जानेवारी २०२० मध्ये यवतमाळ जिल्ह्यात धर्मरथ आला होता. त्या वेळी त्याची सेवा करतांना साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ‘मी धर्मरथाभोवती प्रदक्षिणा घालत असतांना मला सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव डॉ. आठवले सर्व साधकांकडे कृपाळूपणे पहातांना दिसले.’ – कु. सुवर्णा राऊत, यवतमाळ
२. ‘धर्मरथ येण्याआधीच ‘धर्मरथ आला आहे’, असे मला स्वप्न पडले. स्वप्नात ‘रांगोळ्या काढल्या आहेत. पुष्कळ प्रकाश पडला आहे आणि सर्व साधक आनंदी झाले आहेत’, असे दिसले.’ – सौ. कल्पना राऊत, यवतमाळ
३. ‘परतीच्या वेळी धर्मरथ आमच्या घरून पुढच्या प्रवासाला निघाला. तेव्हा ‘गुरुमाऊली मला भेटून चैतन्य देऊन परतत आहे. मी रथात गुरुमाऊलीच्या कुशीत बसून नामजप करत आहे’, ’, असे मला जाणवले. त्या वेळी भाव जागृत होऊन मला गहिवरून आले.’ – सौ. सुनीता खाडे, यवतमाळ
४. ‘बाभूळगाव येथे सेवेसाठी धर्मरथ निघाला. त्या वेळी एक कपिला गाय आली आणि तिने धर्मरथाला प्रदक्षिणा घातली. दुसर्या ठिकाणीही तशीच गाय आली आणि तिने धर्मरथाला दोन प्रदक्षिणा घातल्या. हे बघून माझी भावजागृती झाली.’ – श्री. विष्णुपंत खाडे, यवतमाळ
५. ‘धर्मरथ घाटंजी येथे जात असतांना ‘श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुमाऊली डॉ. आठवले समवेत आहेत’, असे जाणवून माझी पुष्कळ भावजागृती झाली. गावात सेवेला गेल्यावर माझ्याकडून तेथील कुलदेवतेला आपोआप प्रार्थना होऊ लागल्या.’ – सौ. छबूताई बागमारे, यवतमाळ
६. ‘सकाळी धर्मरथाची पूजा करत असतांना मला पुढील दृश्य दिसले, ‘रथाच्या चाकाजवळ घोडे आहेत. श्रीकृष्ण रथ हाकत आहे. रथावर श्री हनुमंत आहे. आम्ही सर्व जण भगवे झेंडे घेऊन धावत आहोत. त्या वेळी तेथे परात्पर गुरुमाऊली डॉ. आठवले आहेत. आम्ही त्यांना शरणागतभावाने दंडवत घालत आहोत.’ – सौ. शांताबाई घोंगडे, यवतमाळ
७. ‘धर्मरथाभोवती रांगोळी काढतांना रांगोळीत आपोआप मोरपिसाचा आकार आला. आतापर्यंत मी रामनाथी आश्रमात गेले नाही; परंतु धर्मरथाने आश्रमदर्शन घडवले. धर्मरथातील ध्यानमंदिरात नामजपासाठी बसल्यावर मन निर्विचार झाले आणि परात्पर गुरुमाऊली डॉ. आठवले मला गरुडावर बसवून वर-वर घेऊन जात आहे’, असे जाणवले.’ – सौ. कविता आस्वले, वणी, यवतमाळ.
८. ‘धर्मरथाच्या माध्यमातून म्हणजे श्रीकृष्णच येत आहे’, असा माझा भाव होता. त्या वेळी माझा अखंड नामजप होत होता. धर्मरथातील ध्यानमंदिरात नामजप करत असतांना शरीर हलके होऊन ‘परात्पर गुरुदेव धर्मरथातून आम्हाला घेऊन जात आहेत’, असे वाटले.’ – सौ. मंदा पारखी, वणी, यवतमाळ.
९. ‘रात्री धर्मरथाचे आगमन झाल्यावर त्याचे पूजन करतांना मी डोळे मिटले. तेव्हा मला श्रीकृष्णाचे भव्य रूप दिसले आणि माझी भावजागृती झाली. धर्मरथातील ध्यानमंदिरात नामजप करतांना ‘रामनाथी आश्रमातच नामजप करत आहे’, असे मला जाणवले.’ – सौ. कल्पना खामणकर, वणी, यवतमाळ.
१०. ‘पांढरकवडा येथे धर्मरथ लावतांना आलेला अडथळा श्रीकृष्णाने दूर केल्यावर कृतज्ञताभाव जागृत होऊन मला गहिवरून आले. ‘तूच आम्हाला सेवा देतोस. तूच आमच्याकडून सेवा करवून घेतोस, तरी कर्तेपणा मात्र आम्ही घेतो’, या भावाने क्षमायाचना करतांना माझी पुष्कळ भावजागृती झाली.’ – श्री. लहू खामणकर, वणी, यवतमाळ.
११. ‘धर्मरथाने यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश केल्यावर पुसद येथे २.१.२०२० या दिवशी धर्मरथाच्या सेवेला आरंभ झाला. ग्रामदेवतेला भावपूर्ण आणि कळकळीने प्रार्थना करत असतांना ‘भगवान शिव नृत्य करत असून त्याच्या जटा ताठ झाल्या आहेत. त्याच्यातून ऊर्जा निर्माण होत आहे’, असे जाणवत होते. सर्व साधकांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती.
१२. यवतमाळ येथे धर्मरथ लावण्याच्या संदर्भात आलेल्या अडचणीमुळे धर्मरथाची सेवा आरंभ होण्यासाठी विलंब होत होता. तेथील ग्रामदैवत केदारेश्वराच्या चरणी प्रार्थना होत असतांना शिवपिंडीतून गार लहरी धर्मरथाकडे येत होत्या. धर्मरथाची सेवा आरंभ होऊन अपेक्षित फलनिष्पत्ती मिळाली. तेव्हा माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
१३. वणी (यवतमाळ) येथे धर्मरथ रात्री आला असता तेथील साधकांनी पूजनाचे नियोजन केले होते. तेव्हा सूक्ष्मातून मीही तेथे गेले असता मला चालकाच्या ठिकाणी श्रीकृष्ण उभा असलेला दिसला. यापूर्वी मला असे कधीही दिसले नव्हते.
१४. वणी येथे धर्मरथ नियोजित सेवास्थळी ठेवला असता ‘धर्मरथाचे रक्षण कसे होणार ?’, असा विचार मनात आला. त्या वेळी ‘एका रात्री भगवान श्रीकृष्ण आणि दुसर्या रात्री शिवाचे त्रिशूळ अन् बाण धर्मरथाच्या चारही बाजूंनी उभे होते’, अशी अनुभूती प्रतिदिन देवाने मला दिली.
‘सर्व साधकांकडून धर्मरथाची सेवा सर्व बारकाव्यांनिशी भावपूर्ण आणि परिपूर्ण करवून घेतली’, यासाठी श्री गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. सुनंदा हरणे, यवतमाळ (२३.१.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |