीत अहं आड आल्यामुळे ती देवाला अपेक्षित अशी होत नाही.’’
६. अनुभूती – पू. आबांच्या सहवासात असल्यामुळे ‘स्वतःभोवती आध्यात्मिक कवच आहे’, असे जाणवणे, त्यामुळे कितीही सेवा केली, तरी थकवा न जाणवणे
पू. आबांच्या सहवासात असल्यामुळे ‘माझ्याभोवती आध्यात्मिक कवच आहे’, असे मी सातत्याने अनुभवतो. ‘दिवसभर सेवा केल्यावर किंवा रात्रीही अकस्मात् काही तातडीच्या सेवा केल्यावर ‘मी थकलो आहे’, असे मला कधीही जाणवत नाही. पू. आबांकडून मिळणार्या चैतन्यामुळे माझ्या मनाला उभारी मिळते’, असे मी गेल्या तीन वर्षांपासून अनुभवत आहे.
‘प.पू. गुरुदेव, ‘पू. आबा मला ‘वडील’ म्हणून नव्हे, तर तुमच्यासारखे ‘गुरु’ म्हणून लाभले आहेत’, असे मला वाटते. हे सर्व तुमच्यामुळेच साध्य झाले आहे. यासाठी तुमच्या आणि पू. आबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. योगेश जोशी (पू. आबांचे चिरंजीव), सनातन आश्रम, मिरज. (१६.३.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |